मराठीच्या समग्र विकासासाठी सह्यांची मोहीम
By admin | Published: May 2, 2017 02:06 AM2017-05-02T02:06:44+5:302017-05-02T02:06:44+5:30
मराठी ही ज्ञान, विज्ञान, विधी व न्यायव्यवहाराची भाषा व्हावी. मराठीच्या समग्र विकासासाठी ठोस पावले उचलावीत,
डोंबिवली : मराठी ही ज्ञान, विज्ञान, विधी व न्यायव्यवहाराची भाषा व्हावी. मराठीच्या समग्र विकासासाठी ठोस पावले उचलावीत, यासाठी मराठी भाषेसाठी लढणारे अॅड. शांताराम दातार आणि ‘ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान’तर्फे महाराष्ट्र दिनाचे निमित्त साधून सोमवारी सह्यांची मोहीम राबवण्यात आली. त्याला दुपारपर्यंत ६०० नागरिकांचा प्रतिसाद मिळाला. या सह्यांचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले जाईल, असे संस्थेच्या मृणाल पाटोळे यांनी सांगितले.
भाषावार प्रांतरचनेनुसार झालेल्या मराठी भाषेच्या महाराष्ट्र राज्यास सोमवारी ५७ वर्षे झाली. राज्याच्या स्थापनेसाठी झालेले आंदोलन आणि १०६ मराठीजनांचे बलिदान याचा पक्षांना विसर पडल्याने आजपर्यंत मराठी भाषेचे संरक्षण, संवर्धन व विकासाचे धोरण ठरवलेले नाही. त्यामुळे मराठी भाषा ज्ञान, विज्ञान, विधी व न्यायव्यवहाराची भाषा आजवर झालेली नाही. मराठी भाषेचा समग्र विकास करण्याचे सरकारने ठरवले आहे. मात्र, त्यासाठी ठोस पावले उचलावीत, या मागणीसाठी डोंबिवलीत रेल्वेच्या मधल्या पुलावर सह्यांची मोहीम राबवण्यात आली.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष गुलाब वझे, मनसे शहराध्यक्ष मनोज घरत, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सुरेश देशपांडे यांनी या मोहिमेत सहभाग घेतला. मराठी भाषेचे धोरण ठरवले जावे, ही बाब राजकीय पक्षांच्या लक्षात यावी, यासाठी टिष्ट्वटरचाही वापर करण्यात आला. टिष्ट्वटर पाहूनही नागरिक या मोहिमेत सहभागी झाले.
गुलाब वझे यांनी सांगितले की, प्रतिष्ठानने राबवलेली ही मोहीम स्तुत्य आहे. मराठी भाषा ही ज्ञानभाषा झाली पाहिजे, यासाठी जे प्रयत्न केले जात आहेत, हा चांगला योग जुळून आला आहे. नुकतेच येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले. त्या अनुषंगाने या भाषेला आपण सर्व दर्जा मिळवून देऊ, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)
डोंबिवली स्थानकाचा १३० वा वाढदिवस
डोंबिवली स्थानकाचा १३० वा वाढदिवस सोमवारी शिवसेनतर्फे साजरा झाला. स्थानक प्रबंधकांच्या कार्यालयात केक कापण्यात आला. भाऊसाहेब चौधरी, ओमप्रकाश करोटिया व प्रवासी सहभागी झाले होते.
मराठीचा अभिमान
आशा तिरकणावर यांची मातृभाषा ही कानडी आहे. पण, अनेक वर्षे त्या महाराष्ट्रात राहत आहेत. त्यांचे शिक्षणही मराठीत झाले आहे. मराठीसाठी सरकारने धोरण ठरवावे, यासाठी त्याही या मोहिमेत सहभागी झाल्या होत्या.