टिएमटीच्या सावळ्या गोंधळला आता पालिका घालणार लगाम, संगणकाने जोडले जाणार सर्व विभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 04:11 PM2017-11-15T16:11:47+5:302017-11-15T16:19:08+5:30
परिवहनच्या बेफान कारभाराला लगाम घालण्यासाठी, ठाणे महापालिकेने आता पावले उचलली आहेत. त्यानुसार आता ई. आर. पी. या संगणक प्रणालीचा आधार घेतला जाणार आहे. त्यामाध्यमातून परिवहनचा कारभार सुधारण्याचा पालिकेचा मानस आहे.
ठाणे - ठाणे परिवहन सेवेतील सावळ्या गोंधळाला लगाम घालण्याचा निर्णय ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घेतला आहे. त्यानुसार परिवहनची कार्यशाळा, बसेस दुरुस्तीसाठी आलेले पार्ट्स आणि एकूणच कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी ठाणे महापालिका ई. आर. पी. (इंटरप्रायजेस रिर्सोस प्लॅनींग) ही संगणक प्रणालीचा वापर करणार आहे. या माध्यमातून सर्व यंत्रणांना संगणाद्वारे जोडण्यात येणार असून प्रत्येक विभागातील प्रत्येक मिनिटा मिनिटांच्या घडामोडी यामाध्यमाूतन टिपल्या जाणार आहेत. शिवाय यासाठी एक कमांड सेंटर देखील कार्यान्वित केले जाणार असून या माध्यमातून प्रत्येकावर नियंत्रण ठेवले जाणार आहे. यासाठी ८ कोटी ५० लाखांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे.
ठाणे परिवहन सेवेत आजच्या घडीला ३५० हून अधिक बसेस आहेत. परंतु जीसीसी वगळता परिवहनच्या स्वत:च्या केवळ ९० च्या आसपासच बसेस रस्त्यावर धावत आहेत. सध्या परिवहनच्या २७० च्या आसपास बसेस रस्त्यावर धावत आहेत. जीसीसी कंत्राटदारामुळे परिवहन सेवेला काहीसा दिलासा मिळाला आहे. असे असले तरी मागील कित्येक वर्षापासून कार्यशाळेची सुरु असलेली बोंब, किती साहित्य आले कीती वापरले गेले, टायर किती आले, स्पेअरपार्ट्स किती आले, कोणता कर्मचारी कामावर आला कोणता गेला, बस वेळेवर धावत का नाही, बसेस दुरुस्तीसाठी केव्हा पासून आगारात उभ्या आहेत, किती वेळेत त्या दुरुस्त होणे अपेक्षित आहेत. यासंह येथील कर्मचाऱ्यांवर देखील कोणत्याही प्रकारे अंकुश ठेवण्यात येत नव्हता. याच मुद्यावरुन कित्येक वेळेला परिवहन समित्याच्या बैठकीतही कार्यशाळा आणि एकूणच परिवहनच्या या कार्यप्रणालीचे वाभाडे काढण्यात आले आहेत. परिवहनच्या कर्मचाऱ्यांना शिस्त लागावी, किती सामान आले, किती वापरले गेले आहे, याची माहिती उपलब्ध व्हावी, किंबहुना त्यांचे रेकॉर्ड उपलब्ध व्हावेत अशी मागणी कित्येक वेळेला लावून धरण्यात आली आहे.
दरम्यान, त्यानुसार मागील दोन वर्षापासून परिवहनला शिस्त लावण्यासाठी पालिकेकडून या प्रणालीचा वापर करण्याचा विचार सुरु होता. परंतु, निधी अभावी हे काम पालिकेला करता येत नव्हते. अखेर आता दोन वर्षानंतर पालिकेने परिवहनच्या कारभाराला अकुंश लावण्यासाठी ई. आर. पी. प्रणालीचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी या प्रणालीचा यशस्वी वापर नवी मुंबई परिवहन सेवेने केला आहे. त्यानंतर आता ठाणे परिवहन सेवेतही या प्रणालीचा वापर केला जाणार आहे. त्यानुसार परिवहनचा सर्व कारभार आता संगणीकृत करण्यात येणार असून काय आले काय गेले, कोणते साहित्य वापरले गेले, बसेसची वेळेत दुरुस्ती झाली का, कर्मचारी किती वाजता आला किती वाजता गेला, यासह सर्व माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. यामुळे परिवहनच्या सावळ्या गोंधळाच्या कारभाराला अंकुश बसणार असून परिवहन सेवा सुरळीत सुरु होण्यास मदत होणार असल्याचे मत परिवहनचे प्रभारी व्यवस्थापक संदीप माळवी यांनी व्यक्त केले. तसेच कमांड सेंटर देखील उभारण्यात येणार असल्याने त्यामाध्यमातून सर्व डेटा सेव्ह केला जाणार आहे. या कामासाठी खाजगी संस्थेची मदत घेतली जाणार असून, पुढील पाच वर्षासाठी हे काम संबधींत संस्थेला दिले जाणार आहे. डेटा सेंटरच्या ठिकाणी त्या संस्थेचे कर्मचारी आणि टिएमटीचे देखील काही कर्मचारी काम करणार आहेत.