अंतर्गत मेट्रो रेल्वेच्या सर्व्हेसाठी महामेट्रो यांची नेमणूक, ३ कोटी ५४ लाखांचा केला जाणार खर्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 03:45 PM2017-10-23T15:45:36+5:302017-10-23T15:58:21+5:30
ठाणे महापालिकेने ठाणेकरांचा प्रवास सुखकर करण्यासाठी अंतर्गत मेट्रोचा पर्याय पुढे आणला आहे. त्यानुसार याचा सर्व्हे करण्याचे काम महामेट्रो कंपनीला देण्यात आले असून त्यासाठी ३ कोटी ५४ लाखांचा खर्च केला जाणार आहे. हा सर्व्हे योग्य पध्दतीने झाल्यास भविष्यात ठाणेकरांना अंतर्गत मेट्रोची सेवा उपलब्ध होणार आहे.
ठाणे - भविष्यात हायवे टू हायवे धावणारी मेट्रो आता येत्या काळात अंतर्गत वाहतुकीसाठीही धावली जाणार आहे. त्यादृष्टीकोणातून ठाणे महापालिकेने पावले उचलली असून नुकत्याच झालेल्या महासभेत अंतर्गत मेट्रो रेलसेवा विकसित करण्यासाठी आणि या सेवेचा तांत्रिक सुसाध्यता अहवाल व प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी महामेट्रोची नेमणूक करण्यात आली आहे. हा अहवाल तयार करण्यासाठी तीन कोटी ५४ लाखांचा खर्च केला जाणार आहे. ही रक्कम पालिका पादचारी पुल - सबवे यातून या कामासाठी वर्ग करणार आहे. तर हा प्रकल्प लाईट रेल ट्रान्झीट प्रकल्प म्हणून ओळखला जाणार आहे. याचा फायदा वागळे, लोकमान्य नगर, पोखरण १, २ व मानपाडा आदी भागांसाठी होणार आहे.
ठाण्यात कासारवडवली पर्यंत येत्या काळात मेट्रो धावणार आहे. यामध्ये मॉडेला चेकनाका ते कासारवडवली हे १०.६० किमीचे अंतर आहे. त्यामध्ये ११ स्थानके असणार आहेत. तसेच एमएमआरडीएअंतर्गत कापुरबावडी - ठाणे - भिवंडी कल्याण असा अन्य मार्ग सुध्दा प्रस्तावित आहे. या प्रस्तावानुसार दोन स्थानके कापुरबावडी व बाळकुम येथे प्रस्तावित केले आहे. दोन्ही मेट्रो रेल या कापुरबावडी येथे एकत्र मिळणार आहे. ही मेट्रो शहातील दक्षिण मुंबई तसेच पश्चिम उपनगरीयकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी उपयुक्त ठरणार आहे.
ठाणे महापालिकेच्या शहर विकास विभागाने एचसीएमटीआर ( हाय कॅपेसिटी मास ट्रान्सपोर्ट रुट) चा मार्ग शहरात १९९९ मध्ये मंजूर केला आहे. रिंग रुट पध्दतीने या मार्गावरुन प्रवास केल्यास शहरातील कोणत्याही भागात प्रवास करणे नागरिकांना शक्य होणार आहे. या रुट्ससाठी आतापर्यंत महापालिकेच्या ताब्यात सुमारे नऊ हेक्टर जमीन आली आहे. तर सुमारे साडेसहा हजार हेक्टर जमीनिवर अतिक्र मण आहे. शिवाय काही ठिकाणी सीआरझेडचा अडथळा आहे. परंतु मार्ग निश्चित करण्यात आल्याने प्रवासासाठी नक्की कोणते साधन योग्य ठरणार याचा निर्णय झाल्यानंतर या मार्गावर काम करणे महापालिकेला शक्य होणार आहे. त्यानुसार आता अंतर्गत मेट्रोचा पर्याय पुढे आला आहे. महासभेची देखील आता मंजुरी घेण्यात आली असून येत्या काही दिवसात महामेट्रो कंपनीकडून सर्व्हेचे काम सुरु होणार आहे. त्यामध्ये शहराच्या अंतर्गत प्रवासासाठी मेट्रो चालविण्यासाठी कोणत्या बाबी महत्वाच्या आहेत, खर्च, कालावधी, त्यामूळे किती वेगाने किती प्रवाशांची वाहतूक शक्य होईल याचा अहवाल त्यानंतर सादर केला जाणार आहे. शहरातील एचसीएमटीआरच्या मार्गावरु न नक्की कोणत्या वाहनातून प्रवास करायचा याचा निर्णय महापालिकेने घेतलेला नाही. त्यामूळेच आरक्षण असलेल्या या जागेवर कोणतेही काम सुरु करण्यात आलेले नाही. अशावेळी महामेट्रो कंपनीच्या वतीने महापालिकेला किफायतशीर असा सर्व्हे मिळाल्यास भविष्यात ठाणेकरांना मेट्रोचा किफायतशीर प्रवासाची हमी मिळण्याची दाट शक्यता आहे.
या सर्व्हेसाठी ३ कोटी ५४ लाखांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. हा खर्च सार्वजनिक बांधकाम विभागातील पादचारी पुल - सबवे या लेखाशिर्षाकामधून वर्ग करण्यात येणार आहे.
- शहरातील या भागांना होणार फायदा
अंतर्गत मेट्रो सेवेचा शहरातील वागळे इस्टेट, लोकमान्य नगर, पोखरण १, २ व मानपाडा आदी भागांना फायदा होणार आहे. या भागातील लोकवस्ती वाढत असल्याने त्यांना या किफायतशीर वाहतुकीचा फायदा होणार आहे. शिवाय प्रस्तावित मनोरुग्णालयाजवळील नवीन रेल्वे स्थानकाला हा मार्ग जोडता येणे शक्य असल्याने ठाणेकरांचा प्रवास सुखकर होणार आहे.