वाहतूककोंडी फोडण्यासाठी ६०० होमगार्डची आवश्यकता
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2019 04:24 AM2019-02-04T04:24:58+5:302019-02-04T04:27:31+5:30
ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात लोकसंख्येसह वाहनांची वाढती संख्या तसेच पूल आणि विविध रस्त्यांच्या कामांमुळे सर्वत्र वाहतूककोंडी होत आहे.
ठाणे - ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात लोकसंख्येसह वाहनांची वाढती संख्या तसेच पूल आणि विविध रस्त्यांच्या कामांमुळे सर्वत्र वाहतूककोंडी होत आहे. ही कोंडी सोडवण्यासाठी शहर वाहतूक शाखेकडे पुरेसे मनुष्यबळ नाही. लोकसंख्या आणि वाहनांच्या संख्येनुसार किमान तीन हजार वाहतूक पोलीस तैनात असणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने वाहतूक पोलिसांची संख्या वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, वाहतूककोंडी सोडवण्यासाठी आणखी ६०० होमगार्ड देण्याची मागणी वाहतूक पोलिसांनी गृहरक्षक दलाकडे केली आहे.
शहर पोलीस आयुक्तालयात ठाणे, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर इत्यादी शहरांचा मुख्यत्वे समावेश आहे. या शहरांमध्ये ठाणे वाहतूक शाखेच्या एकूण १८ उपशाखा कार्यान्वित असून वाहतूक शाखेत सध्या ५६ अधिकाऱ्यांसह ६८२ पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत. पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील लोकसंख्या ८० लाखांच्या घरात पोहोचली आहे. त्यातच, ठाणे शहरातील वाहनांची संख्या ३० लाख इतकी असून त्यामध्ये ५२ हजार रिक्षा आहेत. मुंबई असो वा पालघर किंवा गुजरातकडे जाण्यासाठी ठाण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे बाहेरून येणाºया वाहनांची संख्याही ठाण्यात जास्तच आहे. त्यातच, ठाणे शहरासह भिवंडी, कल्याण आदी शहरांत रस्त्यांची कामे, ब्रिज आणि मेट्रोची तसेच काही ठिकाणी ड्रेनेज आणि पाण्याची पाइपलाइन टाकण्याची कामे सुरू आहेत. त्यामुळे आयुक्तालयातील सर्वच शहरांत वाहतूककोंडीचा प्रश्न जटिल होऊन बसला आहे. अशातच वाहतूक पोलिसांची संख्या अपुरी असल्याने ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि इतर नगरपालिका तसेच महापालिकांनीही वाहतूककोंडी सोडवण्यासाठी वॉर्डन दिले आहेत. मेट्रोचे काम सुरू केल्यावर त्यांच्याकडे मनुष्यबळाची मागणी केली आणि त्यातील ४० वॉर्डन मिळाले. अद्याप १० वॉर्डन मिळणे बाकी असल्याचे सूत्रांनी सांगितले.
वॉर्डनला प्रशिक्षण दिले जाते
वॉर्डन मिळाल्यावर त्यांना वाहतुकीसंबंधात प्रशिक्षण दिले जाते. त्यांना चालकांकडून परवाना मागण्याचा अधिकार नाही. अशा प्रकारे गैरवर्तन झाल्यास त्याला तातडीने संबंधित कंपन्यांकडे पाठवले जात असल्याचे वाहतूक शाखेने सांगितले.
वाढती वाहनसंख्या आणि लोकसंख्येच्या तुलनेत वाहतूक शाखेचे मनुष्यबळ अपुरे आहे. ही संख्या तीन हजारांच्या घरात असणे अपेक्षित आहे. ती वाढण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. कोंडी सोडवण्यासाठी महापालिकांकडून वॉर्डन मिळाले आहेत. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी ६०० होमगार्ड मिळावे, अशी मागणीही केली आहे.
- अमित काळे, उपायुक्त, वाहतूक शाखा, ठाणे