ठाण्यातील अभिनय कट्ट्याने दिली अभिषेकला जगण्याची संजीवनी, कट्ट्यावर सादर केली एकांकिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 04:51 PM2017-11-27T16:51:59+5:302017-11-27T16:58:59+5:30
अंथरुणाला खिळलेला अभिषेक जाधव पुन्हा एकदा अभिनय कट्ट्याच्या रंगमंचावर उभा राहीला आणि सांगून गेला गोष्ट तुझी नी माझी.
ठाणे : आपल्या कलेच्या जीवनात अभिषेक जाधवचा प्रवास सुकर सुरु असताना त्याला एका दीर्घ आजाराने ग्रासले. परंतू अभिनय कट्ट्याचे संस्थापक - अध्यक्ष किरण नाकती यांच्यावर असलेला दृढ विश्वास आणि कट्ट्याची ओढ यांमुळे त्याने आपल्या आजारावर मात करीत रविवारच्या कट्ट्यावर तो उभा राहीला. गोष्ट तुझी माझी या एकांकिकेतून त्याने स्वत: भूमिका साकारली.
अभिनय कट्ट्यावर विविध सादरीकरणांच्या माध्यमातून आपली उल्लेखनीय भूमिका निभाविणारा अभिषेकला एका दीर्घ आजाराने ग्रासले, तो पलंगाला खिळून राहीला आणि वर्षभर कट्ट्याच्या रंगमंचापासून अलिप्त राहीला. या गोष्टीची मात्र त्याला सतत खंत होती. माझे काहीही होण्याआधी एकदा तरी मला कट्ट्यावर सादरीकरण करण्याची त्याने इच्छा व्यक्त केली. परिस्थीती चिंताजनक होती. परंतू किरण नाकती यांनी त्याला कट्ट्यावरील सादरीकरणापासून तुला कोणताही आजार रोखू शकणार नाही हा शब्द दिल्यावर हळूहळू त्याच्यापुढे आजारपणही फिके पडू लागले आणि चालताही न येणारा अभिषेक रंगमंचावर वावरू लागला. त्याचा आत्मविश्वास वाढविणारा प्रवास आता सुरु झाला आणि अभिनय कट्टा अभिषेकला जगण्याची संजीवनी देऊ लागला. त्याने चक्क एक एकांकिका स्वत: लिहीली आणि ही एकांकिका ३५२ क्रमांकाच्या कट्ट्यावर सादर झाली. ‘गोष्ट तुझी माझी’ या एकांकिकेचे फक्त लेखनच नव्हे तर प्रमुख भूमिका सुद्धा त्याने साकारली. या एकांकिकेच्या सादरीकरणाच्या माध्यमातून अभिषेकने पुन्हा एकदा त्याची इच्छा शक्ती किती प्रबळ आहे हे सिद्ध करून दाखवले. दिग्दर्शनाची धुरा गणेश गायकवाड याने सांभाळली तर इतर सहाय्यक भूमिकांमधून आरती ताथवडकर, वीणा छत्रे, गणेश गायकवाड, प्रशांत सकपाळ व अभिषेक सावळकर यांनी आपली चुणूक दाखवली.यावेळी अभिषेकचे संपूर्ण कुटुंब परिवार, त्याची मित्र मंडळी इतकेच नव्हे तर त्याचे डॉक्टर सुद्धा उपस्थित होते.