थीम पार्कमध्ये ८२ टक्यांचा भ्रष्टाचार, आमदार संजय केळकर यांचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 03:37 PM2018-10-15T15:37:49+5:302018-10-15T15:41:31+5:30
मागील काही दिवसापासून चर्चेत असलेल्या थीम पार्कची सोमवारी आमदार संजय केळकर यांनी पाहणी केली. या पाहणीत अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणाची आर्थिक गुन्हे शाखेमार्फत चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
ठाणे - ठाण्यातील थीम पार्कवर जो काही खर्च करण्यात आला आहे, तो तब्बल ८२ टक्यांपैक्षा जास्त असल्याची बाब समोर आली आहे. भाजपाने याबाबत इतर संस्थेकडून अंदाज खर्च काढला असता, तो दोन कोटींच्यावर जात नसल्याचा मुद्दा आमदार संजय केळकर यांनी उपस्थित केला आहे. याचाच अर्थ नंदलाल नंतर ठाणे महापालिकेत हा सर्वात मोठा ८२ टक्यांचा भ्रष्टाचार असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी आर्थिक गुन्हे शाखेमार्फत करण्यात यावी, तसेच या संदर्भात शासनाकडेही दाद मागितली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.
मागील काही दिवसापासून बॉलीवुड आणि थीम पार्कच्या मुद्यावरुन ठाणे शहर चांगलेच चर्चेत आले आहे. या प्रकरणाची चौकशी लागली असतांना पालिका प्रशासन अथवा सत्ताधाऱ्यांनी या थीम पार्कची पाहणी सुध्दा केलेली नाही. परंतु सोमवारी आमदार संजय केळकर, भाजपाचे गटनेते नारायण पवार, माजी गटनेते मिलिंद पाटणकर, सुनेश जोशी, कृष्णा पाटील, दिपा गावंड, प्रतिभा मढवी, नम्रता कोळी, स्नेहा आंब्रे, कमल चौधरी आदींनी केली. यावेळी पाहणीतच अनेक बाबी समोर आल्या आहेत. या ठिकाणी शिवाजी महाराजांचा पुतळा, अहिल्याबाई होळकर यांचा पुतळा, जेल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा, चर्च, तलावातील मंदीर आदींसह लॉन व इतर खर्च मिळून भाजपाचे माजी गटनेते मिलिंद पाटणकर यांनी इतर संस्थेकडून अंदाजखर्च काढला असता तो जास्तीत जास्त २ कोटींच्या आसपास जात आहे. याचे पुरावे सुध्दा त्यांनी सादर केले. परंतु या ठिकाणी ज्या महापुरषांचे पुतळे उभारण्यात आले आहेत, त्यांची अवस्थासुध्दा दयनीय झाली आहे. अनेक ठिकाणी वाळवी लागली आहे. तलावातील पाणी गढूळ झाले आहे. मागील चार महिन्यांचे वीज बिल अदा करण्यात न आल्याने या पार्कचा वीज पुरवठासुध्दा खंडीत करण्यात आला आहे. शौचालयांची अवस्था वाईट, पाण्याची सोय नाही आदींसह इतर महत्वाचे मुद्दे या पाहणीत दिसून आले आहेत.
एकूणच यापूर्वी शिवसेनेचे स्वर्गीय आनंद दिघे यांनी ४२ टक्यांचा नंदलाल घोटाळा समोर आणला होता. त्यानंतर हा ८२ टक्यांचा भ्रष्टाचार असल्याचा आरोप केळकर यांनी यावेळी केला आहे. त्यामुळे या प्रकरणाची आर्थिक गुन्हे शाखेमार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच शासनाकडेही याबाबत दाद मागितली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या प्रकरणात ठेकेदाराची चौकशी सुरु असतांना त्याच्याबरोबर भेटणे चुकीचे असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.