१०वी उत्तीर्ण झालेल्या ९ विद्यार्थ्यांना लॅपटॉप तर ३०० विद्यार्थ्यांना भेटवस्तू मिळणार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2019 08:04 PM2019-07-03T20:04:03+5:302019-07-03T20:04:10+5:30
पालिका शाळेतील ८ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर रोख देऊन त्यांचे कौतुक करण्याचा निर्णय महापालिकेच्या महिला बालकल्याण समितीने घेतला आहे.
मीरारोड - मीरा-भाईंदर शहरात राहणा-या तसेच शहरातील शाळेत शिकणाराया उच्च गुणांनी उत्तीर्ण १० वीच्या ९ विद्यार्थ्यांना लॅपटॉप , ३०० विद्यार्थ्यांना भेटवस्तू तर पालिका शाळेतील ८ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर रोख देऊन त्यांचे कौतुक करण्याचा निर्णय महापालिकेच्या महिला बालकल्याण समितीने घेतला आहे. लॅपटॉप, भेटवस्तूसह एकूणच कार्यक्रमाचा मिळून सुमारे ९ लाखांचा खर्च होणार आहे.
महिला बालकल्याण समितीची नुकतीच बैठक झाली. सदर बैठकीत शहरातून १० वीच्या परीक्षेत सर्वात जास्त गुण मिळवणा-या महाराष्ट्र राज्य बोर्ड, आयसीईएस व सीबीएससी बोर्डातील प्रत्येकी ३ विद्यार्थ्यांना लॅपटॉप देण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रस्तावानुसार एका लॅपटॉपची किंमत ४० हजार रुपयांच्या घरात असल्याचे नमूद आहे.
या शिवाय ९० टक्के पेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या ३०० विद्यार्थ्यांना प्रत्येकी बाराशे रुपये किमतीची बॅग वा भेटवस्तू दिली जाणार आहे. समितीच्या वतीने केवळ १० वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा भेटवस्तू देऊन सत्कार केला जायचा. पण यंदापासून महापालिका शाळांमधून ८ वी उत्तीर्ण होऊन दुस-या शाळेत ९ वी मध्ये प्रवेश घेणा-या ३ विद्यार्थ्यांना अनुक्रमे १५ हजार, १३ हजार व ११ हजार रुपयांची रक्कम देऊन त्यांचे देखील कौतुक करण्याचा निर्णय समितीने घेतला आहे. सदर विद्यार्थ्यांना प्रशस्तिपत्रक दिले जणार आहे.
समिती सभापती दीपिका अरोरा, उपसभापती वंदना भावसार, प्रभाग समिती सभापती विणा भोईर, अर्चना कदम, हेतल परमार, गीता परदेशी, कुसुम गुप्ता आदी समिती सदस्यांनी मिळून हा निर्णय घेतला आहे. या आधी विद्यार्थ्यांना टॅब देण्यात आले होते. समितीच्या वतीने दिल्या जाणा-या लॅपटॉप, भेट वस्तू लवकरच कार्यक्रमाचे आयोजन करून दिल्या जाणार आहेत. नाव नोंदवण्यासाठी ९० टक्के पेक्षा जास्त गुण मिळवणा-या विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी प्रभागातील स्थानिक नगरसेवक किंवा महापालिका मुख्यालयातील महिला बाल कल्याण समिती कार्यालयाशी संपर्क साधावा असे पालिकेकडून सांगण्यात आले.