ठाणे जिल्ह्यातील विकासासाठी सुमारे ५०० कोटीच्या आराखड्यास मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2018 07:16 PM2018-01-10T19:16:45+5:302018-01-10T19:18:34+5:30

ठाणे जिल्ह्यासाठी २०१८-१९ या वर्षासाठी सुमारे ५०० कोटी इतक्या भरीव आराखड्यास आज जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली

500 crores sanctioned for development of Thane district | ठाणे जिल्ह्यातील विकासासाठी सुमारे ५०० कोटीच्या आराखड्यास मंजुरी

ठाणे जिल्ह्यातील विकासासाठी सुमारे ५०० कोटीच्या आराखड्यास मंजुरी

Next

ठाणे - जिल्ह्यासाठी २०१८-१९ या वर्षासाठी सुमारे ५०० कोटी इतक्या भरीव आराखड्यास आज जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलतांना सर्व निधी विभाग प्रमुखांनी वेळेत आणि योग्य पद्धतीने खर्च करण्याच्या दृष्टीने नियोजन करावे अशा सुचना जिल्हाधिकारी यांना दिल्या. याप्रसंगी ठाणे जिल्ह्याच्या व्हिजन २०३० चे सादरीकरण करण्यात आले. नियोजन भवनातील सभागृहात आज दुपारी ही बैठक पार पडली.

२०१८-१९ साठी ३०६ कोटी ७२ लाख रुपये मंजूर झाले आहेत या नियतव्ययास मंजुरी देण्यात आली याशिवाय आदिवासी उपयोजनेसाठी ९४ कोटी ५४ लाख, आदिवासी उपयोजना बाह्य क्षेत्रासाठी २६ कोटी १३ लाख , तसेच विशेष घटक योजनेसाठी ७० कोटी ७३ लाख अशा एकंदर ४९८ कोटी १२ लाख रुपयाच्या खर्चास आज मंजुरी मिळाली.  या निधीतून १५ कोटी ३४ लाख नाविन्यपूर्ण योजनांवर, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर ४६ कोटी रुपये खर्च करण्यात येतील. कृषी, ग्रामविकास,पाटबंधारे, सामाजिक सेवा हे कोअर सेक्टर म्हणजे गाभा क्षेत्र असून त्यासाठी एकंदर १६३.५९  कोटी तर बिगर गाभा क्षेत्रासाठी ८१ कोटी ७९लाख निधी ठेवण्यात आला आहे.

आरोग्य यंत्रणा मजबूत करावी
यावेळी बोलतांना पालकमंत्री म्हणाले कि ठाणे सामान्य रुग्णालयात सीटीस्कॅन यंत्र बसविणे, तसेच जिल्ह्यातील ३३ आरोग्य केंद्रे अधिक अद्ययावत होण्याकडे प्रशासनाने लक्ष्य द्यावे. माळशेज, अंबरनाथ, टिटवाळा याठिकाणी अधिक पर्यटन सुविधा निर्माण कराव्यात. रस्त्यांसाठीचा खर्च सुयोग्य पद्धतीने व्हावा म्हणून हा विषय बिगर गाभा क्षेत्रात न ठेवता गाभा क्षेत्रात आणण्यासंदर्भात ठरवा घेऊन तो मुख्यमंत्री यांच्याकडे पाठविण्यात यावा असेही पालकमंत्री म्हणाले. पुढील वर्षीच्या खर्चाचे नियोजन एप्रिलपासून होईल याकडे लक्ष्य देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.

माफियांवर कारवाई अधिक तीव्र करा
ठाणे जिल्ह्यात विशेषत: भिवंडी भागात काल्हेर, कशेळी या भागात काही ठिकाणी कांदळवाणाची कत्तल करून अनधिकृत बांधकामे उभारण्यात येत आहेत तसेच रेती माफिया ज्या ठिकाणी रेतीचा उपसा करीत आहेत त्याठिकाणी जिल्हा प्रशासनाने त्वरित  कारवाई करावी तसेच मोक्का किंवा एमपीडीए सारखे कायदे लावावेत असेही सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी यांनी राज्यातील एमपीडीएची पहिली केस ठाणे जिल्ह्यात केल्याची माहिती दिली तसेच पर्यावरण संरक्षणासाठी व अवैध बांधकामे रोखण्यासाठी तातडीने अधिक तीव्र मोहीम केली जाईल असे सांगितले.

वृक्षांचे संरक्षण गरजेचे
वृक्षारोपण करतांना झाडांचे संगोपन होणे, संरक्षण करणे गरजेचे असून त्यासाठी वन विभागाने काळजी घ्यावी असेही पालकमंत्री यांनी सांगितले. त्यासाठी वन विभागाच्या चौक्या उभारणे, कुंपण घालणे, वेळच्यावेळी वाळलेले गावात काढणे, चर खोदणे अशी कामे करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

जिल्ह्यातील पाणी समस्या, रस्ते, विजेचे प्रश्न य बाबीनाव्र संबंधित मंत्री व सचिव यांच्या समवेत बैठका लावाव्यात असेही निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.

जिल्ह्यासाठी 2013 वर्षासाठीचे व्हिजन डॉक्यूमेंट
प्रारंभी जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी प्रास्ताविक करून सांगितले प्रशासनाच्या बाबतीत  संख्यात्मक नव्हे तर गुणात्मक बदल कसा घडून येईल, याचाच प्रयत्न करण्यात येत आहे, आणि म्हणूनच जिल्ह्यासाठी २०१३ या वर्षापर्यंतचे व्हिजन डॉक्यूमेंट पुण्याच्या सायन्स एंड टेक्नोलॉजी पार्कतर्फे तयार करण्यात येत असल्याची माहिती दिली. लोकप्रतिनिधींनी यात आपल्या सूचना द्याव्यात असेही ते म्हणाले. बेरोजगारी आणि युवकांमधील तंत्र कौशल्याचा अभाव यावर लक्ष्य केंद्रित करून ठाणे आणि कल्याण येथे कौशल्य विकास केंद्रे उभारून गरीब,आदिवासी मुलांना मोफत प्रशिक्षण देणे सुरु केल्याचे सांगून त्यांनी या पुढील काळात कातकरी समाजातील प्रत्येकला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करणार आहे आणि विविध स्वयंसेवी संस्था, संघटना, दानशूर व्यक्ती, उद्योग यांचीही यात मदत घेतली जाईल अशी माहिती दिली. रोखमुक्त व्यवहाराना चालना व प्रोत्साहन देण्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालायार्फे मोहीम राबविण्यात येत आहेसेही त्यांनी सांगितले.

यावेळी भिवंडी येथील शवागृहाचे दुरुस्ती काम, एमएमआरडीए रस्त्याची कामे,वाढीव वीज देयके, डिजिटल शाळा, अंगणवाडी अशा काही मुद्द्यांवर लोकप्रतीनिधीनी आपल्या सुचना दिल्या.

आजच्या बैठकीस खासदार कपिल पाटील यांनी देखील नियोजन आणि अंमलबजावणी अधिक गांभीर्याने व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली.

खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी मलंगगड येथील विकास कामे झपाट्याने पूर्ण व्हावीत असे सांगितले. अपदार किसन कथोरे, गणपत गायकवाड, महेश चौगुले, ज्योती कलानी, रुपेश म्हात्रे, संजय केळकर, रवींद्र फाटक, सुभाष भोईर यांनी देखील महत्वपूर्ण सुचना केल्या. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ विवेक भीमनवार त्याचप्रमाणे भिवंडी व मीरा भाईंदर पालिका आयुक्त यांची देखील उपस्थिती होती.

बैठकीत सादरीकरण सूत्रसंचालन जिल्हा नियोजन अधिकारी अमोल खंडारे यांनी केले. प्रारंभी विधानपरिषदेचे उप सभापती स्व वसंत डावखरे यांच्या निधनाबद्धल त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.    
 

Web Title: 500 crores sanctioned for development of Thane district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे