हॉटेलांचा बंद मागे, ठाण्याच्या आयुक्तांचे आश्वासन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2018 06:55 AM2018-03-08T06:55:16+5:302018-03-08T06:55:16+5:30
पालिकेने नोटीस देऊनही अग्निशमनाची कार्यवाही न करणाºया ८६ पैकी ३६ हॉटेल व बार सील होताच त्याविरोधात हॉटेल आणि बारमालकांनी पुराकलेला बंद बुधवारी मागे घेण्यात आला.
ठाणे - पालिकेने नोटीस देऊनही अग्निशमनाची कार्यवाही न करणाºया ८६ पैकी ३६ हॉटेल व बार सील होताच त्याविरोधात हॉटेल आणि बारमालकांनी पुराकलेला बंद बुधवारी मागे घेण्यात आला.
अग्निशमन विभागाच्या जाचक अटींविरोधात ५०० हॉटेल व्यावसायिकांनी बंद पुकारला होता. आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याशी बुधवारी झालेल्या चर्चेनंतर तो मागे घेण्यात आला. आयुक्तांनी प्रशासकीय शुल्क अर्थात अॅडमिनिस्ट्रेटिव्ह टॅक्स कमी करण्याची हमी देत सील केलेली हॉटेल तत्काळ खुली करण्याचे आदेशही दिले.
अग्निशमन दलाचा ना-हरकत दाखला नसलेल्या ठाणे शहरातील एकूण ४२६ हॉटेल, बार, लाउंज यांना यापूर्वी अग्निशमन दलाच्या वतीने नोटिसा देण्यात आल्या होत्या. त्यापैकी जवळपास ८० आस्थापनांनी आवश्यक ती कागदपत्रे सादर केल्याने ती हॉटेल्स नियमित करण्यात आली आहेत. तसेच २६० प्रकरणे शहर विकास विभागाकडे नियमित करण्याच्या कार्यवाहीसाठी सादर केली आहेत. परंतु, नोटिसांनंतरही त्यावर काहीही कार्यवाही न केलेले एकूण ८६ हॉटेल्स, बार, लाउंज तीन दिवसांत सील करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी शुक्रवारी दिल्यानंतर शनिवारपासून मंगळवारपर्यंत ३६ हॉटेल, बार सील करण्यात आले. यामुळे अग्निशमन दलाच्या जाचक अटींविरोधात आणि पेनल्टी चार्जेस कमी करण्याच्या उद्देशाने शहरातील सुमारे ५०० हॉटेल, बारवाल्यांनी मंगळवारपासून बंदची हाक दिली होती.
दरम्यान, बुधवारी दुपारी ठाणे महापालिकेच्या नागरी संशोधन केंद्रात आयुक्त आणि हॉटेल, बार असोसिएशनच्या शिष्टमंडळाची एक बैठक पार पडली. या बैठकीला अग्निशमन विभागासह आस्थापना आणि शहर विकास विभागाचे अधिकारी उपस्थित होते. तब्बल दीड तास ही बैठक चालली. त्यानंतर, आयुक्तांनी अॅडमिनिस्ट्रेटिव्ह टॅक्स कमी करण्याचे आश्वासन दिले. तसेच ज्या हॉटेल, बारवाल्यांनी अग्निशमन दलाच्या कागदपत्रांची पूर्तता केलेली नाही, त्यांनी ती करावी, असे सांगून बंद मागे घेण्याचे आवाहन केले.
असे असणार चार्जेसचे स्लॅब
यापूर्वी थेट २५ लाखांपर्यंत अॅडमिनिस्ट्रेटिव्ह टॅक्स भरण्याच्या नोटिसा हॉटेल, बारवाल्यांना बजावल्या होत्या. परंतु, केवळ ठाणे महापालिका हद्दीतच अशा पद्धतीने ही वसुली केली जात असल्याचा मुद्दा हॉटेल व्यावसायिकांनी उपस्थित केला. त्यानुसार, आता ५०० स्क्वेअर फुटांपर्यंत २५ हजार, ५०० ते दोन हजारपर्यंत एक लाख, दोन हजार ते पाच हजारपर्यंत - दोन लाख आणि पाच हजार स्कवेअर फुटांच्या पुढील बांधकामासाठी पाच लाख असे स्लॅब आता तयार करण्यात आले आहेत.
आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याबरोबर समाधानकारक चर्चा झाली असून त्यांनी पेनल्टी कमी करून ठोकलेले सील काढण्याचे आश्वासन दिल्याने हा बंद मागे घेण्यात आला आहे.
- रत्नाकर शेट्टी - हॉटेल, बार असोसिएशनचे ज्येष्ठ पदाधिकारी)
हॉटेल व्यावसायिकांशी चर्चा होऊन त्यांच्या मागणीचा विचार करून जे चार्जेस लावण्यात आले होते, त्याचे आता स्लॅब केले असून पूर्वीचे असलेले चार्जेस कमी केले आहेत. तसेच फायर एनओसीबाबतही पूर्तता करण्याच्या सूचना त्यांना देण्यात आल्या आहेत.
- संजीव जयस्वाल,
आयुक्त, ठामपा