फटाक्यांची कोंडी फुटली; मोकळ्या जागा, व्यावसायिक गाळे यांना प्राधान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2017 02:27 AM2017-10-15T02:27:07+5:302017-10-15T02:27:24+5:30
निवासी क्षेत्र, गर्दीची ठिकाणे वगळून मोकळी मैदाने आणि व्यावसायिक गाळे येथे फटाक्यांची दुकाने सुरू करण्यास महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शनिवारी सायंकाळी अनुमती दिल्याने सोमवारपासून ठाण्यात फटाक्यांचे स्टॉल्स सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
ठाणे : निवासी क्षेत्र, गर्दीची ठिकाणे वगळून मोकळी मैदाने आणि व्यावसायिक गाळे येथे फटाक्यांची दुकाने सुरू करण्यास महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शनिवारी सायंकाळी अनुमती दिल्याने सोमवारपासून ठाण्यात फटाक्यांचे स्टॉल्स सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यापूर्वी महापालिका प्रशासनाने सरसकट फटाक्यांच्या स्टॉल्सवर बंदी लागू केल्याने शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला होता.
महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी परवाना विभाग आणि अग्निशमन विभागाची बैठक घेऊन फटाकेविक्रेत्यांना सशर्त परवानगी दिली. ही परवानगी देताना गर्दीची ठिकाणे, निवासी क्षेत्र, सार्वजनिक ठिकाणे आदी ठिकाणी फटाक्यांचे स्टॉल लावता येणार नसल्याचे स्पष्ट केले. तर, खुली मैदाने आणि व्यावसायिक गाळ्यांच्या ठिकाणी फटाकेविक्रीला परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये न्यायालयाचे कुठेही उल्लंघन होणार नाही, याची काळजी घेतली जावी, असेही त्यांनी या बैठकीत स्पष्ट केले आहे.
दिल्ली न्यायालयाने फटाक्यांवर बंदी घातल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयानेही तसे आदेश दिले. राज्य शासनाने याबाबतचे परिपत्रक काढले होते. त्यामुळे फटाके विक्रेत्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले होते. सरसकट बंदीविरोधात रस्त्यावर उतरण्याची भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेने घेतली. मात्र, ठाणे शहर रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाने (आ) ठाणे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची भेट घेऊन न्यायालयाचे आदेश आणि राज्य शासनाच्या परिपत्रकाची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, अशी मागणी केली होती.
जीवित अथवा वित्तहानी होऊ नये, म्हणून पालिकेने गेल्या काही वर्षांपासून रस्त्यावर आणि फुटपाथवर फटाक्यांचे स्टॉल लावण्यास बंदी केली आहे. फटाक्यांचे स्टॉल लावायचे झाल्यास, ठाणे महापालिकेची मैदाने, मोकळे भूखंडावर लावण्याचे आदेश आहेत. त्यानुसार, मागील वर्षी तब्बल २५० च्या आसपास स्टॉल शहरात लागले होते.
विशेष म्हणजे यासाठी आकारण्यात येणाºया भाड्यातही ठाणे महापालिकेने मागील वर्षी वाढ केली होती. दरम्यान, आता न्यायालयाच्या आदेशानंतर ठाणे अग्निशमन दलाने, नाहरकत परवाना देण्यास मज्जाव केला. त्यामुळे दिवाळीसाठी खरेदी केलेल्या फटाक्यांची विक्री कशी करायची, असा पेच या विक्रेत्यांना सतावू लागला होता. अखेर, हा पेच संपुष्टात आला.