ठाण्यात लग्नाच्या आमिषाने लैंगिक अत्याचार करून शिक्षिकेची १४ लाखांची फसवणूक: आरोपीस अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 09:46 PM2018-03-26T21:46:51+5:302018-03-26T21:46:51+5:30
व्हॉटसअॅपवर झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत एका अविवाहितेला लग्नाचे अमिष दाखवित तिची आर्थिक, मानसिक आणि शारिरीक फसवणूक करणाऱ्यास २६ मार्च रोजी कोपरी पोलिसांनी अटक केली आहे.
ठाणे : ठाण्यातील एका ४६ वर्षीय शिक्षिकेला लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार करून १४ लाख ३० हजारांची फसवणूक करणाºया चंद्रकांत डोळे (४३, रा. कल्याण) याला कोपरी पोलिसांनी सोमवारी पहाटेच्या सुमारास अटक केली आहे. त्याला १ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
विवाहित असलेल्या चंद्रकातने या महिलेला व्हॉट्सअॅपवर मेसेज पाठवून आधी मैत्रीचे जाळे टाकले. वडील आणि बहिणीचे निधन झाल्यामुळे अविवाहित असलेल्या या महिलेशी त्याची २०१५ मध्ये ओळख झाली. नंतर, तिचा विश्वास संपादन करून तिच्याशी प्रेमसंबंध निर्माण करून तिला त्याने लग्नाचे आमिष दाखवले. याच आमिषाला बळी पडून तिने त्याच्यावर विश्वास ठेवला. त्याच नावाखाली त्याने तिला लोणावळा, खोपोली तसेच वसई आणि ठाणे आदी परिसरातील हॉटेलमध्ये नेऊन तिच्याशी शरीरसंबंध ठेवले. केवळ एवढ्यावरच न थांबता इस्टेट एजंटचे काम करणाºया चंद्रकांतने तिच्याकडून वेगवेगळ्या कारणांसाठी जानेवारी २०१७ ते २३ मार्च २०१८ या दरम्यान १४ लाख ३० हजार रुपये तिच्या बँक खात्यातून घेतले. त्यानंतरही त्याने तिच्या बँक खात्याचा एटीएम क्रमांक मागितला. त्यावर तिने आधी दिलेल्या पैशांचे काय केले? ते कधी देणार? अशी विचारणा केल्यानंतर त्याने पैसे देण्यास नकार दिला. शिवाय, तिच्याशी संपर्कही तोडला. लग्नाच्या आमिषाने लैंगिक अत्याचार करून आर्थिक, शारीरिक आणि मानसिक फसवणूक केल्याप्रकरणी तिने अखेर याप्रकरणी २५ मार्च रोजी कोपरी पोलीस ठाण्यात फसवणूक आणि बलात्काराचा गुन्हा दाखल केला. हा गुन्हा दाखल झाल्यानंतरही वेगवेगळी कारणे देऊन तो हुलकावणी देत असतानाच वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस.डी. कोर्डे आणि दिगंबर भदाणे यांच्या पथकाने त्याला २६ मार्च रोजी पहाटेच्या सुमारास अटक केली. पोलीस उपनिरीक्षक ए.वाय. सावंत हे अधिक तपास करत आहेत.