रस्ता रुंदीकरणानंतर वाढीव बांधकाम केलेल्या वाणिज्य गाळेधराकांकडून रेडी रेक्नरनुसार भुईभाडे वसुल करणार ठाणे महापालिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2018 03:09 PM2018-02-06T15:09:15+5:302018-02-06T15:11:21+5:30
शासकीय जागेत वाढीव बांधकाम केल्याने आता ठाणे महापालिकेने रस्ता रुंदीकरणातील वाणिज्य गाळेधारकांना नोटीसा बजावण्याची मोहीम हाती घेण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार या गाळेधारकांकडून रेडीरेक्नर नुसार भाडे वसुल केले जाणार आहे.
ठाणे - ठाण्याच्या विविध भागात रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात आले आहे. विस्थापितांच्या विरोधाशिवाय ठाणे शहरात रस्ता रुंदीकरणाची मोहीम पार पडली. परंतु या रस्ता रुंदीकरणानंतर आता या रस्त्याच्या बाजूलाच अनेक वाणिज्य गाळेधारकांनी पालिकेची परवानगी न घेता, वाढीव बांधकाम केले आहे. त्यामुळे आता शासकीय जागेत वाढीव बांधकाम केल्याने आता त्यांच्याकडून रेडी रेक्नरनुसार भूईभाडे वसुल करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यानुसार अशा वाणिज्य वापराच्या गाळेधारकांचा सर्व्हे पालिकेकडून सुरु झाला असून येत्या एक ते दोन दिवसात त्यांना नोटीसा बजावल्या जाणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले.
ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या मार्फत मागील काही महिन्यांपासून शहरातील विविध भागातील रस्त्यांचे रुंदीकरणाची मोहीम राबविली जात आहे. पोखरण रोड क्र मांक एकच्या रस्त्यावर तर अनेक व्यावसायीक गाळे आणि इमारतींवर कारवाई करून एवढा प्रशस्त रस्ता करताना कुठेही वाद उद्भवला नाही. या रस्त्या बरोबरच पोखरण २, तीन, सर्व्हीस रस्ते, ठाणे स्टेशन परिसरातील गजबजलेला मार्केट परिसर रस्ता, शास्त्री नगर, हत्तीपुल रस्ता, कळवा, मुंब्रा आदी भागातील रस्त्यांचे पालिकेने रुंदीकरण केले.
एकूणच या सर्वच रुंदीकरणाच्या कारवाई करीत असतांना पालिकेला कोणत्याही प्रकारची अडथळ्यांची शर्यत पार करावी लागली नाही. परंतु आता रस्ता रुंदीकरणानंतर काही वाणिज्य गाळेधराकांनी त्याच रस्त्यांमध्ये शिल्लक राहिलेल्या गाळ्यांवर वाढीव बांधकाम केले आहे. ते नियमाला धरुन नसल्याचे पालिकेचे म्हणने आहे. या व्यावसायिक गाळेधारकांकडून पालिका केवळ मालमत्ता कराचीच वसुली करीत आहे. परंतु आता त्यांच्याकडून भुई भाडे देखील वसुल करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. संबधींत गाळेधारकांनी शासकीय जागेत बांधकाम केले असल्याने नियमानुसार आता त्यांच्याकडून रेडी रेक्नरनुसार भाडे वसुल केले जाणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. त्यानुसार आतापर्यंत १५० गाळेधारकांचा सर्व्हे पूर्ण झाला असून अद्यापही हा सर्व्हे सुरुच आहे. त्यामुळे हा आकडा एक हजारांच्या आसपास किंवा त्याहीपेक्षा वाढण्याची चिन्हे असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. त्यांच्याकडून आता एकदाच रेडीरेक्नरनुसार भुई भाडे वसुल केले जाणार संबधींतांना नोटीस बजावण्याची कारवाई येत्या एक ते दोन दिवसात सुरु होईल अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांनी दिली.