रुग्णाच्या मृत्यूनंतर डोंबिवलीत पुन्हा रुग्णालयाची तोडफोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2018 02:07 AM2018-01-08T02:07:24+5:302018-01-08T02:07:57+5:30
रुग्णाच्या मृत्यूप्रकरणी कल्याणच्या होलीक्रॉस रुग्णालयाची तोडफोड झाल्याच्या घटनेला महिना उलटत नाही, तोच डोंबिवलीमधील एम्स रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाइकांनी तोडफोड केल्याची घटना रविवारी घडली.
डोंबिवली : रुग्णाच्या मृत्यूप्रकरणी कल्याणच्या होलीक्रॉस रुग्णालयाची तोडफोड झाल्याच्या घटनेला महिना उलटत नाही, तोच डोंबिवलीमधील एम्स रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाइकांनी तोडफोड केल्याची घटना रविवारी घडली. घटनेत रुग्णालयातील काचेच्या प्रवेशद्वाराची आणि एलसीडी टीव्हीची तोडफोड करण्यात आली. शस्त्राने केलेल्या हल्ल्यात रुग्णालयातील वाहनचालक अजय जाधव जखमी झाला.
घेसर-निळजे परिसरात राहणारी नीलम पाटील ही न्यूमोनिया या आजाराने त्रस्त होती. तिला फुफफुसाचा संसर्गही झाला होता. मध्यरात्री तिला उपचारासाठी एम्स रुग्णालयात आणण्यात आले होते. मात्र, रविवारी तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर रुग्णालयात उपस्थित नातेवाइकांनी दरवाजा, टीव्हीची तोडफोड केली. सुरक्षा कर्मचाºयांच्या समक्ष हा तोडफोडीचा प्रकार घडला. हल्ल्याची माहिती स्थानिक मानपाडा पोलिसांना मिळताच वरिष्ठ निरीक्षक गजानन काब्दुले यांनी घटनास्थळी धाव घेतली. तोडफोड करणाºयांवर गुन्हे दाखल करणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. एम्सचे संचालक डॉक्टर मिलिंद शिरोडकर आणि इंडियन मेडिकल असोसिएशनचे राष्ट्रीय सहसचिव डॉ. मंगेश पाटे हेही रुग्णालयात दाखल झाले. रुग्णालय हल्ल्याप्रकरणी मृताच्या नातवाईकांनी बोलण्यास नकार दिला.
प्रकृती गंभीर असल्याचा दावा -
नीलमला रुग्णालयात आणण्यात आले, त्याच वेळी तिची प्रकृती गंभीर होती. प्रकृती चिंताजनक असल्याने तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. न्यूमोनियाच्या आजाराने त्रस्त असलेल्या नीलमला फुफफुसाचा संसर्ग झाल्याने त्यात तिचा मृत्यू झाल्याचे स्पष्टीकरण एम्सचे जनसंपर्क अधिकारी अवधेश शर्मा यांनी दिले.