महिलांचे विनयभंग करणाऱ्यास सरावलेल्या विक्षिप्त तरुणाला कळव्यातून अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2018 06:21 PM2018-12-02T18:21:38+5:302018-12-02T18:28:45+5:30
कळव्यातील मनिषानगर भागात सकाळच्या वेळी महिलांचे विनयभंग करण्यास सरावलेल्या १९ वर्षीय विक्षिप्त तरुणाला कळवा पोलिसांनी शनिवारी अटक केली. त्याच्यावर दोन गुन्हे दाखल झाले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : इमारतीमध्ये दडून बसून सकाळी मुलांना शाळेत नेणा-या महिलांचे मागून येऊन विनयभंग करणा-या अतिक आरीफ अन्सारी (रा. कळवा) या १९ वर्षीय तरुणाला कळवा पोलिसांनी ५० वेगवेगळया सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे शनिवारी केली आहे. परिक्षेच्या कारणास्तव न्यायालयाने त्याला अंतरिम जामीन दिला आहे.
मनिषानगर गेट क्रमांक एक येथे ३० वर्षीय महिलेचा मागून येऊन त्याने विनयभंग केल्याची तक्रार शनिवारी दाखल झाली होती. या तक्रारीची पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी गंभीर दखल घेऊन आरोपीला शोधण्याचे आदेश दिल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांनी पाच पथके तयारी केली होती. या पथकांनी वेगवेगळया भागातील ५० सीसीटीव्हींची तपासणी केली. एका अंडे विक्रेत्याने ओळखल्यानंतर त्याला १ डिसेंबर रोजी अटक करण्यात आली. दीड महिन्यांपूर्वीही मनिषानगर भागात ३५ वर्षीय महिलेचाही त्याने अशाच प्रकारे विनयभंग केला होता. हा गुन्हाही त्या महिलेने रविवारी दाखल केला. या तरुणाने पहिला प्रकार केल्यानंतर त्याची तक्रार न झाल्याने तो असे घृणास्पद प्रकार करण्यास सरावला. अशा प्रकारे कोणीही विनयभंग किंवा छेडछाड करीत असेल तर महिलांनी न डगमगता तक्रारीसाठी पुढे यावे, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांनी केले आहे.