खोटी कागदपत्रे रंगवून कर्जे घेतल्याप्रकरणी बँकेने थकबाकीदारांवर केला गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2017 08:15 PM2017-12-12T20:15:19+5:302017-12-12T20:15:25+5:30
४० लाख ६१ हजाराचे कर्ज घेऊन त्यापैकी सुमारे १७ लाख रुपयांची थकबाकी केल्याप्रकरणी दी ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या व्यवस्थापकांनी शहर पोलीस ठाण्यात ११ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
भिवंडी- शहरातील तीन जणांनी वाहन खरेदीसाठी घेतलेले कर्ज घेण्यासाठी बँकेत खोटी कागदपत्रे सादर करून सुमारे ४० लाख ६१ हजाराचे कर्ज घेऊन त्यापैकी सुमारे १७ लाख रुपयांची थकबाकी केल्याप्रकरणी दी ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या व्यवस्थापकांनी शहर पोलीस ठाण्यात ११ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
ठाण्यातील घोडबंदर रोडवरील लोकनिसर्ग मार्केट व शहरातील अमीना कंपाऊण्डमध्ये असलेल्या बालाजी मोटर्समधून वाहने खरेदी करण्याच्या हेतूने ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतून सन २०११-१२दरम्यान सतीश चक्रमानी गांडला, रामकृष्ण चक्रपाणी गांडला,शशांक चंद्रशेखर वडके, रोहन सुभाष भांगरे यांनी एकूण ४० लाख ६१ हजार रुपयांचे कर्ज घेतले. या तिघांनी कोणतेही वाहन खरेदा न करता घेतलेल्या कर्जाच्या रकमेपैकी त्यांनी २३ लाख ५५ हजार ६२२ रुपयांचे कर्ज भरले.
तसेच आपसांत संगनमत करून आरटीओकडून देण्यात येणारे व शासकीय दप्तर असलेले आरसीबुक, टॅक्स सर्टिफिकेट, इन्शुरन्सची कागदपत्रे हे बनावट बनवून त्यावर बँकेचे हायपोथिकेशन कर्ज असल्याचे भासविले आणि बँकेची व्याजासह १७ लाख ०५ हजार ३७८ रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार बँकेचे व्यवस्थापक अनिल मोतीराम पाटील यांनी शहर पोलीस ठाण्यात केली आहे. त्यानुसार पोलिसांनी चार कर्जदारांसह जामीनदार विनोद मोरे, संजय गमरे, चंद्रशेखर मगर, संतोष पवार, बालाजी चेट्टीयाल, मोनीष भोईर व वाहन डिलर बालाजी मोटर्स असा एकूण ११ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.