भालचंद्र नेमाडे यांचे साहित्य कोणत्याही वादापेक्षा मोठे - जयंत पवार यांचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 06:08 AM2017-09-12T06:08:00+5:302017-09-12T06:08:10+5:30

कोणत्याही साहित्याची केवळ लाट असून चालत नाही. त्यामागे विचार असेल तरच तो लेखक व ते साहित्य टिकते. वरवरची निर्माण होणारी वादग्रस्तता ही माध्यमे तयार करतात. ज्ञानपीठविजेते भालचंद्र नेमाडे यांचे साहित्य समजून न घेता ते काय बोलतात, याचा अर्थ काढून वाद निर्माण केले आहेत.

Bhalchandra Nemade's literature is bigger than any dispute - Jayant Pawar's opinion | भालचंद्र नेमाडे यांचे साहित्य कोणत्याही वादापेक्षा मोठे - जयंत पवार यांचे मत

भालचंद्र नेमाडे यांचे साहित्य कोणत्याही वादापेक्षा मोठे - जयंत पवार यांचे मत

Next

कल्याण : कोणत्याही साहित्याची केवळ लाट असून चालत नाही. त्यामागे विचार असेल तरच तो लेखक व ते साहित्य टिकते. वरवरची निर्माण होणारी वादग्रस्तता ही माध्यमे तयार करतात. ज्ञानपीठविजेते भालचंद्र नेमाडे यांचे साहित्य समजून न घेता ते काय बोलतात, याचा अर्थ काढून वाद निर्माण केले आहेत. त्यांची अनेक विधाने मूलभूत आहेत, तर काही वादग्रस्त विधाने काहींना न पटणारीही आहेत. त्यामुळे नेमाडे कायम वेगळ्या कारणाने चर्चेत राहतात. त्यांचे साहित्य त्यापलीकडे मोठे आहे. त्यांच्या कादंबºया, कविता या वादापेक्षा मोठ्या आहेत. त्यामुळे त्या टिकणार आहेत. त्यांची लाट म्हणतो. ती लाट आहे, असे मला वाटत नाही, असे मत ज्येष्ठ नाटककार व पत्रकार जयंत पवार यांनी व्यक्त केले आहे.
कल्याण सार्वजनिक वाचनालयाच्या लेखन कार्यशाळेत ज्येष्ठ सर्जनशील लेखक राजन खान यांनी नेमाडे यांच्या साहित्याच्या लाटेचे दिवस भरले, असे विधान केले होते. त्यावर जयंत पवार यांनी उपरोक्त मत व्यक्त केले.
पवार यांनी सांगितले की, मराठी साहित्यात अशी कोणाची आणखी लाट होती, हे मला माहीत नाही. कोणाची अशी लाट नसते. त्यांच्याभोवती त्यांच्या चांगल्यावाईट कारणांनी वलय निर्माण होते. त्यात्या व्यक्ती प्रकाशझोतात येतात. त्यात सकस साहित्य टिकते. नेमाडे यांचे साहित्य सकस आहे. ते वाद आणि लाटेच्या पलीकडचे आहे. त्यामुळे ते नष्ट होणार नाही. त्यांचा देशीवाद हे त्यांच्याभोवतीच्या वादाचे मूळ आहे. तो देशीवाद टिकेल की नाही, माहीत नाही. मात्र, राजन खान यांनी २२ वर्षे कोठून शोधून काढले, हे मला समजत नाही. त्यामागचे तर्कशास्त्र समजत नाही.
काळ बदलतो त्याप्रमाणे नवनवीन प्रवाह येत असतात. नेमाडेंच्या मांडलेल्या विचारांना ओलांडून पुढे जाणारे विचार येतील. असे जगातील सगळ्याच साहित्यिकांबाबत झाले आहे. त्यामुळे प्रवाहात सकस साहित्य टिक ते. त्यांचा देशीवाद, उत्तर आधुनिकवाद तो देखील कधीतरी काळाच्या मागे जाईल. त्या अर्थाने देशीवाददेखील मागे जाईल. पण, नेमाडेंची लाट जाईल, या विधानात मला फार काही मोठे वाटत नाही. नेमाडे यांचे साहित्य नष्ट होणार नाही. आताच्या पिढीलाही आवडणारे साहित्य आहे. त्याअर्थाने खान यांच्या बोलण्यात मला तथ्य वाटत नाही, असे स्पष्ट करत पवार यांनी खान यांचा मुद्दा खोडून काढला आहे.
लेखक व कवी श्रीकांत देशमुख यांनी सांगितले की, मराठीत जे निवडक लेखक आहेत, त्यापैकी भालचंद्र नेमाडे एक आहेत. त्यांच्याबाबतीत राजन खान यांनी असे वक्तव्य करणे धाडसाचे आहे. त्या त्या काळावर अनावत प्रभाव अधूनमधून येत असतो. तो कायम राहतो .तो पुसता येत नाही. अभिजात साहित्याची मुद्रा कोणालाही पुसता येत नाही. खान हे साहित्यातील २२ वर्षांच्या लाटेचा अंदाज बांधतात. २०-२२ वयातील मुलांना ही कादंबरी आपली वाटतात. नेमाडेचा प्रभाव ओसरणे म्हणजे काय? प्रभाव म्हणजे केवळ अनुकरण नाही. त्यांचा प्रभाव घेऊन त्यांच्याही पुढे गेले पाहिजे. हा खरा प्रभाव असतो. त्यांचा प्रभाव कायम आहे, असे म्हणता येणार नाही. जाणिवांचा विस्तार कसा होतो, हे पाहिले पाहिजे. ‘अभिजात’ या क क्षेत आपल्याला कधीही त्यांचा प्रभाव खोडून काढता येत नाही. त्याकडे नकारात्मक रीतीने पाहता येत नाही. सकारात्मक पद्धतीने प्रभाव समजून घेतला पाहिजे. श्याम मनोहर, भाऊ पाध्ये हे त्यांना समकालीन आहेत. ते कधीही आउटडेटेड वाटणार नाहीत. वास्तववाद एखाद्याच्या प्रभावांचा भाग असतो, असे नाही. सदानंद देशमुख, प्रवीण बांदेकर यांच्या कादंबरीतही वास्तववाद कायम आहे. खान ज्या पद्धतीने बोलतात, ते नकारात्मक वाटते. नकारात्मक दृष्टीने पाहिल्यास साहित्याचे नुकसान होते. प्रभावपासून पुढे जाणे म्हणजे साहित्याचे गुणवर्तन होईल.
साहित्यिक रंगनाथ पठारे यांनी आपल्याला या विषयावर भाष्य करायचे नसल्याचे स्पष्ट केले.

कालातीत असण्यातच साहित्याचे यश सामावलेले

तुकाराम, महात्मा फुले, साने गुरुजी यांचे लेखन आजही चिंरजीव आहे. ते लेखन अभिजात आहे, त्यांची मुद्रा कोणालाही पुसता येत नाही. ज्यावेळी नवीन पिढी येते ते त्या काळातील साहित्य वाचते. खान हे २२ वर्षांचा अंदाज बांधतात, याकडे श्रीकांत देशमुख यांनी लक्ष वेधले.

अजून ५० वर्षांनी नवीन कॉलेजला जाणारा मुलगा नेमाडे यांच्या ‘कोसला’ कादंबरीचे नाव कानांवर आल्यास ती वाचणार आहे. यातच त्या कादंबरीचे यश सामावलेले आहे, असा दाखला त्यांनी दिला. त्यामुळे अशा साहित्यावरील राजन खान यांचे लाट ओसरल्याचे वक्तव्य धाडसाचे वाटते, असे ते म्हणाले.
 

Web Title: Bhalchandra Nemade's literature is bigger than any dispute - Jayant Pawar's opinion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.