प्रभावी पेट्रोलिंगमुळे सोनसाखळीचोरांवर नियंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2019 12:55 AM2019-06-04T00:55:25+5:302019-06-04T00:55:36+5:30

२०१८ मधील सर्व गुन्हे उघड : २०१९ मध्ये अवघ्या एका गुन्ह्याची नोंद

Controls of gold bars by effective petroling | प्रभावी पेट्रोलिंगमुळे सोनसाखळीचोरांवर नियंत्रण

प्रभावी पेट्रोलिंगमुळे सोनसाखळीचोरांवर नियंत्रण

Next

जितेंद्र कालेकर

ठाणे : प्रभावी पेट्रोलिंगची व्यूहरचना केल्यामुळे नौपाड्यात सोनसाखळीचोरांवर नियंत्रण आणण्यात पोलिसांना यश आले आहे. २०१८ मध्ये सर्वच्या सर्व सहा गुन्ह्यांची उकल झाली. तर, २०१९ मधील गेल्या पाच महिन्यांमध्ये या परिसरात सोनसाखळीचोरीची अवघ्या एका गुन्ह्याची नोंद झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठाणे शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ-१ मधील नौपाडा पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात २०१६ मध्ये सोनसाखळी तसेच मंगळसूत्र जबरी चोरीच्या २४ गुन्ह्यांची नोंद झाली होती. त्यातील सात गुन्हे उघड करण्यात पोलिसांना यश आले होते.

मुंबई-नाशिक महामार्गालगतची हद्द या पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्राला लागूनच आहे. तसेच राममारुती रोड, नौपाडा, जांभळीनाका आणि चार ते पाच शाळा याच पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात असल्यामुळे सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळी सोनसाखळी चोरीच्या घटना वाढल्या होत्या. २०१७ मध्ये पहिल्या आठ महिन्यांतच सोनसाखळी जबरी चोरीच्या २० गुन्ह्यांची नोंद झाली होती. मे २०१७ मध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती झालेल्या चंद्रकांत जाधव यांनी सप्टेंबर २०१७ पासून सकाळी अ‍ॅण्टी चेन स्रॅचिंग गस्त सुरू केली. त्यामुळे २०१७ च्या उर्वरित चार महिन्यांमध्ये अवघे दोन गुन्हे घडले. पुढे २०१८ मध्ये फक्त सहा गुन्हे दाखल झाले.

विशेष म्हणजे हे सर्व गुन्हे उघड करण्यात जाधव तसेच पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांच्या पथकाला यश आले. त्याच काळात अगदी भिवंडीच्या शांतीनगर परिसरातील पिराणीपाड्यात जाऊन नौपाडा पोलिसांनी दोन कुख्यात सोनसाखळी चोरट्यांना जेरबंद केले होते. त्यातील एक तर टॉप २० मधील आरोपी होता. त्यांच्याकडून अनेक सोनसाखळी चोरीचे गुन्हे उघड झाले. २०१९ मधील गेल्या पाच महिन्यांमध्ये सोनसाखळी जबरी चोरीच्या अवघ्या एका गुन्ह्याची नोंद झाली आहे.

प्रभावी गस्तीमुळे प्रतिबंध
पिराणीपाड्यात जाऊन सोनसाखळी चोरट्यांना जेरबंद करण्याबरोबरच नौपाड्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक जाधव यांनी प्रभावी गस्तीची व्यूहरचना आखली. तीनहातनाका, नितीन कंपनी, सेवारस्ता, ओपन जिम, परमार्थनिकेतन, मासुंदा तलाव, ब्राह्मण सोसायटी आदी मोक्याच्या ठिकाणी सकाळी ६ ते ९ या दरम्यान आठ ते दहा ठिकाणांची निवड करण्यात आली. या प्रत्येक ठिकाणांवर दोन कर्मचारी नियमित ठेवण्यात येतात. संशयास्पद मोटारसायकल तसेच व्यक्तींना ही पथके अडवून त्यांची तपासणी करतात. पोलिसांची पायी, सायकलवर तसेच सरकारी व्हॅनमधून सतत फिरती गस्त त्यावर उपनिरीक्षक, निरीक्षक (गुन्हे) आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांचे नियंत्रण असल्यामुळे सोनसाखळी चोरटे या भागात फिरकतही नसल्याचा अनुभव आता भल्या सकाळी या भागात फेरफटका मारणारे नागरिकही व्यक्त करतात.

शाळा, बाजारपेठसारख्या मोक्याच्या ठिकाणी कधी पायी, कधी सायकल आणि अचानक पोलीस व्हॅनमधून अ‍ॅण्टी चेन स्रॅचिंग पथकासोबत नेमून दिलेले फिक्स पॉइंट नियमित तपासणी करत असतो. त्यामुळे कर्मचारीही हे पॉइंट सोडत नाहीत. प्रभावी पेट्रोलिंगमुळे सोनसाखळी चोऱ्यांवर बºयापैकी नियंत्रण आणले आहे. - चंद्रकांत जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नौपाडा पोलीस ठाणे

Web Title: Controls of gold bars by effective petroling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस