रिक्षा चालकाने बसविला 'रिक्षा गणेश', रिक्षावाल्यांसाठी दिला अनोखा संदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2018 05:55 PM2018-09-18T17:55:51+5:302018-09-18T17:57:28+5:30
गीते हे रिक्षातील गणेशाला घेऊन सोमवारी कल्याण दुर्गाडीच्या खाडी किनाऱ्यावरील गणेश घाट येथे आले होते. त्यांच्या या अनोख्या गणेश स्थापनेविषयी अनेकांनी कुतूहल व्यक्त केले आहे
कल्याण- कुर्ला येथील विनोबा भावे नगरात राहणारे सत्यवान गीते या रिक्षा चालकाने रिक्षातच गणेशाची स्थापना केली आहे. यांच्या रिक्षातच गणराज विराजमान झाले आहेत. ती रिक्षा घेऊन गीते मुंबई नगरात दहा दिवस फिरतात. अनेक लोक त्यांच्या रिक्षातील गणेशाचे भक्तीभावाने दर्शन घेत आहेत. अनेक मंडळाच्या बाहेर ते रिक्षा उभी करतात. त्यावेळी अनेक जण त्यांच्यासोबत सेल्फीही काढतात.
गीते हे रिक्षातील गणेशाला घेऊन सोमवारी कल्याण दुर्गाडीच्या खाडी किनाऱ्यावरील गणेश घाट येथे आले होते. त्यांच्या या अनोख्या गणेश स्थापनेविषयी अनेकांनी कुतूहल व्यक्त केले आहे. गीते हे 1996 सालापासून रिक्षा चालवितात. त्यांच्या रिक्षात त्यांनी गणेशाची स्थापना केली आहे. दहा दिवसानंतर जुहू येथे जाऊन गणेशाचे विसजर्न करणार आहेत. रिक्षात त्यांनी दीड फुटाची मुर्ती मागच्या बाजूस बसविली आहे. तिला हार फूलांची सजावटही केली आहे. तसेच त्याठिकाणी रिक्षांची प्रतिकृती असलेल्या लहान लहान रिक्षा ठेवल्या आहेत. तसेच डीव्हीडी लावलेला आहे. त्यावर गणेशाची गाणी वाजविली जातात. दहा दिवस गीते यांची गणेश स्थापन असलेली रिक्षा उपनगरात फिरतीवर असते. गीते यांची गणेशावर श्रद्धा आहे. रिक्षा व्यवसाय संभाळून त्याना घरी गणेशाची पूजा अर्चा करणे जमत नाही. त्यामुळे त्यांनी ही शक्कल लढविली आहे. त्यांचा हा 'रिक्षा गणेश' चर्चेचा विषय बनला आहे. गीते त्यांची रिक्षा घेऊन कल्याणला आले होते. त्यांच्या रिक्षातील गणेशाचे अनेकांनी दर्शन घेतले, तसेच सेल्फीही काढला. यावेळी ठाणे रिजन रिक्षा टॅक्सी चालक मालक महासंघाचे अध्यक्ष प्रकाश पेणकर याचीही गीते यांनी भेट घेतली. पेणकर यांनी गीते यांच्या रिक्षातील गणेशाचे दर्शन घेऊन गीते यांच्या अनोख्या श्रद्धेविषयी कौतूक केले.
दरम्यान, गीते यांनी सांगितले की, गणेशाप्रमाणोच प्रवासी हा आपला गणेश आहे. त्याच्यावर रिक्षा चालकांची श्रद्धा हवी. त्यामुळे रिक्षा चालकांनी प्रवासी भाडे नाकारू नये असे, आवाहनही गीते यांनी केले.
पाहा व्हिडीओ -