इरसाल माणसांच्या इरसाल गजाली पुन्हा एकदा रंगणार 'गाव गाता गजाली'
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2018 10:26 AM2018-09-03T10:26:31+5:302018-09-03T10:30:26+5:30
''कोकणी माणूस म्हणूचा......'' पुन्हा एकदा नवीन धमाल गजाली रसिकांना पाहता येणार आहे.येत्या 13 सप्टेंबर पासून रात्री 10 वाजता ही सुपरहिट ठरलेल्या मालिकेचा पार्ट- 2 रसिकांच्या मनोरंजनासाठी सज्ज होणार आहे.
“मॅड झालस काय,व्हतला व्हतला सगळा व्हतला आणि मी कधी कुणाक काय सांगतंय काय”, हे संवाद अल्पावधीतच रसिक प्रेक्षकांच्या जिभेवर रुळू लागले आणि ही पात्र रोजच्या जगण्याचा भाग बनली होती. मालवणी भाषेत याच गप्पांना गजाली असं म्हटलं जातं.गावागावातल्या भानगडींपासून ते राष्ट्रीय असो किंवा मग थेट परदेशात घडणा-या घडामोडी असो या सगळ्यांवर गप्पांचा फड कोकणातल्या गावागावात चांगलाच रंगतो.
इरसाल माणसांच्या याच इरसाल गजाली या मालिकेत दाखवण्यात आल्या होत्या. छोट्या पडद्यावर 'रात्रीस खेळ चाले' या सुपहरहिट ठरलेल्या मालिकेनंतर कोकणची संस्कृती,तिथली गावं,माणसं आणि मालवणी भाषा हे सगळं वैभव 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेच्या माध्यमातून पुन्हा एकदा जगासमोर आणलं ते 'गाव गाता गजाली' या मालिकेने. त्यामुळे कोकणचं तेच वैभव आणि संस्कृती पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर 'गाव गाता गजाली'च्या माध्यमातून रसिकांना अनुभवण्याची संधी मिळाली होती.त्यामुळे ही मालिका बंद झाली तेव्हा नक्कीच मालिकेच्या फॅन्सचा हिरमोड झाला होता.
आता पुन्हा एक आनंदाची बातमी रसिकांना मिळणार आहे. ते म्हणजे इरसाल माणसांच्या इरसाल गजाली पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर रंगणार आहेत. 'गाव गाता गजाली' नव्या ढंगात रसिकांच्या भेटीला येणार आहे.‘पांडू’ची भूमिका साकारणारा अभिनेता - लेखक प्रल्हाद कुडतरकरनेच सोशल मीडियावर चाहत्यांसह ही आनंदाची बातमी शेअर केली आहे.
मालिका संपली तेव्हा शेवटच्या भागात अल्प विश्रांतीनंतर पुन्हा परतणार असल्याचे संकेतही देण्यात आले होते.म्हणूनच येत्या 13 सप्टेंबर पासून रात्री 10 वाजता ही सुपरहिट ठरलेल्या मालिकेचा पार्ट- 2 रसिकांच्या मनोरंजनासाठी सज्ज होणार आहे. ''कोकणी माणूस म्हणूचा......'' म्हणत पुन्हा एकदा नवीन धमाल गजाली रसिकांना पाहता येणार आहे.
या मालिकेच्या पहिल्या भागाचे शूटिंग हे कोकणातच करण्यात आले होते. अगदी त्याचनुसार या मालिकेच्या नव्या भागांचे शूटिंगही कोकणातच करण्यात येत आहे. विशेष म्हणजे मालिकेत जुन्या कलाकारांसह नवीन कलाकारांचाही समावेश असणार आहे. कोकणातील गावांमधील काही नव्या कलाकारांना या मालिकेत काम करण्याची संधी देण्यात आली अाहे.