सीसीटीव्हीचे काम क्रुम गतीने २० ठाणेकरांची सुरक्षा वाऱ्यावर *मार्चपर्यंत १६०० कॅमेऱ्याचे काम पूर्ण होईल *पालिकेचा दावा
By अजित मांडके | Published: November 26, 2017 12:01 AM2017-11-26T00:01:00+5:302017-11-26T00:01:00+5:30
ठाणे शहराची सुरक्षा सध्या वाऱ्यावर असल्याचेच दिसत आहे. शहरात १६०० कॅमेरे लावण्याचा वायदा जरी झाला असला तरी देखील आजच्या घडीला अवघे १०९ कॅमेरे कार्यरत झाले आहेत. त्यातही स्टेशन परिसरातील पोलिसांच्या वतीने बसविण्यात आलेले कॅमेरे सध्या काही तांत्रिक बाबीसाठी बंद आहेत.
अजित मांडके
ठाणे : मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर ठाणे शहराच्या सुरक्षेसह विविध भागात होणारे अपघात, सिग्नल यंत्रणा तोडणे, सोनसाखळी चोरी, छेडछाडीसह स्टेशन परिसराच्या सुरक्षेसाठी ठाण्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची प्रक्रिया कुर्मगतीने सुरू आहे. सद्यस्थितीत कंट्रोल रुमच हलविल्याने ठाणे स्टेशन परिसरात लावलेले ३२ कॅमेरे हे बंद आहेत. तर शहरात १६०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा ठाणे महापालिकेचा निर्णयदेखील कागदी घोडे नाचविण्यापलीकडे पुढे सरकलेला नाही. यामुळे २२ लाख ठाणेकरांची सुरक्षा वाऱ्यावरच आहे.
पालिकेच्या दाव्यानुसार शहराच्या विविध भागात ११० च्या आसपास कॅमेरे बसविले आहेत. तर, संपूर्ण शहराला बलून कॅमेºयाद्वारे टीपण्याची योजनादेखील पालिकेने पुढे आणली होती. परंतु, दोन वर्षानंतरही हा बलून कॅमेरा कुठे उडत आहे, याचा थांगपत्ता ना ठाणेकरांना आहे ना महापालिकेला. एकूणच २६-११ च्या पार्श्वभूमीवर महापालिका फारशी गंभीर नसल्याचे सिद्ध झाले असून पुन्हा असा काही हल्ला झालाच तर त्याला जबाबदार कोण असणार हा प्रश्न अनुत्तरीत आहे.
२६-११ च्या घटनेला आज ९ वर्षे पूर्ण झाले आहेत. त्या दिवशी झालेल्या दहशतवादी हल्यानंतर राज्यातील प्रमुख शहरांत सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा मुद्दा अधोरेखीत झाला होता. त्यानुसार ठाणे पालिकेने आणि पोलिसांनीदेखील त्याची आखणी करण्यास सुरुवात केली होती. याअंतर्गत खासदार राजन विचारे आणि पोलिसांच्या मदतीने स्टेशन परिसरात ३२ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले. परंतु, सध्या ते बंद आहेत. येथील कंट्रोल रुम हलविल्याने ते बंद असल्याचे सांगितले जात असले तरी यामुळे ठाणे स्थानकातून प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावरच आहे. परंतु सॅटीस परिसर आणि अशोक सिनेमा परिसरात ३९ कॅमेरे बसविले असून ते कॅमेरे सुरू असल्याचा दावा करून त्याचे आॅनटाईम माहिती उपलब्ध असल्याचेही पालिकेने स्पष्ट केले आहे.
दरम्यान सध्या पोलिसांनी लावलेले तीनहातनाका आणि नितीन कंपनी येथील तीनच कॅमेरे सुरूअसल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे ठाणे महापालिकेने शहरात घडणारे अपघात, सोनसाखळी चोरी, सिग्नल तोडणे यासारख्या घटनांना आळा घालण्यासाठी १६०० सीसीटीव्हींचा वॉच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार वायफायअंतर्गत पहिल्या ४०० कॅमेऱ्याच्या निविदा अंतिम झाल्या असून पोलीस कंट्रोल रुममध्ये सिटी सर्व्हिलन्स यंत्रणेची उभारणी करण्याचा निर्णय पालिकेने घेतला होता. परंतु, आता ही कंट्रोल रूम पालिकेने हाजुरी येथील उर्दू शाळेच्या ठिकाणी उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सध्या तात्पुरत्या स्वरुपात तिचे काम सुरू झाल्याचा दावाही पालिकेने केला आहे. याच ठिकाणी जगातील हायटेक असे सर्व्हिलन्स सेंटर उभारण्याचा पालिकेचा मानस आहे. त्यासाठी ३८ कोटींची निविदा पुढील आठवड्यात काढण्यात येणार आहे. या ठिकाणी कॅमेरेचे चार फीड उपलब्ध होणार असून त्यातील एक फीड पोलिसांच्या कंट्रोल रूमला दिला जाणार आहे. त्यामुळे पोलिसांना वेगळे कॅमेरे लावण्याची गरज भासणार नसल्याचे पालिकेने स्पष्ट केले. सध्या महापालिका हद्दीत १६०० पैकी अवघे १०९ कॅमेरे कार्यान्वित करण्यात आले असून ते सुरू असल्याचा दावा पालिकेने केला आहे. ते े स्टेशन परिसर, नितिन कंपनी, लोकमान्यनगर, वर्तकनगर, ट्रॉफीक आॅफीस जवळ, कशीस पार्क, दोस्ती एम्पेरीया आदी ठिकाणी बसविल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. परंतु, २६-११ च्या घटनेला आज नऊ वर्षे उलटत असतांना ठाणे महापालिकेचे हे काम कुर्म गतीनेच सुरू असल्याचे म्हणावे लागणार आहे. १६०० पैकी अवघे १०९ कॅमेरे सुरू असून उर्वरीत कॅमेरे केव्हा बसणार असा सवाल मात्र या निमित्ताने उपस्थित झाला आहे. शहरात सध्या सर्वत्र पालिकेच्या वतीने स्मार्टसिटीचा एक भाग म्हणून वायफायचे जाळे पसरविले जात आहे. याच माध्यमातून ४०० च्या आसपास कॅमेरे बसविण्याचे काम सुरू झाल्याचा दावाही पालिकेने केला आहे. हे काम फेबु्रवारीपर्यंत पूर्ण होणार आहे. तर उर्वरीत १२०० कॅमेरे बसविण्याचे काम मार्च अखेर पूर्ण होईल असे पालिकेने स्पष्ट केले आहे.
शहराच्या विविध भागात सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या जाळे फिरवून शहरात घडणाºया सोनसाखळी, विनयभंग,अपघात अशा घटनांवर आळा बसविण्याचा प्रयत्न पालिका करणार आहे. परंतु, यापुढेही जाऊन शहरात किमान चार दिशांना बलूनद्वारे म्हणजेच्या फुग्याच्या माध्यमातून कॅमेरे हवेत सोडून त्याद्वारे ठाण्यातील घटनांवर नजर ठेवण्याचा महापालिकेचा विचार केला आहे. परदेशात ज्याप्रमाणे एखादे संशयास्पद वाहन कोणत्या रस्त्यावरून नेमके कोठे जात आहे याची माहिती होण्यासाठी उंचावर कॅमेरे बसविले जातात. त्याच धर्तीवर ठाण्यातही बलूनद्वारे कॅमेरे हवेत सोडून शहरावर नजर ठेवली जाणार आहे. त्यानुसार याचा प्रस्ताव आता तयार होत असल्याचा दावा पालिकेने केला आहे. परंतु, सुरुवातीला संपूर्ण शहरात सीसीटीव्ही कॅमेचे जाळे पसरविण्यात आल्यानंतरच बलून कॅमेऱ्या साठी प्रयत्न केले जाणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. यामुळे तूर्तास तरी २२ लाख ठाणेकरांची सुरक्षा वाऱ्यारच आहे.
शहरात लावण्यात आलेले कॅमेरे
ठाणे स्टेशन - ३९, नितिन सबवे - १५, लोकमान्य नगर -१०, वर्तकनगर -१४, ट्रॉफीक - ०७, कशिश पार्क -१६, दोस्ती एम्पेरीया - ०८