ठाण्यातील अभिनय कट्ट्यावर अवतरले ‘लोकमान्यांचे बाप्पा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 04:07 PM2018-09-11T16:07:16+5:302018-09-11T16:10:46+5:30
ठाण्यातील अभिनय कट्ट्यावर ‘लोकमान्यांचा बाप्पा’ हा कार्यक्रम कट्ट्याच्या कलाकारांनी सादर केला.
ठाणे: ३९३ क्र मांकाच्या अभिनय कट्ट्याचे विशेष आकर्षण होते ते म्हणजे समाज प्रबोधन करणारे पथनाट्य व ‘लोकमान्यांचा बाप्पा’ या कार्यक्र माचे सादरीकरण. समाजाला चांगल्या गोष्टींची आवड व समाजप्रबोधन करायचे असेल तर पथनाट्य सारखे दुसरे माध्यम नाही हे कट्ट्यावर प्रेक्षकांनी अनुभवले.
सेंट मेरी हाय स्कूल (कल्याण) या शाळेतील मुलांनी ‘गोंधळ गणपती उत्सवाचा’ हे पथनाट्य सादर करून येणाऱ्या गणेशोत्सवाचे स्वागत आपण कशाप्रकारे करायचे आणि निसर्ग हानी न पोहोचवता रक्षण करायचे हे दाखवून दिले. तसेच ए.के.जोशी इंग्लिश स्कूल (ठाणे) या शाळेतील विद्यार्थ्यांनी ‘स्वच्छ सुंदर ठाणे’ हे पथनाट्य सादर केले. ‘स्वच्छता परमो धर्मा ’ असे म्हणत आपले ठाणे शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याचा कानमंत्र त्यांनी प्रेक्षकांना दिला. त्याचबरोबर ठाण्यातील सरस्वती सेकंडरी स्कूल या शाळेतील विद्यार्थ्यांनी ‘पूजा करू पंचमहाभूतांची, साथ सोडू वाईट विचारांची’ हे पथनाट्य सादर करून प्रदूषणमुक्त जीवन जगण्याचा विचार प्रकट केला. विद्यार्थीदशेत जेव्हा आपण समाजकल्याणाचा विचार करतो आणि ते प्रत्यक्ष नाट्यस्वरु पात सादर करतो. तेव्हा मनावर होणारे संस्कार हे पुढील जीवनाच्या वाटचालीला उपयुक्त ठरतात. हे या तिन्ही पथनाट्यातून उलगडले. त्यानंतर कट्ट्याच्या शेवटी ‘लोकमान्यांचा बाप्पा’ या कार्यक्र माचे सादरीकरण करण्यात आले. या सादरीकरणाद्वारे लोकमान्य टिळकांचा गणेशोत्सव सुरु करण्याचा हेतू काय होता आणि सध्याची परिस्थिती काय आहे या गोष्टींचा उलगडा करण्यात आला. आजच्या काळातला भक्त हा बाप्पापेक्षा दिखाव्याच्या मागे धावणारा असून फक्त पैसे कमवण्याचा सण म्हणून गणेशोत्सवाकडे पाहणारा आहे. परंतू स्वत: गणपती बाप्पा प्रकट होऊन लोकमान्य टिळकांचा गणपती बसवण्याचा उद्देश काय होता हे पटवून देतात. हे या सादरीकरणातून दाखवण्यात आले व त्यामुळे गणेशोत्सव सार्वजनिक करून स्वराज्य मिळेल पण त्याच सुराज्य करून टिकवून ठेवणे पुढे लोकांना जमणार का? यांचेही उत्तर मात्र प्रेक्षकांना गवसले. हे शेवटच्या आरतीमध्ये तल्लीन झालेल्या उपस्थितांच्या चेहºयावर झळकत होते. त्याचबरोबर कट्ट्याचे अध्यक्ष किरण नाकती यांनी पथनाट्याद्वारे समाजाला रु ळावर आणणाºया आणि प्रबोधन करणाºया सर्व बालकलाकार विद्यार्थ्यांचे कौतुक केले. गणेशोत्सवाच्या आधीच दरवर्षी होणाºया ‘लोकमान्यांचा बाप्पा’ हा कार्यक्रम असाच अभिनय कट्टा पुढे करत राहील असे आश्वासनही त्यांनी दिले.