किल्ले संवर्धनासाठी ६०० कोटी , मोदी सरकारकडून लोकहिताची कामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2017 03:49 AM2017-11-06T03:49:57+5:302017-11-06T03:50:07+5:30
छत्रपती शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ ज्या पद्धतीने जनतेसाठी काम करत होते, त्याप्रमाणे मोदी सरकार आणि फडणवीस सरकारमधील मंत्री काम करत असल्याचे सांगत
कल्याण : छत्रपती शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ ज्या पद्धतीने जनतेसाठी काम करत होते, त्याप्रमाणे मोदी सरकार आणि फडणवीस सरकारमधील मंत्री काम करत असल्याचे सांगत गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी केंद्र आणि राज्य सरकारने ६०० कोटींची तरतूद केल्याची माहिती राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली. शनिवारी पूर्वेकडील नूतन विद्यामंदिर शाळेत भरवण्यात आलेल्या दोनदिवसीय शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते.
भाजपाचे कल्याण पूर्व सरचिटणीस संजय मोरे आणि संतोष पाटील यांनी या प्रदर्शनाचे आयोजन केले असून शस्त्रसंग्रह करणाºया सुनील कदम यांचे या वेळी राज्यमंत्री चव्हाण यांनी विशेष कौतुक केले. शिवाजी महाराज हे कल्याणमध्ये येऊन गेले आहेत. त्यामुळे या शहराला एक ऐतिहासिक वारसा लाभला आहे. आरमार आणि किल्ले यासाठी महाराज नेहमी आग्रही होते. त्यांनी केलेली प्रत्येक लढाई ही महत्त्वाची होती. त्यांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी विविध शस्त्रांचा वापर करून लढाई जिंकली आहे, असे सांगताना चव्हाण यांनी हा इतिहास समजावा, म्हणून रायगडासह अन्य गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी सरकारने ६०० कोटींची तरतूद केल्याची माहिती दिली.
लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींनी शिवाजी महाराजांचे दर्शन घेऊन प्रचाराला प्रारंभ केला होता. शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळाने ज्याप्रमाणे काम केले, त्याप्रमाणे सध्याचे राज्यातील आणि केंद्रातील सरकार काम करत आहे. त्यामुळे शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेले रयतेचे राज्य देशातील नागरिकांना अनुभवाला येईल, असा दावा चव्हाण यांनी आपल्या भाषणात केला. या वेळी आयोजक संजय मोरे, नाना सूर्यवंशी, सुभाष म्हस्के, वैभव गायकवाड, हेमलता पावशे, सुमित्रा नायडू, कमल पंजाबी आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रदर्शनाला पहिल्याच दिवशी शाळकरी मुलामुलींनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.