वाहनांची चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2019 06:34 AM2019-01-07T06:34:37+5:302019-01-07T06:35:02+5:30
एक कोटी २० लाखांची १२ वाहने हस्तगत : ठाणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी, मुंबईच्या वाहनांची हैदराबादमध्ये विक्री
जितेंद्र कालेकर
ठाणे : मुंबई, ठाण्यातून वाहनांची चोरी करणाºया आंतरराज्य टोळीचा ठाणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. सुनील चौरसिया याच्यासह सात जणांना यात अटक केली असून त्यांच्याकडून एक कोटी २० लाखांची महागडी वाहने हस्तगत केली आहेत. ठाणे शहर, ग्रामीण आणि मुंबई परिसरातून चोरलेली वाहने ही टोळी महाराष्ट्राबाहेर कमी किमतीमध्ये विकत असल्याचे तपासामध्ये उघड झाले आहे.
काशिमीरा, मीरा-भार्इंदर भागांतून इनोव्हासारख्या महागड्या कार तसेच इतर वाहनचोरीचे प्रमाण गेल्या काही दिवसांपासून वाढले होते. त्यामुळे पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेकडे हे प्रकरण सोपवले होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्यंकट आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली काशिमीरा युनिटचे सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख आणि उपनिरीक्षक अभिजित टेलर यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि खबºयांनी दिलेल्या माहितीच्या आधारे सुनील चौरसिया, रणजीत चौधरी (रा. उत्तर प्रदेश), चिमाणी, सलदी राजा, भवरलाल चौधरी आणि चुणस श्रीनू (रा. आंध्र प्रदेश) अशा सात जणांना अटक केली आहे. रणजीत याच्याविरुद्ध मुंबई, पुणे आणि ठाणे परिसरांत वाहनचोरीचे २९ गुन्हे दाखल आहेत. तर, श्रीनू याच्याविरुद्ध आंध्र प्रदेशमध्ये रक्तचंदनचोरीचे १० गुन्हे दाखल आहेत. २००९ ते २०१४ या दरम्यानच्या इनोव्हा कारवर या टोळीचे लक्ष असायचे. मुंबई, ठाण्यातून चोरलेली १४ ते १५ लाखांची इनोव्हा कार ते अवघ्या दीड ते दोन लाखांमध्ये हैदराबाद तसेच आंध्र प्रदेशमध्ये विक्री करत होते. कलम ३७९ च्या चोरीच्या गुन्ह्यात एखाद्या आरोपीला चार ते सात दिवसांची पोलीस कोठडी दिली जाते. पण, या गुन्ह्याचे गांभीर्य आणि व्याप्ती लक्षात घेऊन ठाणे न्यायालयाने या एक महिन्यापूर्वी अटक झालेल्या यातील आरोपींची कोठडी २७ दिवसांपर्यंत वाढवली. चेसीस क्रमांकही बदलले जात होते. त्यामुळे या वाहनांच्या चोरीचा छडा लावणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. तरीही, मोठ्या कौशल्याने यातील आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाºयांनी अटक केली. तुळिंज पोलिसांनी चार, तर काशिमीरा युनिटने आठ अशी १२ वाहने या टोळीकडून हस्तगत केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
अशी होती चोरीची ‘एमओबी’
भंगारमध्ये टाकलेल्या वाहनांच्या इंजिनांचा क्रमांक ते या चोरीच्या वाहनाला वापरत होते. हा क्रमांक चोरीच्या वाहनाला लावल्यानंतर
हे वाहन ते परराज्यात विक्री करत असल्याचेही तपासामध्ये उघड झाले आहे. आंध्र, तेलंगणा, उत्तर प्रदेश किंवा बिहार येथून भंगार किंवा अपघातग्रस्त गाडीची ही टोळी अगदी नाममात्र किमतीमध्ये खरेदी करत असत. अशा प्रकारची पांढºया रंगाची इनोव्हा कार खरेदी केली की, मुंबईतून त्यांच्या साथीदाराला पांढºया रंगाच्या २०१४ च्या मॉडेलची आॅर्डर मिळायची. ही आॅर्डर मिळाली की, टोळीतील तिसरी व्यक्ती अशी गाडी हेरून ठेवायची. मग, त्यांच्यातील रणजीत चौधरी हा दहिसर भागातील गाडी वसई, विरार, नवी मुंबई किंवा घोडबंदर रोड भागात आणून ठेवायचा. ४८ तास गाडीकडे कोणीही आले नाही की, ती गाडी आॅर्डर असेल तिथे हैदराबादकडे पाठवली जायची. ती पुणे, सोलापूर, नाशिक या भागांतून हैदराबाद येथून अपघातग्रस्त किंवा भंगारातील गाडीची कागदपत्रे घेऊन आलेल्या याच टोळीतील व्यक्तीकडे मुंबईच्या मध्यस्थामार्फत सोपवली जायची.
२०१४ पर्यंतच्या गाड्यांना मागणी
२००९ ते २०१४ या काळातील काही कारला डोअर लॉक आणि इग्निशनची चावी एकच होती. त्यामुळे या कार चोरी करण्यासाठी सोप्या होत्या.
२०१४ नंतरच्या कारला डोअर आणि इग्निशनचे लॉक वेगळे असल्यामुळे ते उघडणे या टोळीला अवघड असल्यामुळे २०१४ च्याच गाड्या ही टोळी हेरत होती.