...आणि उलगडत गेले मितश्रृत किशोरी आमोणकर यांच्या गायकीचे महत्त्व
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2018 09:30 PM2018-01-21T21:30:04+5:302018-01-21T21:30:16+5:30
डोंबिवलीतील चार संगीत गायन प्रेमी मित्रांनी मिळून गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्या गायकीचे महत्त्व उलगडून दाखविणारा मितश्रृत किशोरी आमोणकर हा कार्यक्रम आयोजित केला होता.
डोंबिवली-डोंबिवलीतील चार संगीत गायन प्रेमी मित्रांनी मिळून गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्या गायकीचे महत्त्व उलगडून दाखविणारा मितश्रृत किशोरी आमोणकर हा कार्यक्रम आयोजित केला होता. आमोणकर यांचे ज्येष्ठ शिष्य डॉ. अरुण द्रविड यांनी गुरूच्या गायकीचे पैलू उपस्थित संगीत रसिकांपुढे उलगडले. त्यातून किशोरी आमोणकर यांच्या गायकीचे महत्त्व उलगडत गेले. त्यामुळे कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत झाला. त्याला रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली.
संगीतप्रेमी अरविंद विंझे, महेश फणसे, चंद्रशेखर मिराशी आणि उमेश राजेशिर्के या चार मित्रांनी मिळून मितश्रृत किशोरी आमोणकर यांच्या गायकीचे पैलू उलगडून दाखविणारा कार्यक्रम मामा निमकर सभागृहात रविवारी सायंकाळी आयोजित केला होता. या कार्यक्रमात किशोरी आमोणकर यांच्याकडे ४० वर्षे गायन शिकणारे ज्येष्ठ शिष्य द्रविड यांनी त्यांच्या गाण्यातील पैलू रसिकांसमोर उलगडून दाखविले. डॉ. द्रविड यांनी सुरुवातीलाच किशोरीताईंच्या दोन पैलूंविषयी सांगताना स्पष्ट केले की, त्यांच्या गायन कालखंडाचे दोन भाग करता येतील. त्यापैकी पूर्वार्धात त्यांची गायकीही जयपूर घराण्यातील गायकी होती.
उत्तरार्थ त्यांची गायकीही भावार्थाकडे झुकलेली होती. त्यामुळे त्यांच्या गायकीवर संगीत समीक्षकांनी त्यांच्या गाण्यात जयपूर घराण्याची गायकी दिसून येत नाही, अशी टीका केली. त्या टीकेची किशोरीताईंनी कधी पर्वा केली नाही. शुद्ध आकाराने स्वर करा लावयाचा. त्यांच्या मात्रा स्वरांच्या आलिप्त होत होत्या. लयीच्या अंगाने शब्द फेक कशी करायचे यावर त्यांचे प्रभुत्व होते. -हस्व दीर्घाचे नियम काय आहेत. दोन मात्रांच्या मधल्या बिंदूवर कसा आघात करायचे हे त्यांनी त्याच्या मातोक्षी मोगूबाई यांच्याकडून शिकले होते. नंतरच्या गायकीत किशोरीताईंनी भावार्थाला जास्त महत्त्व दिले. त्यामुळे त्यांच्या गायकीचा पिंड हा भाव व भावना हाच होता. त्यांच्या मते गायन मेंदूकडे न जाता हृदयाकडे गेले पाहिजे. तोच सुवर्णमध्य त्यांनी त्यांच्या गायकीतून साधला याकडे द्रविड यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले.
द्रविड यांनी सांगितले की, किशोरीताईंचे गाणे हे स्वरप्रधान होते. श्रृतीचे महत्त्व त्यांना अचूक ठाऊक होते. कोणत्या रागात कोणत्या श्रृती कशा गायच्या शुद्ध दैवत किती प्रकारचा आहे. तो प्रत्येक रागात कशा प्रकारे वेगळा लावला जातो, याचा उत्तम वस्तूपाठ त्यांनी घालून दिला आहे.
यावेळी द्रविड यांनी आज मंगल दिन आयो ही बंदीश सादर केली. त्याचबरोबर दुर्गाराग, खंबावती, शुद्ध कल्याण आदी रागातून बंदी सादर करून उपस्थित संगीत रसिकांना किशोरीताईंच्या गायनाची अनुभूती व मोहिनी काय असते, याची प्रचिती घडवून दिली. त्याला उपस्थितांनी भरभरून दाद दिली. भैरवीने कार्यक्रमाची सांगता झाली. अनेक कार्यक्रमातील दुर्मीळ गायन यावेळी ऐकवून दाखविण्यात आले. जे यू ट्युबवर उपलब्ध नसल्याचे द्रविड यांनी यावेळी आवर्जून सांगितले.
किशोरीताई ‘निरमोही’ कवी
किशोरीताई या सृजनचा विचार करायच्या, त्यामुळे त्यांना संगीत गायनासोबत उत्तम उत्स्फूर्तपणे काव्य सूचत होते. त्याचे काव्य संग्रहीत होऊन प्रकाशित झाले नाही. त्यामुळे त्यांचा काव्याचा गुण समोर आला नसला तरी त्यांनी अनेक बंदिशी बांधल्या आहेत. त्यांचा सगळ्यात आवडता शब्द निरमोही होता. तो त्यांच्या बंदिशीतून प्रतित होतो. कृष्ण निरमोही होता. त्याच्या भक्तीसंदर्भात त्यांनी तो वापरला असल्याचे द्रविड यांनी नमूद केले. दुर्गाराग हा जयपूर घराण्याचा आहे. मात्र किशोरीताईंनी तो कधीही मैफलीत गायला नाही. खाजगी त्यांनी हा राग गायलेला आहे.