सत्यनारायणामुळे झालो मुख्यमंत्री , मनोहर जोशी यांची भावना, कथाकथन स्पर्धेच्या निमित्ताने आत्मकथन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 06:36 AM2017-08-21T06:36:44+5:302017-08-21T06:36:44+5:30
कथा सांगणे, हीसुद्धा मोठी कला आहे आणि ती मला चांगलीच येते. मी इयत्ता पाचवीपासून कथा सांगतो. ती म्हणजे सत्यनारायणाची कथा; पण सत्यनारायणाची कथा सांगूनही मुख्यमंत्री होता येते, असे माजी मुख्यमंत्री, शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी सांगितले.
ठाणे : कथा सांगणे, हीसुद्धा मोठी कला आहे आणि ती मला चांगलीच येते. मी इयत्ता पाचवीपासून कथा सांगतो. ती म्हणजे सत्यनारायणाची कथा; पण सत्यनारायणाची कथा सांगूनही मुख्यमंत्री होता येते, असे माजी मुख्यमंत्री, शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी सांगितले.
कोकण कला अकादमी, आनंद विश्व गुरु कुल महाविद्यालय व मुग्धा चिटणीस-घोडके कला सांस्कृतिक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी ठाणे कोकण विभागीय पातळीवरील कथाकथन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यात जोशी यांनी आत्मकथन केले.
जोशी म्हणाले की, राजकारणात मनापासून काम करणाºयाला अपयश मिळत नाही. मला यश मिळाले आणि मोठी पदेही. मनापासून काम केले, तर राजकारणात प्रत्येक गोष्ट उपलब्ध आहे. स्पर्धा कमालीची असते. परंतु, आपल्याला जे सांगायचे असते, ते पटवून देता आले पाहिजे. राजकारणात असूनही मी शब्द पाळतो. मी राजकारणात प्रवेश करून ५० वर्षे होत आहे आणि शिवसेनेला ५१ वर्षे. ठाण्यातील लोक शिस्तबद्ध आहे आणि त्यांच्या शिस्तीमुळे मी इथे हजर राहतो. भाषण चांगले असेल, तर श्रोते बसून राहतात. राजकारण हा माझा आवडता विषय आहे. राजकारणातही अभ्यास सुरू असतो. मी राजकारणात असतानाही अभ्यास सोडला नाही. विद्यार्थ्यांना सल्ला देताना ते म्हणाले की, आत्मविश्वास बाळगा, काम करण्याची इच्छा असू द्या. स्वत: नोकºया निर्माण करा, ध्यास घ्या, मोठे व्हा. नोकरीपेक्षा व्यवसाय करा, असा सल्लाही त्यांनी दिला.
लेखिका प्रा. माधवी घारपुरे, उमा चांदे, स्नेहा केसरकर, नितल वढावकर यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. साहित्याची मौखिक परंपरा जपण्यासाठी कथाकथन ही कला जपली पाहिजे. कथाकथनाला नाट्य हवे, नाटक नको. अभिनय हवा, अभिनेता नको. स्मरणशक्ती हवी, पण पाठांतर नको. ही त्रिशुळाची तीन टोके आहेत. स्पर्धकाने निवडलेली कथा, शब्दांचा अर्थ प्रेक्षकांपर्यंत पोहोचला पाहिजे, अशा शब्दांत घारपुरे यांनी विद्यार्थ्यांना कानमंत्र दिला.
या स्पर्धेत आंतरशालेय गटातून होली क्रॉस कॉन्व्हेंट हायस्कूलच्या अदिती सावंत, तर आंतरमहाविद्यालय गटातून सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या विशाखा गढरी यांनी प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय पारितोषिक आंतरशालेय गटात ज्ञानसाधना विद्यानिकेतन शाळेची परी भारदे व सरस्वती सेकंडरी स्कूलचा गंधार कुलकर्णी यांना विभागून देण्यात आले. तृतीय क्रमांक ए.के. जोशी इंग्लिश मीडियम शाळेची वेदान्ती हिंदुराव हिने पटकावला. आंतरमहाविद्यालयीन गटात द्वितीय पारितोषिक आनंद विश्व गुरुकुल ज्यु. कॉलेजच्या रेणुका भिरंगी, हिने तर तृतीय पारितोषिक दी एसआयए ज्यु. कॉलेज, डोंबिवलीच्या सहयोगी गायकवाड, शेठ एनकेटी कनिष्ठ महाविद्यालय, ठाणेच्या नूपुरा बंदे यांना विभागून देण्यात आले. सन्मानचिन्ह, रोख रक्कम, प्रमाणपत्र देऊन विजेत्यांना गौरवण्यात आले.