एसटी अपघातात १२ जखमी, पावसामुळे अपघात झाल्याचा अंदाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 04:48 AM2018-06-22T04:48:09+5:302018-06-22T04:48:09+5:30
सॅटीस पुलावर अचानक थांबलेल्या ठाणे-शहापूर या एसटीला पाठीमागून आलेल्या ठाणे-भिवंडी या दुसऱ्या बसने धडक दिल्याची घटना गुरुवारी दुपारी तलावपाळी परिसरातील शिवाजी महाराज पुतळ्यासमोर घडली.
ठाणे : सॅटीस पुलावर अचानक थांबलेल्या ठाणे-शहापूर या एसटीला पाठीमागून आलेल्या ठाणे-भिवंडी या दुसऱ्या बसने धडक दिल्याची घटना गुरुवारी दुपारी तलावपाळी परिसरातील शिवाजी महाराज पुतळ्यासमोर घडली. यामध्ये १२ प्रवासी जखमी झाले. ते सर्व ठाणे-भिवंडीतील रहिवासी आहेत. जखमींपैकी सहा जणांना घरी सोडले असून अन्य जखमींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. तर, परिवहन विभागाने तातडीने जखमींचे बी फॉर्म (जखमी झाल्याचा) भरून त्यांना पी फॉर्म (जखमींवरील उपचाराचा खर्च एसटीने द्यावा यासाठी) दिले आहेत. बसचे ब्रेक लागल्यानंतरही रस्त्यावर टाकलेले डांबर आणि पावसामुळे हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज ठाणे परिवहन विभागाने वर्तवला आहे.
ठाणे एसटी स्थानकातून ठाणे-शहापूर ही बस तलावपाळीजवळ उतारावर काही तांत्रिक कारणास्तव चालकाने उभी केली होती. याचदरम्यान त्याच पुलावरून जाणारी ठाणे-भिवंडी एसटी त्यावर जाऊन आदळली. विनावाहक असलेल्या ठाणे-भिवंडी बसमध्ये एकूण २३ प्रवासी होते. ते सर्व बेसावध असताना हा अपघात झाला. त्यामुळे एकूण १२ जण जखमी झाले असून त्यांच्या कपाळास, नाक आणि ओठ व हाताला जखमा झाल्या आहेत. त्यामध्ये काही जणांना टाके टाकण्यात आले आहेत. तसेच एसटी चालकाच्या बाजूच्या सीटवर बसून प्रवास करणारा प्रवासी वरुण म्हस्के हा बसच्या पुढे काचेतून बाहेर फेकला गेल्यामुळे त्याच्या हाताला आणि कमरेला मार लागला आहे. तो भिवंडीचा रहिवासी असून ठाण्यात एका कॉम्प्युटर कोर्सनिमित्त आला होता. तर ठाण्यातील गणेश महादळकर हे कल्याण-फ ाटा येथील गॅरेजमधून दुचाकी आणण्यासाठी जात होते. तसेच कधी नव्हे ते एसटीने जात होतो, असे त्यांनी सांगितले. या घटनेची माहिती कळताच, स्थानिक नगरसेवक सुधीर कोकाटे आणि हेमंत पवार यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात धाव घेतली. या प्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
>अपघातातील जखमींची नावे
मच्छिंद्र सकपाळ (३७), गणेश महादळकर (४०), निमिषा वागल (१८), वेदांत करसुले(१८), पार्थ मेहता (१५), अर्थव मोरे (१६), नितीन प्रसाद (२३),
इरम अन्सारी (१८), वरुण म्हस्के (२३), प्रथमेश वाडिया (१६), अर्चना केसर (५५) , रणजीत शिकरे (२२)
>‘‘अपघात झाल्यानंतर एसटीतून बाहेर पडलो. त्या वेळी जखमी झालेले सर्व जण रिक्षावाल्यांकडे मदत मागत होते. पण, कोणी रिक्षावाला थांबत नसल्याने जखमींना बराच वेळ रस्त्यावर उभे राहावे लागले.’’
- गणेश महादळकर व वरुण म्हस्के (जखमी प्रवासी)
>जखमी झालेल्यांना प्राथमिक उपचारार्थ ५०० ते १००० रुपये दिले आहेत. खासगी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर येणाºया मेडिकलचे बिल दिल्यावर त्यांना तो खर्च एसटी विभागामार्फत दिला जाणार आहे.’’ -अविनाश कुलकर्णी, यंत्र अभियंता, ठाणे एसटी विभाग
>‘‘अपघातामधील १२ जणांना सिव्हिल रुग्णालयात आणण्यात आले. त्यामधील सहा जणांना संध्याकाळपर्यंत उपचार करून घरी सोडले. तर एकाला उपचारार्थ त्याचे नातेवाईक खासगी रुग्णालयात घेऊन गेले आहेत. अन्य पाच जणांवर उपचार सुरू असून त्यांचीही प्रकृती स्थिर आहे.’’
- डॉ. एस.व्ही. माकोडे,
अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक ठाणे