प्रेक्षकांनी अनुभवला शास्त्रीय गायन आणि भक्तीचा संगीताचा अनोखा मिलाफ; आरती अंकलीकर-टिकेकर यांच्या गायनाने प्रेक्षक मंत्रमुग्ध
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2017 06:42 PM2017-12-30T18:42:22+5:302017-12-30T18:42:33+5:30
शास्त्रीय गायन आणि भक्ती संगीताचा अनोखा मिलाफ प्रेक्षकांनी अनुभवला. सुप्रसिध्द गायिका आरती अंकलीकर-टिकेकर यांनी बागेश्री रागाने कार्यक्रमाला सुरूवात करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
डोंबिवली- शास्त्रीय गायन आणि भक्ती संगीताचा अनोखा मिलाफ प्रेक्षकांनी अनुभवला. सुप्रसिध्द गायिका आरती अंकलीकर-टिकेकर यांनी बागेश्री रागाने कार्यक्रमाला सुरूवात करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. निमित्त होते ते श्री गणेश मंदिर संस्थानतर्फे आयोजित करण्यात आलेल्या संगीत महोत्सवाचे.
संगीत महोत्सवाचे पहिले पुष्प ‘सूरसंगम’ या कार्यक्रमाने गुंफण्यात आले. हा कार्यक्रम आप्पा दातार चौकात आयोजित करण्यात आला होता. आरती अंकलीकर-टिकेकर आणि मंजुषा पाटील यांनी गाणी सादर केली. तसेच आरती यांच्या शिष्या अबोली गद्रे हिने ही त्यांना साथ दिली.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला मंजुषा पाटील यांनी सुहाग राग सादर केला. त्यानंतर त्यांनी कृ ष्णाची आपल्यावर कशी मोहिनी आहे हे सांगणारी एक होरी सादर केली. ‘‘ रंगी सारी गुलाबी चुनिराया रे’’ या होरीला प्रेक्षकांनी टाळ््याच्या कडकडाटात दाद दिली. मंजुषा यांनी दोन गाणी सादर केल्यावर आरती यांनी राग बागेश्री सादर केला. तीन ताल, झप ताल हे आपण नेहमीच ऐकत असतो. परंतु डोंबिवलीकर कानसेन असल्याने त्यांच्यासाठी खास पंचाम स्वर त्यांनी ऐकविला. उपशास्त्रीय संगीतातील एक टप्पा म्हणजे झुला. उत्तर भारतात त्या त्या ऋतूत संगीताचे विविध प्रकार गायिले जातात. ऋतुनुसार दादरा, ठुमरी, गजरी, झुला हे प्रकार गायिले जातात असे सांगून आरती यांनी शंकर अंभ्यकर यांनी बांधलेला झुला सादर केला. मंजुषा यांनी ज्ञानेश्वर माऊलीची ‘‘ अवघाचि संसार, सुखाचा करीन’’ ही रचना सादर करून प्रेक्षकांना जिंकून घेतले. ही रचना ऐकताना प्रेक्षकांना पंढरपूरची वारी करून आल्याचा प्रयत्य आला. आरती यांनी रामदास स्वामीची रचना असलेला ‘ता ने सूर रंगवावा’ हे गीत सादर करून प्रेक्षकांची वाहवाह मिळविली. कथ्थक नृत्यात ज्याप्रमाणे गौळण आल्या आहेत त्याप्रमाणे नाटयसंगीतात ही गौळण आल्या आहेत. होनाजी बाळा नाटकातील ‘‘श्री रंगा कमला कांता’’ही गौळण मंजुषाने गायिली. त्यानंतर जोहर माय बाप जोहर हे गीत सादर करण्यात आले. मंजुषा आणि आरती यांनी ‘अवघा रंग एकाचि झाला’ हे गीत गाऊन कार्यक्रमाचे शेवट केला.