मार्च अखेर बीएसयुपी प्रकल्प पूर्ण होणार, सहा महिन्यापर्यंत पालिका करणार निगा देखभाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2019 07:05 PM2019-02-05T19:05:26+5:302019-02-05T19:07:17+5:30
येत्या मार्च अखेर ठाणे महापालिकेच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या २५५१ बीएसयुपीच्या घरांचे लाभार्थ्यांना वाटप करण्यात येणार आहे. या योजनेतील घरांची निगा, देखभाल पुढील सहा महिने पालिका करणार आहे.
ठाणे -कोणत्याही परिस्थितीत ३१ मार्च अखेरपर्यंत बीएसयुपी प्रकल्पातंर्गत सर्व इमातींचे काम पूर्ण करून त्या सर्व सदनिका लाभार्थ्यांना वितरित करण्याचा महत्वाकांक्षी निर्णय महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घेतला आहे. त्याचबरोबर १५ दिवसांत या सर्व इमारतींच्या ठिकाणी लाईट व नळ जोडणी करणे आणि सहा महिन्यांपर्यंत या सर्व इमारतींची निगा व देखभाल महापालिकेच्यावतीने करण्याचा निर्णयही आयुक्तांनी घेतला आहे.
दरम्यान प्रकल्प बाधित लाभार्थ्यांची यादी तयार करणे तसेच इतर सुविधांचा आढावा घेण्याबाबत अतिरिक्त आयुक्त राजेंद्र अहिवर यांच्या अधिपत्याखाली विशेष समितीची स्थापना करण्यात आली आहे. बीएसयुपी प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी आयुक्तांनी मंगळवारी सर्व संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांची संयुक्त बैठक आयोजित केली होती. यावेळी त्यांनी बीएसयुपी प्रकल्पातंर्गत सुरू असलेल्या इमारतींच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी रेंटल हाऊसिंगमध्ये यापूर्वी ज्या प्रकल्प बाधितांना घरे देण्यात आली आहेत त्यांची यादी अंतीम करून त्यांनी तातडीने सदनिका वितरित करण्याचे आदेश दिले. मात्र या सर्व ठिकाणी लिफ्ट, लाईट आणि पाणी जोडणी तातडीने करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. ज्या इमारतींना वापर परवाना प्रमाणपत्र प्राप्त झालेले नाही त्या इमारतींना वापर परवाना देण्याबाबत प्रस्ताव सादर करण्याचे आदेश देतानाच ज्या ठिकाणी रस्ता किंवा किरकोळ कामे अपूर्णावस्थेत आहेत ती कामे युद्ध पातळीवर करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.
महापालिकेच्यावतीने खारटन, सिद्धार्थनगर, पडले, ब्रम्हांड, तुळशीधाम आदी ठिकाणी बीएसयुपीतंर्गत इमारतींची बांधकामे सुरू आहेत. त्यातील बहुतांशी इमारतींचे कामे पूर्णत्वास गेलेली आहेत. या प्रकल्पातंर्गत एकूण ६३५९ सदनिका प्राप्त होणार असून ३८०८ सदनिकांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. यापैकी ३५४४ सदनिका यापूर्वीच लाभार्थ्यांना वितरित करण्यात आलेल्या आहेत. तर उर्वरीत २५५१ सदनिकांचे काम प्रगतिपथावर आहे. ज्या ठिकाणच्या इमारतींचे बांधकाम पूर्ण झाले आहे त्या ठिकाणी १५ दिवसांत लाईट आणि पाणी जोडणी करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. त्याचप्रमाणे मार्च अखेरपर्यंत लिफ्टचे काम पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.
अतिरिक्त आयुक्तांच्या अधिपत्याखाली समिती
लाभार्थ्यांना सदनिकांचे वाटप करण्यापूर्वी त्यांची यादी अंतीम करणे, तसेच त्यांना बीएसयुपीमध्ये सदनिका वितरित करणे, या ठिकाणी आवश्यक त्या सुविधांची पुर्तता करणे व त्याचा नियमित आढावा घेणे यासाठी महापालिका आुक्तांनी अतिरिक्त आयुक्त राजेंद्र अहिवर यांच्या अधिपत्याखाली विशेष समितीची स्थापना करण्याचा निर्णय घेतला. या समितीमध्ये उप आुक्त अशोक बुरपल्ले, नग अभियंता राजन खांडपेकर, कार्यकारी अभियंता सुधीर गायकवाड, समाज विकास अधिकारी वाघमारे आदी सदस्य म्हणून राहणार आहेत. सहा. आयुक्त महेश आहेर हे या समितीचे सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत.