फेसबुकवर दिसणार टिव्ही मालिका
By शेखर पाटील | Published: July 26, 2017 09:54 PM2017-07-26T21:54:40+5:302017-07-26T21:55:32+5:30
फेसबुकवर लवकरच टिव्ही मालिका व अन्य कार्यक्रम दिसणार असून यातील पहिला भाग ऑगस्ट महिन्यात सादर करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
फेसबुकवर लवकरच टिव्ही मालिका व अन्य कार्यक्रम दिसणार असून यातील पहिला भाग ऑगस्ट महिन्यात सादर करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून फेसबुक टिव्ही मालिकांसमान कार्यक्रम आपल्या युजर्सला सादर करणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. मध्यंतरी याबाबत संभ्रमाचे वातावरणदेखील निर्माण झाले होते. तथापि, ताज्या घडामोडी आणि विश्वसनीय सूत्रांच्या हवाल्याने ब्लुमबर्गने याबाबत वृत्त प्रसिध्द केले असून यानुसार पुढील महिन्यात फेसबुकवर या प्रकारचा टिव्ही कार्यक्रमाचा पहिला भाग दाखविण्यात येणार आहे. फेसबुकने गत काही वर्षांपासून सातत्याने व्हिडीओ कंटेंटवर लक्ष केंद्रीत केले आहे. यामुळे आता या सोशल साईटवर युजर्स मोठ्या प्रमाणात व्हिडीओचा वापर करत आहेत. अलीकडेच लाँच करण्यात आलेल्या लाईव्ह स्ट्रीमिंगलाही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. यातच आता फेसबुक स्वत: टिव्हीसारख्या कार्यक्रमांची निर्मिती करणार असल्याची माहिती समोर आली आहे. याला विविध टप्प्यांमध्ये सादर करण्यात येणार आहे. यात प्रामुख्याने टिन एजर्सला भावणार्या कार्यक्रमांना प्राधान्य देण्यात येणार आहे. तसेच यासोबत क्रीडा क्षेत्राशी संबंधीत कार्यक्रमांचाही समावेश असेल असे या वृत्तात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, ब्ल्युमबर्गच्या वृत्तानुसार ऑगस्ट महिन्याच्या मध्यावर फेसबुक या प्रकारच्या टिव्ही कार्यक्रमाचा पहिला भाग सादर करेल. फेसबुकवरील टिव्ही कार्यक्रम हे मुख्यत्वे अल्प आणि दीर्घ कालखंड अशा दोन प्रकारात सादर करण्यात येतील. यातील ५ ते १० मिनिटांचे कार्यक्रम हे फेसबुक स्वत: तयार करत असून २० ते ३० मिनिटांपर्यंतचे कार्यक्रम हे अन्य कंपन्यांच्या सहकार्याने दाखविण्यात येणार असल्याचे या वृत्तात नमूद करण्यात आले आहे. या माध्यमातून नेटफ्लिक्स, हॉटस्टार आणि युट्युबवरील युट्युब रेड या प्रिमीयम सेवेला आव्हान देण्याचा फेसबुकचा प्रयत्न असल्याचे दिसून येत आहे.