कॉन्स्टेबल आत्महत्या: पोलिसांनी मागितली एसीपी निपुंगेच्या मोबाईल जप्तीची परवानगी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2017 09:11 AM2017-09-22T09:11:05+5:302017-09-22T09:11:54+5:30
महिला कॉन्स्टेबल सुभद्रा पवार हिच्या आत्महत्येप्रकरणी आरोपी असलेले मुख्यालयाचे सहाय्यक पोलीस आयुक्त (एसीपी) एस. बी. निपुंगे यांचा मोबाईल जप्त करण्याची परवानगी पोलिसांनी ठाणे न्यायालयाकडे मागितली
ठाणे, दि. 22 - महिला कॉन्स्टेबल सुभद्रा पवार हिच्या आत्महत्येप्रकरणी आरोपी असलेले मुख्यालयाचे सहाय्यक पोलीस आयुक्त (एसीपी) एस. बी. निपुंगे यांचा मोबाईल जप्त करण्याची परवानगी पोलिसांनी ठाणे न्यायालयाकडे मागितली. दरम्यान, दोन्ही बाजू ऐकल्यानंतर निपुंगेच्या अटकपूर्व जामीन अर्जाची सुनावणी आता सोमवारी होणार असल्याचे न्यायालयाने जाहिर केले आहे.
मुख्यालयातील कनिष्ठ महिला कर्मचारी सुभद्रा हिने आत्महत्या केल्यापासून निपुंगे हे पसार झाले आहेत. त्यांच्याच अटकपूर्व जामीन अर्जाची सुनावणी गुरुवारी (२१ सप्टेंबर रोजी) होणार होती. परंतू, याबाबतची अंतिम सुनावणी झाली नाही. सुभद्रा हिचा निपुंगे यांच्याकडून डयूटीची सेटींग करुन देतो, असे सांगून फोनवरुन वारंवार छळ केल्याचे तिच्या भावाने कळवा पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले असल्याचे पोलिसांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणले.
निपुंगे यांनी फोनवरुन १०० पेक्षा अधिक वेळा सुभद्रा हिच्या मोबाईलवर संपर्क केल्याचे आढळले आहे. शिवाय, एसीपी दर्जाच्या अधिकाºयाने रात्री बेरात्री कनिष्ठ महिला कर्मचाºयाला कॉल करण्याचे कारण काय? त्यांच्या खालच्या पदावर राखीव निरीक्षक, उपनिरीक्षक आणि जमादार असे अधिकारी असूनही ते वारंवार तिला संपर्क करीत होते. या घटनेपासून ते डयूटीवर न येताच आजारी असल्याचे कारण पुढे करुन पसार झाले आहेत. शिवाय, घटनेच्या वेळी ते घटनास्थळी होते, त्यावेळी एक कनिष्ठ महिला कर्मचारी आत्महत्या केल्याचे पाहून त्यांनी पळ का काढला? त्यांनी तिथे अधिकारी या नात्यानेही काही कर्तव्य बजावणे आवश्यक होते. अशा अनेक बाबी सरकारी वकील रेखा हिवराळे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या. या सर्वच पार्श्वभूमीवर त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात यावा. तसेच अधिक तपशीलवार तपास करण्यासाठी त्यांचा मोबाईल जप्त करण्याची परवानगी मिळावी, अशी मागणीही सरकारी वकीलांच्या मार्फतीने पोलिसांनी केली. दोन्ही बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने याबाबतची सुनावणी आता २५ सप्टेंबर रोजी होणार असल्याचे सांगितले.