आमच्या घशाला कोरड का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 01:42 AM2017-07-29T01:42:25+5:302017-07-29T01:42:25+5:30
एकीकडे पावसाच्या सरींवर सरी येत असतानाही पश्चिमेतील काही भागांमध्ये पिण्याच्या पाण्याचे कमालीचे दुर्भिक्ष जाणवत आहे. विशेषत: फडके मैदान प्रभाग आणि बिर्ला कॉलेज प्रभागांमध्ये तीव्र पाणीटंचाई भेडसावत आहे.
कल्याण : एकीकडे पावसाच्या सरींवर सरी येत असतानाही पश्चिमेतील काही भागांमध्ये पिण्याच्या पाण्याचे कमालीचे दुर्भिक्ष जाणवत आहे. विशेषत: फडके मैदान प्रभाग आणि बिर्ला कॉलेज प्रभागांमध्ये तीव्र पाणीटंचाई भेडसावत आहे. त्यामुळे येथील रहिवाशांवर पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ ओढवली आहे. पाणीटंचाईबाबत वारंवार तक्रारी करूनही केडीएमसी प्रशासन ठोस कार्यवाही करत नसल्याने स्थानिक नगरसेवकही नाराज झाले आहेत.
फडके मैदान प्रभागातील साईबाबानगर, दुर्गानगर, महाराष्ट्रनगर, माता रमाबाई आंबेडकरनगर या विभागांमध्ये महिना-दीड महिन्यापासून पाणीटंचाई जाणवत असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. पाण्याअभावी बोअरिंग तसेच टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. यंदा मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. धरण भरले आहे, मग आमच्या घशाला कोरड का, असा सवाल येथील रहिवाशांचा आहे.
यासंदर्भात नगरसेवक मोहन उगले यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत. परंतु, परिस्थिती ‘जैसे थे’ असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. याबाबत, उगले यांना विचारले असता प्रभागांमधील बहुतांश भागांमध्ये पाणी येत नाही, ही वस्तुस्थिती आहे. मोहने उदंचन केंद्राच्या पंपात बिघाड झाल्याने ही परिस्थिती ओढावल्याचे कारण पाणीपुरवठा विभागाकडून दिले जात आहे. पण, हे कारण पटणारे नाही. सध्या पाऊस पडत असतानाही नागरिकांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही, हे दुर्दैव आहे. तीन महिने पाठपुरावा करूनही त्यांना दोष सापडत नाही, पण याचे खापर पंपिंगवर फोडतात, हा आमचा आरोप असल्याचे ते म्हणाले.
यासंदर्भात केडीएमसीचे ‘क’ प्रभागाचे कनिष्ठ अभियंता चंद्रकांत सोनवणे म्हणाले, १० ते १२ दिवस पाणी सुरळीत येत नव्हते, परंतु आता दोष निकाली काढला आहे. दोन दिवसांपासून पाणीपुरवठा सुरळीत होत असल्याचा दावा त्यांनी केला.
बिर्ला कॉलेज प्रभागातही महिनाभरापासून पाणी येत नसल्याने तेथील रहिवाशांचीही पाण्यासाठी वणवण सुरू आहे. स्थानिक नगरसेविका छाया वाघमारे याही पाणीटंचाईच्या तक्रारीने हैराण झाल्या आहेत.
प्रशासनाच्या कारभारावर त्यांनी संताप व्यक्त केला आहे. वारंवार लक्ष वेधूनही त्याकडे दुर्लक्ष होत आहे. आजूबाजूच्या प्रभागांना पुरेसे पाणी मिळत आहे, मग आमच्याच प्रभागाला सापत्न वागणूक का, असा सवाल त्यांनी केला आहे.