मुंबई-बडोदा राष्ट्रीय महामार्गात बिल्डरांच्या हितासाठी केले बदल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2019 01:13 AM2019-05-04T01:13:24+5:302019-05-04T06:24:58+5:30
एनए जमीन बळकावण्याचा घाट : शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप, जिल्हाधिकाऱ्यांना साकडे
सुरेश लोखंडे
ठाणे : नव्याने होऊ घातलेल्या मुंबई-बडोदा राष्ट्रीय महामार्गाचा मूळमार्ग बदलून तो बदलापूरमधील चांमटोली गावाच्या हद्दीतील अकृषिक (एनए) जमिनीवरून वळवल्याची गंभीर चर्चा सध्या सुरू आहे. राजकारण्यांचे हितसंबंध गुंतलेल्या विकासकाच्या भल्यासाठी व त्यांची शाळा, हॉस्पिटल वाचवण्यासाठी शेतकऱ्यांच्या एनए जमिनीवरून हा राष्ट्रीय महामार्ग वळवण्यात आल्याचा आरोप या परिसरातील शेतकऱ्यांनी केला आहे. प्रशासनाच्या या मनमानीविरोधात ते ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना साकडे घालून न्यायालयात धाव घेण्याच्या प्रयत्नात आहेत.
मुंबई ते बडोदा हायवेसाठी कल्याणमधील १३ आणि अंबरनाथ तालुक्यातील १३ गावांतील जमिनी संपादित केल्या आहेत. बदलापूरसमवेत काही गावांच्या जमिनी अधिग्रहण करण्यासाठी प्रांत कार्यालयासह तहसीलदार आणि तलाठी मंडळ अधिकारी कार्यालयातून माहिती मागवण्याची प्रक्रिया जोरात सुरू आहे. विशेष म्हणजे, ज्या जमिनींचे अधिग्रहण करण्यात येत आहे, त्यापैकी अधिकांश जमिनींचे ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सुमारे सात वर्षांपूर्वीच अकृषिक (एनए) दाखले देण्यात आलेले आहेत; मात्र आता मूळच्या मार्गात बदल करून हा मुंबई ते बडोदा राष्ट्रीय महामार्ग बदलापूरजवळील चांमटोली गावाच्या हद्दीतील याच एनए जमिनींवरून वळवण्याचा घाट घातल्याचा आरोप शेतकºयांनी केला. अकृषिकच्या (एनए) दाखल्यावरून संबंधित शेतकºयांच्या बेरोजगार मुलांनीकर्ज काढून लग्नाचे हॉल, हॉटेल व अन्य व्यवसाय उभे केले असून, आता त्या जमिनींवर बडोदा राष्ट्रीय मार्गाचे नोटिफिकेशन आल्याच्या चर्चेमुळे शेतकरी व व्यावसायिक चिंतातुर झाले आहेत.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून या मुंबई-बडोदा या राष्ट्रीय महामार्गाचा आधीच्या नियोजनातील मूळमार्ग जाणीवपूर्वक विकासकांच्या भल्यासाठी वळवल्याचा आरोप या शेतकºयांनी केला आहे. विशेष म्हणजे भल्या मोठ्या नैसर्गिक नाल्यातून हा महामार्ग वळवण्यात येत असल्याची चर्चाही शेतकºयांमध्ये आहे. पण, आधीच तत्कालीन ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातून बदलापूरमधील चांमटोली हद्दीत सर्व्हे नंबर १२/११ मधील भाग ९/४ या जमिनीचा एनए दाखला १३ फेब्रुवारी २०१२ रोजी देण्यात आल्याचे या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. नोव्हेंबर २०१८ मध्येदेखील रो-हाउससाठी एनए दाखले दिल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
व्यवसाय बुडण्याची भीती
आश्चर्य म्हणजे मुंबई-बडोदा राजमार्गासाठी अधिसूचना निघाली असून ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी राष्ट्रीय महामार्गात बाधित होत आहेत, त्या जमिनींवर तत्कालीन ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातून अकृषिक दाखले कसे देण्यात आले, असा सवालही या शेतकऱ्यांनी केला आहे.
हा अकृषिक परवानगी दाखला मिळाल्याने सुशिक्षित तरुण बाळाराम जाधव याने बँकेतून कर्ज घेऊन लग्नाचा मोठा हॉल बांधला आहे. हॉटेलही उभारले आहे. त्यास अनुसरून इतरांनीही अन्य बांधकामे केली आहेत. परंतु, आता या जमिनींवरून हा राष्ट्रीय महामार्ग वळवल्यामुळे त्यांच्यात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
... तर नागरी वस्ती जलमय होणार
येथील सर्व्हे नंबर-११ लगत असलेल्या भल्यामोठ्या नाल्याला पावसाळ्यात पूर येतो. या नाल्याच्या पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत वळवल्यामुळे या परिसरात महाप्रलय होण्याची भीती शेतकºयांनी व्यक्त केली आहे. बाराही महिने वाहत असलेल्या या नाल्याचा उगम सह्याद्री पर्वतातून होतो.
नैसर्गिक स्त्रोत असलेला हा नाला चांगलाच मोठा आहे. परिसरातील कोपरेचीवाडी, चिचेवली, बॅडशीळ, चिकनेचीवाडी, ताडवडी, दहिवली, वराडेभोज या गावांतून तो रेल्वेलाइन ओलांडून उल्हास नदीत विलीन होतो.
भोज धरणातून होणाºया विसर्गाचे पाणी वाहून नेल्यासाठी तो उपयोगात येत आहे. त्याच्यावर हा महामार्ग वळवल्यास पाण्याचे नैसर्गिक विसर्गस्त्रोत बंद होऊन नागरीवस्तीत महापुराचा धोका संभवण्याची शक्यता या शेतकºयांनी वर्तवली आहे. यास वेळीच आळा घालण्यासाठी ते एकवटले असून हा राष्ट्रीय महामार्ग मूळच्या नियोजित मार्गानेच पुढे न्यावा, त्यास अन्यत्र वळवू नये, यासाठी ते उग्र आंदोलनाच्या तयारीत आहेत.