ठाणे पोलिसांच्या सतर्कतेमुळे पाच वर्षांनंतर परभणीच्या मुलाला मिळाले आईवडिलांचे छत्र

By जितेंद्र कालेकर | Published: December 18, 2017 11:30 PM2017-12-18T23:30:08+5:302017-12-18T23:30:08+5:30

परभणीतून ठाण्यात चार वर्षांपूर्वी आलेल्या १४ वर्षीय मुलाला त्याच्या पालकांच्या ताब्यात देण्यात ठाण्याच्या नौपाडा पोलिसांना यश आले आहे. एका मोबाईल चोरीच्या चौकशीतून पोलिसांनी हा उलगडा केला.

After five years due to alertness of Thane police, Parbhani's son received parental umbrella | ठाणे पोलिसांच्या सतर्कतेमुळे पाच वर्षांनंतर परभणीच्या मुलाला मिळाले आईवडिलांचे छत्र

ठाणे पोलिसांच्या सतर्कतेमुळे

Next
ठळक मुद्देएका चोरीच्या चौकशीतून उलगडले सत्यचोर भलताच असल्यामुळे महिलेने तक्रार घेतली मागेव्हॉटसअ‍ॅपच्या सहाय्याने पोलिसांना लावला पालकांचा शोध

जितेंद्र कालेकर
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : एका मोबाईल चोरीच्या प्रकरणामध्ये ताब्यात घेतलेल्या मुलाची कसून चौकशी केल्यानंतर तो परभणीचा असून तो घरातून पळून आल्याची माहिती उघड झाली. खरा चोर दुसराच असल्याचे माहिती झाल्यानंतर व्हॉटसअ‍ॅपच्या आधारे नौपाडा पोलिसांनी या मुलाला त्याच्या पालकांच्या स्वाधीन केले. पाच वर्षांनी आपला मुलगा पुन्हा मिळाल्याने या पालकांचा आनंद गगनात मावत नव्हता.
ठाणे रेल्वे स्थानकातील सॅटीस परिसरात असलम सलीम शेख (१४) हा मुलगा गेल्या काही दिवसांपासून महिलांची सौंदर्य प्रसाधने फेरीने विक्रीचा व्यवसाय करीत होता. नामदेववाडीत राहणा-या ठाणे महापालिकेच्या सफाई कामगार शुभांगी देवधर यांनी त्याला चार महिन्यांपूर्वी मोबाईल दिला हाता. या मोबाईलवर तो ‘गेम’ खेळत असे. पण या मोबाईलसह तो अचानक बेपत्ता झाला. नंतर त्याची आणि देवधर यांची भेटच झाली नाही. १५ डिसेंबर रोजी तो पुन्हा ठाणे रेल्वे स्थानक परिसरात विक्री करतांना आढळला. तेंव्हा त्याला घेऊन त्या नौपाडा पोलीस ठाण्यात आल्या. सहायक पोलीस निरीक्षक हणमंत ओऊळकर यांनी त्याची विचारपूस केली तेव्हा तो वेगवेगळी उत्तरे देत होता. अखेर विश्वासात घेतल्यानंतर त्याने परभणीतून पळून आल्याचे सांगितले. पळून येण्याचे नेमके कारण सांगितले नाही. पण, गेल्या चार ते पाच वर्षांपूर्वीच एका रेल्वेने ठाण्यात आल्याचे तो म्हणाला. ज्या मोबाईल चोरीबाबत त्याच्यावर संशय होता. तो मोबाईल मात्र त्याच्याकडून एका गर्र्दुल्याने हिसकावून पळ काढला होता. त्यामुळे आता मोबाईल त्या महिलेला द्यायचा कसा? या भीतीने त्याने तिला तोंड दाखविले नव्हते. या सर्वच बाबींचा उलगडा झाल्यामुळे देवधर यांनीही मोबाईल जुना होता. त्यामुळे आपली या मुलाविरुद्ध काहीच तक्रार नसल्याचे पोलिसांना सांगितले.
मुलाने दिलेला परभणीतील पाथरी, गुलशननगर येथील पत्ता तसेच शाळा आणि शिक्षकांच्या माहितीच्या आधारे तसेच आई नजमा, मामा फारुख अशा खाणाखुणा त्याने सांगितल्यानतर हा मुलगा खरोखर चार वर्षांपूर्वीच परभणीतून बेपत्ता झाल्याची बाब चौकशीत उघड झाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव, निरीक्षक प्रकाश पाटील आणि सहायक पोलीस निरीक्षक ओउळकर यांनी व्हॉटसअ‍ॅपवरुन त्याचा फोटो परभणीच्या पाथरी पोलिसांना पाठविला. तेथील एका लोकप्रतिनिधीकडूनही याबाबतची खात्री झाली. असलम सुखरुप असल्याची माहिती मिळाल्यानंतर परभणीतील त्याचा चुलत भाऊ अमिर शेख रशीद आणि आत्ये भाऊ शफी शेख हे ठाण्यात आले. नौपाडा पोलिसांनी शनिवारी रात्री असलमला अखेर त्याच्या नातेवाईकांच्या सुपूर्द केले. पाच वर्षांनंतर आपला मुलगा सुखरुप मिळाल्यानंतर शेख कुटूंबियांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
‘माणूसकीच्या भावनेतून घेतला शोध’
असलमची सुरुवातीलाच विचारपूस करणा-या सहायक पोलीस निरीक्षक हणमंत ओऊळकर यांनी आपण माणूसकीच्या भावनेतून या मुलाच्या पालकांचा शोध घेतल्याचे ‘लोकमत’ला सांगितले. तो आता वाम मार्गाला नसला तरी अगदी लहान वयात आई वडीलांपासून दुरावला. शिवाय, ठाण्यासारख्या अनोख्या शहरात त्याचे कोणीही नातेवाईक नाही. तो आणखी कोठेही भरकटू नये किंवा भविष्यात कोणत्याही वाम मार्गाला लागू नये म्हणून त्याच्या नातेवाईकांची भेट होईपर्यंत पोलीस ठाण्यातच दोन दिवस आस्थेने त्याचा सांभाळही केला. त्याला त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात सुपूर्द केल्यानंतर आम्हालाही समाधान लाभल्याचे ते म्हणाले.

Web Title: After five years due to alertness of Thane police, Parbhani's son received parental umbrella

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.