१४० एक्स्प्रेसना राजधानी-शताब्दीचे रूप, मध्य रेल्वेच्या ११, तर प.रे.च्या २० गाड्यांचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 06:23 AM2018-05-29T06:23:57+5:302018-05-29T06:23:57+5:30

देशभरातील १३२ मार्गांवरील १४० लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्यांचा राजधानी-शताब्दी एक्स्प्रेसच्या धर्तीवर चेहरामोहरा बदलण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला

140 express include Rajdhani-Shatabdi form, 11 in Central Railway and 20 for P.R. | १४० एक्स्प्रेसना राजधानी-शताब्दीचे रूप, मध्य रेल्वेच्या ११, तर प.रे.च्या २० गाड्यांचा समावेश

१४० एक्स्प्रेसना राजधानी-शताब्दीचे रूप, मध्य रेल्वेच्या ११, तर प.रे.च्या २० गाड्यांचा समावेश

Next

नारायण जाधव
ठाणे : दख्खनची राणी (डेक्कन क्वीन), नेरळ-माथेरान टॉय ट्रेनसह देशभरातील १३२ मार्गांवरील १४० लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्यांचा राजधानी-शताब्दी एक्स्प्रेसच्या धर्तीवर चेहरामोहरा बदलण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. यात सर्वांच्या आवडीच्या आणि देश-विदेशांतील पर्यटकांमध्ये लोकप्रिय ठरलेल्या नेरळ-माथेरान टॉय ट्रेनला तर काचेचे छप्पर बसवून, एका डब्यात रेस्टॉरंट सुरू करण्यात येणार आहे.
या योजनेत मध्य रेल्वेच्या १२ मार्गांवरील ११ गाड्या आणि पश्चिम रेल्वेच्या १४ मार्गांवरील २० गाड्यांचा समावेश आहे. या महिन्याच्या अखेरपर्यंत या कामास सुरुवात होणार आहे. वर्षभरात सर्व गाड्या नव्या रूपात धावतील, असा विश्वास रेल्वे सूत्रांनी व्यक्त केला.

या असणार सुविधा
या सर्व गाड्यांच्या सीटचे कुशन बदलण्यात येणार असून त्यांना शताब्दी-राजधानीचा टच देण्यात येणार आहे.
सर्व गाड्यांमध्ये आगीच्या दुर्घटना घडल्यास मोठी हानी टाळण्यासाठी आगप्रतिबंधक यंत्रणा, मार्गावरील विविध स्थळांची माहिती देणारे पोस्टर्स लावण्यात येणार आहेत. याशिवाय, प्रसाधनगृहात उच्च दर्जाचे फ्लशर्स बसवण्यात येणार असून त्यांची प्रत्येक दोन तासांनंतर स्वच्छता करण्यात येणार आहे. शिवाय, सर्व डब्यांची अधूनमधून सफाई करून ठिकठिकाणी केराच्या टोपल्या ठेवण्यात येणार आहेत.
गाडी सुरू झाल्यानंतर प्रत्येक दोन तासांनंतर तिच्या देखभाल दुरुस्तीची तपासणी करण्यात येणार आहे. खिडक्यांचे पडदे बदलून ते आकर्षक करण्यात येणार आहेत. चांगली व शुद्ध हवा खेळती राहावी, यासाठी व्हेंटिलेशनची रचना बदलण्यात येणार आहे. मुंबई-पुणे मार्गावरील दख्खनची राणी १५ आॅगस्टपर्यंत, तर मुंबई-मडगाव ही गोव्याला जाणाऱ्या पर्यटकांची आवडती गाडी डिसेंबरपर्यंत नव्या रूपात धावणार आहे. रेल्वे कर्मचाºयांना हजेरीसाठी जीपीएस टॅग लावण्यात येणार आहेत.

टॉय ट्रेनचे सिलिंग
बनवणार काचेने
देश-विदेशांतील पर्यटकांचे मुंबईनजीकचे आवडते पर्यटन आणि थंड हवेचे ठिकाण म्हणजे माथेरान होय. सह्याद्रीच्या उंच पर्वतरांगेतील
माथेरानला जाण्यासाठी नेरळ येथून टॉयट्रेन आहे. या ट्रेनने माथेरानला जाताना तेथील निसर्गसौंदर्याचे पॅनारोमिक दृश्य टिपण्यासाठी या गाडीचे सिलिंग संपूर्ण काचेचे करण्यात येणार आहे. शिवाय, गुगल आर्ट आणि कल्चरशी सहकार्य करार करून परिसराच्या पॅनारोमिक इमेज दाखवणारी डिजिटल डॉक्युमेंटची थीम तयार करून या लोकप्रिय गाडीला आणि माथेरानला जागतिक स्तरावर वेगळी ओळख देण्यात येणार आहे. शिवाय, या टॉयट्रेनच्या एका डब्यात आकर्षक असे रेस्टॉरंट सुरू करण्यात येणार असल्याने पर्यटकांना स्थानिक खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येईल.

Web Title: 140 express include Rajdhani-Shatabdi form, 11 in Central Railway and 20 for P.R.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.