९० टक्के सोसायट्यांत कचराप्रक्रियाच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 03:10 AM2018-04-13T03:10:46+5:302018-04-13T03:10:46+5:30
सोसायट्यांनी कचऱ्यावर प्रक्रिया करावी यासाठी पालिकेने विविध प्रकारची जनजागृती केली. त्यानुसार केवळ १० टक्केच सोसायट्यांनी त्याची अंमलबजावणी केली आहे.
ठाणे : शहरातील सोसायट्यांनी कचऱ्यावर प्रक्रिया करावी यासाठी पालिकेने विविध प्रकारची जनजागृती केली. त्यानुसार केवळ १० टक्केच सोसायट्यांनी त्याची अंमलबजावणी केली आहे. त्यामुळे प्रशासनाने आता ज्या सोसायट्या कच-याची विल्हेवाट लावणार नाहीत, त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याची तयारी सुरू केली. या आठवडाभरात अशा सोसायट्यांना पुन्हा एकदा नोटीस पाठवण्यात येणार आहे. त्यानंतर मात्र गुन्हे दाखल करण्याबरोबरच मे पासून त्यांचा कचरा उचलणे बंद करणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ नुसार स्थानिक पोलीस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा दाखल झाल्यानंतर तरी निदान या सोसायट्या कच-यावर प्रक्रियेसाठी पुढाकार घेतील, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. सोसाट्यांमध्ये असलेला संभ्रम आणि महापालिकेनेच कच-यावर प्रक्रियेसाठी एखादी एजन्सी नेमून द्यावी या प्रतीक्षेत काही सोसायट्या असल्याने अजूनही त्यांनी कच-यावर प्रक्रियेस सुरुवात केलेली नाही. महापालिकेने यासाठी अनेक स्तरावर सोसायट्यांची तसेच नागरिकांमध्ये जनजागृतीसाठी पुढाकार घेऊन बॅनर तसेच पोस्टर लावून जनजागृती केली. मात्र, पालिकेच्या प्रयत्नांना म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही.
>...म्हणून करणार कारवाई
ठाण्यातील १ हजारांपेक्षा अधिक सोसायट्यांना ठाणे महापालिकेच्या वतीने यापूर्वीच नोटीस पाठवल्या असून ज्या सोसायट्या, मॉल तसेच हॉस्पिटलचा दररोजचा कचरा १००० किलोपेक्षा जास्त निर्माण होतो. तसेच ज्या सोसायट्यांचे क्षेत्रफळ ५ हजार चौरस फुटांपेक्षा जास्त आहे, अशांनी स्वत:च कच-याची विल्हेवाट लावण्याचे बंधन आहे. सुरुवातीला महापालिकेने कच-याची विल्हेवाट लावण्याचे आवाहनदेखील केले. मात्र, तरीही प्रतिसाद न आल्याने काही दिवसांपूर्वी महापालिकेने अशा सोसायट्यांच्या कचरा उचलणे बंद केले. त्यानंतर त्यांना मार्चपर्यंत कचºयाची विल्हेवाट सोसायटीमध्येच लावण्याची मुदत दिली. परंतु,आतापर्यंत केवळ ८ ते १० टक्के सोसायट्यांनी त्यास सुरुवात केलेली आहे. अशा प्रकारचे प्लान्ट निर्माण करून तो चालवण्यासाठी वेळच नसल्याचे काही सोसायट्यांचे म्हणणे आहे. मात्र, आता पुन्हा एकदा महापालिकेने नोटीस देऊन गुन्हे दाखल करण्याचे निश्चित केले आहे. तसेच मे पर्यंत कच-यावर प्रक्रियेस सुरुवात केली नाही तर कचरा उचलण्याचेदेखील बंद करणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.