शेअर्समधून ३६ लाखांचा गंडा, न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 03:36 AM2018-03-24T03:36:42+5:302018-03-24T03:36:42+5:30
शेअर्सच्या व्यवसायात सुमारे ३६ लाखांच्या झालेल्या नुकसानीस गुंतवणूकदाराने संबंधित शेअर ब्रोकरला जबाबदार धरले. याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार या ब्रोकरविरुद्ध नौपाडा पोलिसांनी गुरुवारी गुन्हा दाखल केला.
ठाणे : शेअर्सच्या व्यवसायात सुमारे ३६ लाखांच्या झालेल्या नुकसानीस गुंतवणूकदाराने संबंधित शेअर ब्रोकरला जबाबदार धरले. याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार या ब्रोकरविरुद्ध नौपाडा पोलिसांनी गुरुवारी गुन्हा दाखल केला.
नौपाड्यातील राममारुती रोडचे रहिवासी सुमित देशपांडे यांनी ३० जानेवारी २०१६ ते २९ जून २०१७ या काळात शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केली. यासाठी डी-मॅट अकाउंट उघडून गुंतवणुकीचे पूर्ण अधिकार त्यांनी शेअर ट्रेडिंग व्यवसायी मोरया लेले यांना दिले. या गुंतवणुकीमध्ये देशपांडे यांचे ३६ लाख ४८ हजार ५६५ रुपयांचे नुकसान झाले. दलाली मिळवण्यासाठी लेले यांनी आपल्या चुकीच्या पद्धतीने गुंतवल्याचा आरोप देशपांडे यांनी केला आहे. सुरुवातीला पोलिसांनी दखल न घेतल्यामुळे देशपांडे यांनी न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार याप्रकरणी गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला.