घरगुती गॅस गळती कळताच १९०६ क्रमांकावर त्वरित फोन करा !
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2017 09:52 PM2017-10-30T21:52:15+5:302017-10-30T22:25:40+5:30
स्वत:च्या घरात किंवा शेजा-यांच्या घरातील गॅस सिलिंडरमधून गळती होत असल्याचे कळताच घाबरून जावू नका. त्वरीत १९०६ या टोलफ्री क्रमांकावर दूरध्वनी करून संभाव्य आपत्कालीन परिस्थितीवर मात करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ठाणे- स्वत:च्या घरात किंवा शेजा-यांच्या घरातील गॅस सिलिंडरमधून गळती होत असल्याचे कळताच घाबरून जावू नका. त्वरीत १९०६ या टोलफ्री क्रमांकावर दूरध्वनी करून संभाव्य आपत्कालीन परिस्थितीवर मात करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
घरगुती गॅस सिलिंडरमधून होणा-या गॅस गळतीमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ शकते. मग ती आपल्या घरातली गळती असेल, नाहीतर शेजारच्या घरातली. अशा वेळी तातडीने संपर्क साधण्यासाठी केंद्र सरकारने देशपातळीवर १९०६ हा एक हेल्पलाइन क्र मांक सुरू केला. देशाच्या कोणत्याही भागातून कोणत्याही वेळी या हेल्पलाइनवर संपर्क साधता येतो व तातडीने मदत मिळवता येते. दिवस रात्र ही सेवा सुरु आहे. हिंदी, इंग्रजी व्यतिरिक्त मराठी, गुजराती आदी ९ स्थानिक भाषांमधून ही सेवा मिळत आहे.
या कॉल सेंटरचे वैशिष्ट्य म्हणजे याचे काम वेब बेस्ड एप्लिकेशनद्वारे चालते. याद्वारे कॉल सेंटर कर्मचारी तुमचे लोकेशन तसेच जवळच्या गॅस वितरकाचे, मेकॅनिकचे लोकेशन शोधून थेट त्याला संदेश पोहचवतात. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तुमच्या गॅस गळतीचा संदेश वितरक, मेकॅनिक यांनी काही कारणामुळे स्वीकारला नाही किंवा दूरध्वनी, मोबाईल कॉल्स उचलले नाहीत तर संबंधित कॉल थेट त्या भागातल्या पेट्रोलीयम कंपनीच्या अधिकाºयापर्यंत आणि प्रसंगी त्याही पुढच्या वरिष्ठ अधिकाºयापर्यंत थेट जाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. रात्रं दिवस ही सेवा सुरू आहे.
गॅस गळतीची माहिती कळताच संबंधित यंत्रणा सक्रीय होऊन तुमच्या मोबाईल किंवा दूरध्वनीवरील कॉलच्या आधारे तुमचे लोकेशन शोधूत तुमच्याा घरापर्यंत सहज पोहचत असून त्यांच्याव्दारे तात्काळ कार्यवाही करण्यात येते. यासाठी या कॉल सेंटर पोर्टलवर सातत्याने वितरक, मेकॅनिक्स, पोलीस, त्या - त्या भागातले अग्निशमन दल यांची माहिती अद्ययावत केली जात असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.