ठाण्यात इफेड्रिनची तस्करी करणाऱ्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 08:40 PM2018-12-13T20:40:54+5:302018-12-13T20:46:03+5:30
ठाण्याच्या टेंभीनाका परिसरात एक व्यक्ती इफेड्रिनच्या तस्करीसाठी येणार असल्याची ‘टीप’ वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांना मिळाली होती. त्या आधारे सापळा लावून अंकुश कसबे याला सहा लाखांच्या इफेड्रीनसह अटक करण्यात आली.
ठाणे : इफेड्रिनची तस्करी करण्यासाठी आलेल्या अंकुश कचरू कसबे (३०, रा. महात्मा फुलेनगर, उल्हासनगर) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने मंगळवारी अटक केली. त्याला १९ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. त्याच्याकडून इफेड्रिनसह सहा लाख २२ हजार ६०० चा मुद्देमाल जप्त केला आहे.
येथील टेंभीनाका परिसरात एक व्यक्ती इफेड्रिनच्या तस्करीसाठी येणार असल्याची ‘टीप’ वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांना मिळाली होती. त्या आधारे खैरनार यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक अमोल वालझडे आणि उपनिरीक्षक धर्मराज बांगर यांच्या पथकाने ११ डिसेंबर रोजी रात्री ८.४५ वा. च्या सुमारास अंकुश याला जांभळीनाक्याकडून टेंभीनाक्याकडे जाणा-या रस्त्यावर त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून सहा लाख २० हजार रुपये किंमतीचे १५५ ग्रॅम इफेड्रिन, रोकड आणि मोबाइल असा सहा लाख २२ हजारांचा ऐवज जप्त केला. त्याच्याविरु द्ध नौपाडा पोलीस ठाण्यात एनडीपीएस अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्याने हा अमली पदार्थ कोणाकडून आणला? तो कोणाला त्याची विक्री करणार होता? यात त्याचे आणखी कोणी साथीदार आहेत का? या सर्व बाबींचा तपास सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
------------