घोडबंदरच्या सर्व्हिस रोडचे सर्व गॅरेज आजपासून बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2019 12:17 AM2019-01-04T00:17:58+5:302019-01-04T00:18:10+5:30
मेट्रोसाठी आवश्यकतेनुसारच बॅरिकेड्स लावावेत. सेवारस्त्यांवरील पार्किंग बंद करावी. जलवाहिनी आणि मलनि:सारणवाहिनी टाकण्याचे काम एकाच वेळी करावे, असे स्पष्ट निर्देशही आयुक्तांनी दिले.
ठाणे : मेट्रोसह महापालिकेच्या विविध विभागांची मुख्य आणि सेवारस्त्यांवर सुरू असलेली कामे, अनधिकृत पार्किंग आणि गॅरेजचालकांनी रस्ते अडवल्याने घोडबंदरला होणारी वाहतूककोंडी सोडवण्यासाठी कापूरबावडी ते भार्इंदरपाड्यापर्यंतच्या दोन्ही बाजंूच्या सर्व्हिस रोडवरील गॅरेज शुक्रवारपासून बंद करण्याचे आदेश पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी गुरुवारी दिले.
मेट्रोसाठी आवश्यकतेनुसारच बॅरिकेड्स लावावेत. सेवारस्त्यांवरील पार्किंग बंद करावी. जलवाहिनी आणि मलनि:सारणवाहिनी टाकण्याचे काम एकाच वेळी करावे, असे स्पष्ट निर्देशही आयुक्तांनी दिले. घोडबंदरच्या कोंडीचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच, आयुक्तांनी तत्काळ बैठक घेतली. या वाहतूककोंडीचा फटका आपल्यालाही सहन करावा लागत असल्याची कबुली आयुक्तांनी दिली. कोंडी टाळण्यासाठी मानपाड्यावरून आतील रस्त्यावरून मुख्यालयात जात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. एमएमआरडीए, मेट्रो, वाहतूक पोलीस आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांना तातडीने उपाय करण्याचे आदेश त्यांनी दिले. मलनि:सारणवाहिनीचे ब्रह्मांड ते डी मार्टपर्यंतचे काम १५ जानेवारीपर्यंत पूर्ण करावे, उर्वरित काम टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्याच्या आणि मेट्रोच्या कामासाठी आवश्यकतेनुसारच बॅरिकेडस् लावण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
सेवा रस्त्यांवर एकाच बाजूने पार्किंग
घोडबंदरचे दोन्ही बाजूंचे सेवारस्ते गॅरेजचालकांनी व्यापल्याने कोंडीत भर पडते. त्यामुळे कापूरबावडी ते भार्इंदरपाडापर्यंत सर्व गॅरेज शुक्रवारपासून बंद करण्याचे आदेश आयुक्तांनी वाहतूक पोलिसांसह पालिकेच्या अधिकाºयांना दिले. याशिवाय, सेवारस्त्याच्या डाव्या बाजूला एकाच लेनमध्ये वाहने उभी करावीत, अशी सूचनाही त्यांनी केली. विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस सुहास देसाई यांनी या आशयाच्या मागणीचे पत्र आयुक्तांना दिले होते.
अंतर्गत रस्त्यांच्या कामांचे स्टेटस तपासून निविदा काढा
वाहतूककोंडीवर उपाय करण्यासाठी या अंतर्गत रस्त्यांची कामे सद्य:स्थितीत कोणत्या पातळीवर आहेत, निविदा काढल्या गेल्या आहेत किंवा नाही, हे तपासताना त्या लवकर काढून ही कामे जूनपर्यंत पूर्ण करावीत, असेही त्यांनी सांगितले.
सुरळीत वाहतुकीसाठी अतिरिक्त वॉर्डन
वाहतूककोंडी सोडवण्यासाठी वाहतूक पोलिसांचे बळ कमी पडत आहे. त्यासाठी मेट्रोनेसुद्धा या भागात वॉर्डन द्यावेत, तसेच महापालिकेच्या माध्यमातूनही अतिरिक्त वॉर्डन देण्याची कार्यवाही केली जाईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
बेवारस आणि जप्तीची वाहने हलवा : घोडबंदर भागात अनेक ठिकाणी बेवारस आणि पोलिसांनी जप्त केलेली वाहने सेवारस्त्यांवर उभी केली आहेत. ती तत्काळ हटवण्याची कारवाई करावी आणि ही वाहने ठेवण्यासाठी तूर्तास बोरिवडे येथील जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.
खोदकामासाठी इतर संस्थांशी दोन दिवसांत पत्रव्यवहार करा
सध्या घोडबंदर भागात जे खोदकाम सुरू आहे, त्या अनुषंगाने महावितरण असेल किंवा इतर खाजगी संस्थांना काही कामे करण्यासाठी खोदकाम करायची असतील, तर त्यांनी दोन दिवसांत पत्रव्यवहार करा, अशा सूचना देतानाच त्यानंतर जर खोदकामाकरिता संबंधितांनी परवानगी मागितली, तर ती दिली जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
खाजगी शाळांच्या बस रस्त्यावरून हटवणे
या भागात खाजगी शाळांच्या बसगाड्या या सेवारस्ता आणि मुख्य रस्त्यांवर उभ्या असतात, त्यामुळे त्यांच्यावरही कारवाई करावी किंवा संबंधित शाळा व्यवस्थापनाने शाळेच्या आवारात बस पार्किंगची सुविधा करून द्यावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
- जलवाहिन्या आणि मलनि:सारणवाहिन्या टाकण्याचे काम दोन्ही विभागांनी एकाचवेळी पूर्ण करावे. डाव्या बाजूकडील कामे पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत उजव्या बाजूकडील सेवारस्त्यांवर कामे करु नये. सेवारस्त्यावर खोदकाम पूर्ण झाल्यास, तिथे तत्काळ डांबरीकरण करण्याच्या सूचना आयुक्तांनी केल्या. या आदेशांचे पालन होत असल्याची खात्री करण्यासाठी दरमहा आढावा बैठक होणार आहे.