फेरबदलाने पोलीस ग्राउंडसह विकासकांचेही चांगभलं! एमआरटीएस मार्गिकाबदलाचा प्रस्ताव
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2019 04:12 AM2019-02-03T04:12:07+5:302019-02-03T04:12:33+5:30
- अजित मांडके ठाणे : ठाणे महापालिकेच्या मंजूर विकास आराखड्यानुसार साकेत येथील पोलीस ग्राउंडच्या मधल्या भागातून पूर्वी एमआरटीएसची लाइन ...
- अजित मांडके
ठाणे : ठाणे महापालिकेच्या मंजूर विकास आराखड्यानुसार साकेत येथील पोलीस ग्राउंडच्या मधल्या भागातून पूर्वी एमआरटीएसची लाइन जाणार होती. ती आता रद्द झाली असली, तरी एचटीएमसीआर अर्थात हायकॅपॅसिटी मास ट्रान्सपोर्ट रूट कायम असल्यामुळे पोलीस ग्राउंडला नुकसान होणार होते. ते वाचवण्यासाठी एमआरटीएसच्या मार्गात बदल करण्याचा ठाणे महापालिकेने प्रस्ताव २३ जानेवारीला राज्याच्या नगरविकास खात्याने मंजूर केला असून आता पोलीस ग्राउंडच्या बाजूने ही मार्गिका जाणार आहे. यामुळे पोलीस ग्राउंड तर बचावले आहेच, शिवाय या भागात इतर नवीन खासगी विकासकांची आरक्षणेदेखील विकसित करण्यास चालना मिळून नजीकच्या भविष्यात याचा अंतर्गत मेट्रोलाही मोठा फायदा होणार आहे.
ठाणे महापालिकेच्या विकास आराखड्यानुसार या योजनेतील ४५ मीटर रुंद विकास योजना व ३० मीटर रुंद एचसीएमटीआरची आखणी ही मौजे माजिवडा येथील सर्व्हे नं. ३८६ पैकी पोलीस ग्राउंडच्या जमिनीतून जात होती.
पोलीस विभागाची जमीन बाधित होणार होत असल्यामुळे प्रस्तावित एमआरटीएसच्या आखणीत (क्रिक व्ह्यू स्टेशनच्या स्थानकात) बदल करण्याचा तसेच या बदलामुळे विकास योजनेतील आरक्षणांच्या आकारमानात बदल करण्याचा निर्णय घेऊन त्या स्वरूपाचा फेरबदल करण्याचा प्रस्ताव ठाणे महापालिकेने २२ एप्रिल २०१७ रोजी राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठवला होता. त्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.
असा होणार आरक्षणामध्ये बदल
आता एमआरटीएस रद्दबातल झाले असले, तरी त्या जागी एचसीएमटीआर कायम असून त्यात अंतर्गत मेट्रोचा समावेश आहे. त्यामुळे आरक्षणबदलाने आता अंतर्गत मेट्रोच्या मार्गातील अडथळे दूर झाले आहेत. नव्या बदलानुसार एमआरटीएसची मार्गिका अर्थात नव्या एचसीएमटीआरनुसार अंतर्गत मेट्रोचा मार्ग आता या पोलीस ग्राउंडमधून नाही, तर बाहेरील बाजूने पुढे सरकणार आहे.
त्यामुळे पोलीस ग्राउंडही बचावले आहे. तसेच स्थानकातही बदल केला आहे. त्यानुसार, पूर्वी असलेल्या आरक्षणातही काही प्रमाणात बदल झाले आहेत. त्यानुसार, पोलीस डिपार्टमेंटच्या पूर्वीच्या ३.१० हेक्टर क्षेत्रापैकी आणि फेरबदलामुळे १.३४ हेक्टर क्षेत्र असणार आहे.
तर, पोलीस डिपार्टमेंटच्या दुसऱ्या आरक्षणातील १.५० हेक्टरच्या ऐवजी ३.९८ हेक्टर आरक्षित क्षेत्र असणार आहे. तर, नियोजित ४५ मीटर रुंद असलेल्या रस्त्याच्या आखणीतही बदल केला आहे. याशिवाय, ०.२७ हेक्टर पार्किंगचे आरक्षण नव्याने प्रस्तावित केले आहे.
याशिवाय, पोलीस डिपार्टमेंटच्या आरक्षणाच्या ठिकाणी १२.० मीटर रुंद रस्ता प्रस्तावित केला आहे.
पार्कचे आरक्षणही आता १.१० हेक्टर एवढे असणार आहे. तर, बगिच्याचे आरक्षण ०.६९ हेक्टर असणार आहे. परंतु, या क्षेत्रामधील सीआरझेडने बाधित होणारे प्रस्ताव विकसित करण्यापूर्वी महाराष्टÑ कोस्टल झोन मॅनेजमेंट अॅथॉरिटीची पूर्वपरवानगी घ्यावी, असेही बंधनकारक
केले आहे.