बिहारच्या तुरूंगातून पळालेला तिहेरी खुनाचा आरोपी ठाण्यात जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2018 07:01 PM2018-01-04T19:01:48+5:302018-01-04T19:08:00+5:30
तिहेरी खून प्रकरणात राष्ट्रपतींकडून फाशीची शिक्षा रद्द झाल्यानंतर बिहारच्या तुरूंगातून पळालेल्या एका कैद्यास ठाणे पोलिसांनी बुधवारी सायंकाळी अटक केली. फरारीच्या काळात त्याने खून प्रकरणातील साक्षीदारांना धमक्याही दिल्या.
ठाणे : तिहेरी खून प्रकरणामध्ये शिक्षा भोगताना बिहारमधील बक्सर तुरूंगातून पळालेल्या कैद्यास ठाणे पोलिसांनी बुधवारी अटक केली. बिहार पोलिसांना या कारवाईची माहिती देण्यात आली आहे.
बिहारमधील पूर्व चंपारन जिल्ह्यातील इंद्रगाची येथील परजितकुमार रामबढाई सिंग (३९) याने किरकोळ कारणावरून तिघांचा खून केला होता. १0 एप्रिल १९९८ रोजी याप्रकरणी टाऊन पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यामध्ये परजितकुमारची फाशीची शिक्षा सर्वोच्च न्यायालयानेही कायम ठेवली होती. राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज केला असता, त्याची फाशीची शिक्षा रद्द होऊन जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. बिहारमधील बक्सर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असताना परजितकुमार आणि इतर गुन्ह्यांमधील चार आरोपी ३0 डिसेंबर २0१६ रोजी तुरूंगातून पळून गेले. धोतरांचा दोरीसारखा वापर करून ते तुरूंगाच्या भिंतींवरून उतरले होते. या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली होती. तुरूंगातून पळून गेल्याप्रकरणी बक्सर टाऊन पोलीस ठाण्यात परजितकुमार, सोनू सिंह, सोनू पांडे, देवधारी राय आणि उपेंद्र सहा यांच्याविरूद्ध ३१ डिसेंबर २0१६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. त्यापैकी सोनू पांडे आणि देवधारी राय यांना अटक करण्यात बिहार पोलिसांना यश आले. परजितकुमारसह उर्वरित तीन आरोपी फरारच होते.
तुरूंगातून पळाल्यापासून परजितकुमार त्याचे वास्तव्य वेळोवेळी बदलत होता. अवघ्या वर्षभरात त्याने दिल्ली, कोलकाता, गुजरात, नाशिक, मुंबई, ठाणे तसेच नेपाळ आदी ठिकाणी वास्तव्य केले. बिहारमधील बेथिया जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक विनयकुमार तसेच या गुन्ह्याचे तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक मनिषकुमार यांनी ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांना ही माहिती दिली. गुन्हे अन्वेषण शाखेने तीन पथके तयार करून तीन महिने त्याचा शोध घेतला. बुधवारी भीमा कोरेगाव येथील घटनेच्या पार्श्वभूमिवर संपूर्ण पोलीस यंत्रणा प्रचंड व्यस्त असताना गुन्हे अन्वेषण शाखेला परजितकुमारची ठोस माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचून त्याला ठाण्यातील सिडको बसथांब्याजवळून बुधवारी सायंकाळी ताब्यात घेतले. त्याला बिहार पोलिसांच्या स्वाधीन करण्यात येत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकार्यानी गुरूवारी पत्रकार परिषदेत दिली.
खंडणीसाठी साक्षीदारांना धमक्या
फाशीची शिक्षा राष्ट्रपतींनी रद्द केल्यानंतर परजितकुमारने त्याचा पुरेपूर गैरफायदा घेतला. तुरूंगातून पळाल्यानंतर त्याने महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि गुजरातसह नेपाळमध्येही वास्तव्य केले. यादरम्यान त्याने बिहारमधील काही लोकांना खंडणीसाठी धमक्या दिल्या. त्याच्याविरूद्ध दाखल असलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील साक्षीदारांनाही त्याने धमकावले. त्यांना १0 लाख रुपये खंडणीची मागणी त्याने केली. पंचारण जिल्ह्यातील कालीबाग टाऊन पोलीस ठाण्यात याप्रकरणी त्याच्याविरूद्ध १४ डिसेंबर २0१७ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.