ठाण्याच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातून बाळाचे अपहरण :गलथान कारभाराविरुद्ध मनसेचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2018 08:37 PM2018-01-14T20:37:45+5:302018-01-14T20:56:09+5:30
ठाण्याच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अवघ्या चार तासांच्या बाळाचे अपहरण झाल्याने संताप व्यक्त होत आहे.
ठाणे : अवघ्या चार तासांच्या बाळाचे विठ्ठल सायन्ना जिल्हा शासकीय रुग्णालयातून अपहरण झाल्याचा प्रकार रविवारी रात्री घडला. बाळाची आई मोहिनी मोहन भोवर (१९, रा. भिवंडी) हिने याप्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून रुग्णालयाच्या या गलथान कारभाराविरुद्ध मनसेने जिल्हा शल्यचिकित्सकांच्या कार्यालयाबाहेर जोरदार आंदोलन करून या घटनेचा निषेध नोंदवला.
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे बाळाचे अपहरण करणा-या या महिलेचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. भिवंडीच्या आदिवासीपाड्यात वास्तव्यास असलेल्या मोहिनी यांना भिवंडीतील इंदिरा गांधी स्मृती रु ग्णालयात प्रसूतीसाठी दाखल केले होते. त्या वेळी तेथील रुग्णालय प्रशासनाने त्यांना ठाण्याच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवले होते. शनिवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास तिला ठाण्याच्या रुग्णालयात दाखल केले. तिने रात्री ११ वाजण्याच्या सुमारास नैसर्गिक प्रसूतीने मुलाला जन्म दिला. रविवारी पहाटे ३.३० ते ४ वाजण्याच्या सुमारास तिच्या आईने बाळाला मागितल्याचा बहाणा करून एका अनोळखी महिलेने तिच्याकडून हे बाळ नेले. प्रत्यक्षात हे बाळ त्या महिलेने चोरल्याचे अर्ध्या तासाने तिच्या लक्षात आले. तिची आई आणि पती हे चहा पिण्यासाठी पहाटे ३ वाजतादरम्यान बाहेर पडले. त्याच वेळी हा प्रकार घडला. काही वेळाने प्रसूती कक्षातील परिचारिका तिच्याकडे बाळाला दूध पाजून झाले का, अशी विचारणा करण्यासाठी गेली. तेव्हा बाळाला आईकडे बाहेर पाठवल्याचे तिने सांगितले. आपण बाळाला आणण्यासाठी कोणत्याही महिलेला पाठवले नसल्याचे तिने सांगितल्यानंतर तत्काळ पोलिसांना आणि संबंधित डॉक्टरांना याबाबतची माहिती परिचारिकांनी दिली. पोलिसांनी रुग्णालय परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करून चौकशी सुरू केल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी.सी. केम्पीपाटील यांनी दिली. या घटनेमुळे रुग्णालयीन सुरक्षेचा प्रश्न मात्र ऐरणीवर आला आहे.
जिल्हा शल्यचिकित्सकांवरच गुन्हा दाखल करण्याची मागणी
बाळ चोरीला गेल्याप्रकरणी रुग्णालय प्रशासनाचा हलगर्जीपणा असल्यामुळे अज्ञात व्यक्तीऐवजी थेट जिल्हा शल्यचिकित्सकांवरच गुन्हा दाखल करावा, तातडीने सुरक्षारक्षक नेमावेत आदी मागण्यांसाठी मनसेचे ठाणे शहर उपाध्यक्ष रवींद्र मोरे, उपशहराध्यक्ष विश्वजित जाधव, पुष्कर विचारे, जावेद शेख तसेच महेश कदम आणि आशीष डोके आदींनी जिल्हा शल्यचिकित्सकांच्या कार्यालयाबाहेर रविवारी सकाळी ठिय्या आंदोलन करून या घटनेचा निषेध नोंदवला. या कारभारामध्ये सुधारणा झाली नाही तर आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशाराही मनसेने दिला आहे.
‘पहाटे ३.३० ते ४ वाजण्याच्या दरम्यान बाळाच्या अपहरणाची ही घटना घडली आहे. सीसीटीव्हीच्या आधारे संबंधित लाल साडीमधील महिलेचा शोध घेण्यात येत आहे. यासाठी दोन पथकेही तयार केली आहेत.’
-मंदार धर्माधिकारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, ठाणेनगर