पल्स पोलिओ मोहिमेसाठी शाळकरी मुलांची नियुक्ती, भार्इंदरची घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 07:13 AM2018-01-30T07:13:50+5:302018-01-30T07:14:03+5:30
मीरा-भार्इंदर पालिकेच्या एका प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिचारिकेने २८ जानेवारीच्या पल्स पोलिओ मोहिमेत शाळकरी मुलांना स्वत:च्या स्वाक्षरीने ओळखपत्रे देऊन हे काम त्यांना सोपवल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आल्यानंतर आरोग्य विभाग खडबडून जागा झाला आहे.
भार्इंदर : मीरा-भार्इंदर पालिकेच्या एका प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिचारिकेने २८ जानेवारीच्या पल्स पोलिओ मोहिमेत शाळकरी मुलांना स्वत:च्या स्वाक्षरीने ओळखपत्रे देऊन हे काम त्यांना सोपवल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आल्यानंतर आरोग्य विभाग खडबडून जागा झाला आहे.
१९९५ पासून दरवर्षी राष्टÑीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविली जाते. यासाठी पालिकेकडून आरोग्य व वैद्यकीय विभागातील डॉक्टर्स, परिचारिका, लिंक वर्कर, बहुद्देशीय कर्मचारी व इतर कर्मचाºयांची नियुक्ती केली जाते. आतापर्यंत पालिकेने राबविलेल्या मोहिमेंतर्गत एकाही बालकाला पोलिओची लागण झाल्याचे आढळून आलेले नाही. या मोहिमेसाठी प्रसंगी बाहेरुन प्रौढ व्यक्तींची नियुक्ती केली जाते.
यंदा मात्र पालिकेने २८ जानेवारीला राबविलेल्या पल्स पोलिओ मोहिमेत कार्यालयीन कर्मचाºयांसह शाळकरी मुलांना सामावून घेतल्याची धक्कादायक बाब समोर आली. केवळ पल्स पोलिओचे डोस देण्याचे काम त्या मुलांना दिले नाही, तर त्यांना रितसर ओळखपत्रेही दिल्याचे उजेडात आले आहे. ही ओळखपत्रे पालिकेच्या भार्इंदर पश्चिमेकडील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेल्या योगिता वाघमारे या परिचारिकेने स्वत:च्या स्वाक्षरीने दिल्याचे उघड झाले. या कामाची ओळखपत्रे देण्यात आलेली ही मुले याच परिसरातील एका शाळेतील नववी-दहावीतील विद्यार्थी असल्याचे उघड झाले आहे. ही धक्कादायक बाब समोर आल्याने पालिकेचा आरोग्य विभाग खडबडून जागा झाला आहे. दहावीपर्यंतच्या मुलांना मोहिमेत सामावून घेण्यात हरकत नसल्याची सारवासारव विभागाकडून करण्यात आली. हा प्रकार बालकामगार कायद्याचे उल्लंघन करणारा असल्याचे विभागाच्या निदर्शनास आणून देताच त्यांची पाचावर धारण बसली. यानंतर त्या परिचारिकेचा शोध घेऊन तिच्यावर कारवाईची प्रक्रिया सुरु करण्यात आली. याबाबत पल्स पोलिओ मोहीमेच्या प्रमुख डॉ. अंजली पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हा प्रकार गंभीर असून त्याप्रकरणी संबंधित परिचारिकेला कारणे दाखवा नोटीस बजावल्याचे सांगितले. त्यांनी खुलासा केल्यानंतरच पुढील कारवाई केली जाणार असल्याचेही त्या म्हणाल्या.