अदानी कार्यालयावर काँग्रेसचा हल्लाबोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 06:44 AM2018-12-16T06:44:55+5:302018-12-16T06:45:26+5:30
वीज दरवाढीचा निषेध : कुंड्या, शेडची केली तोडफोड
भाईंदर : शहराला वीजपुरवठा करणाऱ्या अदानी इलेक्ट्रीसिटीने वीजदरात भरमसाट वाढ केल्याच्या निषेधार्थ काँग्रेसने शनिवारी भार्इंदर येथील कार्यालयावर हल्लाबोल केला. यात कंपनीच्या फलकासह झाडांच्या कुंड्यांची व बांबूच्या शेडची तोडफोड करण्यात आली.
देशात महागाई वाढत असताना विजेचे दर ग्राहकांना विश्वासात न घेता भरमसाठ वाढविल्याने अदानी ही कंपनी देशाचा चौकीदार असलेल्या चोराच्या भागीदारीत सुरू असल्याचा आरोप काँग्रेसचे माजी आमदार मुझफ्फर हुसेन यांनी केला. नागरिकांच्या खिशातील पैसा रिलायन्स, अदानींसारख्या उद्योगपतींच्या कर्ज फेडीसाठी वापरला जात असून हे सरकार या उद्योगांच्या दावणाला बांधलेले दरोडेखोर असल्याचा घणाघात त्यांनी केला.
पूर्वी सामान्य ग्राहकाला १५० रूपये बिल महिन्याला येत होते. येत्या १५ दिवसांत अदानी कंपनीने ग्राहकांच्या माथी मारलेली वीज दरवाढ मागे घेतली नाही तर १ जानेवारीपासून काँग्रेस असहकार आंदोलन छेडून नागरिकांनी वीज बिल भरू नये, असे आवाहन करणार आहे. बिल थकल्यास अदानी कंपनीचे अधिकारी वीज खंडित करण्यासाठी आल्यास त्यांना नागरिकांनी चोप द्यावा, असे त्यांनी सांगून टाकले.
जोपर्यंत वीज दरवाढ मागे घेतली जात नाही तोपर्यंत काँग्रेसचे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सरकारच्या विरोधात कुणी बोलल्यास त्याच्यावर सरकारी कारवाईचा बडगा उचलला जातो. केंद्रात मोठा चौकीदार तर राज्यात छोटा चौकीदार बसल्याचा टोला त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला. शहरात नियोजित असलेल्या मेट्रोचे भूमिपूजन शहरात नव्हे तर कल्याणला केले जात असल्याची टीका त्यांनी केली. या मेट्रोला प्रत्यक्षात विलासराव देशमुख व पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री असताना मंजुरी दिल्याचा दावा त्यांनी केला. त्याचे भूमिपूजन भाजपा करत असली तरी ती सुरू मात्र काँग्रेसच करणार असल्याचा दावाही त्यांनी केला.
भाषण सुरू असताना त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना अदानीच्या कार्यालयात जाण्याचे निर्देश देताच कार्यकर्त्यांनी कार्यालयावर हल्लाबोल करत तेथील वस्तूंची तोडफोड केली. दरम्यान, कंपनीचे विभागीय प्रमुख तथा उपाध्यक्ष राजीव नखरे यांनी हुसेन यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाला बैठकीसाठी बोलावले. या चर्चेत कंपनीच्या वरिष्ठांसोबत चर्चा केल्यानंतर निर्णय घेऊ, असे आश्वासन अधिकाºयांनी शिष्टमंडळाला दिले.
आंदोलनात पक्षाचे कोकण विभागाचे निरीक्षक संदीप कुमार, जिल्हाध्यक्ष अनिल सावंत, महिला जिल्हाध्यक्ष लीला पाटील, गटनेता जुबेर इनामदार, अश्रफ शेख, राजीव मेहरा, नरेश पाटील, नगरसेविका उमा सपार, गीता परदेशी, प्रवक्ता अंकुश मालुसरे आदी सहभागी झाले होते.