कारवाईसाठी बारना आता आठवड्याची नोटीस, पुन्हा बांधकाम केलेल्यांवर तीन दिवसात कारवाई, ठाण्याच्या आयुक्तांचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 03:56 AM2017-09-27T03:56:06+5:302017-09-27T03:56:08+5:30
अग्नीशमन सुरक्षेचे नियम न पाळलेल्या बार-हॉटेलवर कारवाईबाबत ठाणे पालिकेने पावले उचलली असून त्यांना सात दिवसांच्या नोटिसा पाठवल्या आहेत.
ठाणे : अग्नीशमन सुरक्षेचे नियम न पाळलेल्या बार-हॉटेलवर कारवाईबाबत ठाणे पालिकेने पावले उचलली असून त्यांना सात दिवसांच्या नोटिसा पाठवल्या आहेत. त्याचवेळी ज्या अनधिकृत लेडिज बार, लॉजवर यापूर्वी कारवाई झाली होती ाणि ज्यांनी अनधिकृत बांधकामे केली आहेत, ती तीन दिवसात तोडण्याचे आदेशही पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी मंगळवारी दिले. काही महिन्यांपूर्वी पालिकेने अशा बार आणि लॉजवर कारवाई केली होती.
शहरातील हॉटेल्स आणि बारना सात दिवसांत अग्निशमन दलाची एनओसी सादर करण्याची नोटीस बजावली असून मुदतीत कागदपत्रे सादर केली नाही तर पालिका त्यांना सील ठोकणार आहे. त्यामुळे या व्यावसायिकांमध्ये प्रचंड अस्वस्थता असून पालिकेची ही कारवाईच बेकायदा असल्याचा पवित्रा त्यांनी घेतला आहे.
राज्य सरकारने २०१४ मध्ये काढलेल्या एका परिपत्रकानुसार अग्निशमन विभागाच्या परवान्यांचे कालबद्ध पद्धतीने नूतनीकरण करण्याची गरज नाही, असा दावा करून हॉटेलमालकांनी या कारवाईवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यामुळे पालिका आणि या व्यावसायिकांमधील वाद उफाळून आला आहे. यापूर्वी ठाणे पोलीस आणि पालिका प्रशासनाने संयुक्तपणे शहरातील अनधिकृत लेडिज बारवर कारवाई मोठी मोहिम राबविली होती. यामध्ये उपवन परिसराबरोबरच शहरातील सर्वच अनधिकृत लेडिज बार जमीनदोस्त केले होते. या कारवाईमुळे शहरातील बार संस्कृतीलाच खीळ बसली होती.
ही कारवाई करूनही शहरात पुन्हा अनधिकृत लेडीज बार सुरू असल्याचा संशय असल्याने आता पुन्हा एकदा कारवाईचा बडगा उगारण्याचा निर्णय पालिका आयुक्तांनी घेतला आहे. शहरामध्ये काही ठिकाणी कारवाई करूनही अशा बारची किंवा लॉजेसची दुुरुस्ती करून त्यामध्ये पुन्हा लेडिज बार आणि लॉजेस सुरू झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.
आयुक्तांनी मंगळवारी सर्व अधिकाºयांची तातडीची बैठक घेऊन अतिरिक्त आयुक्त समीर उन्हाळे यांना या कारवाईबाबत नियोजन करण्याचे आदेश दिले आहेत. परिसरातील मालमत्तांना धोका पोचवणाºया बांधकामांवरही कारवाई होणार आहे.
जीवाला धक्का पोचवणाºया बांधकामांवर कारवाई
याविषयी प्रभाग समिती स्तरावर परिमंडळ उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्तांनी आपापल्या प्रभाग समितीतंर्गत अशा अनधिकृत लेडिज बार आणि लॉजेसची यादी तयार करून पुरेशा पोलीस बंदोबस्तात ते तत्काळ तोडण्याचे आदेश दिले. दरम्यान जुन्या लेडीज बार किंवा लॉजशिवाय नवीन काही बार तयार झाले असल्यास त्यांच्यावरही कारवाई करण्याचे आदेशीर आयुक्तांनी दिले आहेत. लोकांच्या जीवाला, परिसरातील मालमत्तांना धोका पोचवणाºया बांधकामांवर कारवाईचे आदेश उपायुक्तांना देण्याचा निर्णयही आयुक्तांनी घेतला.