ठाण्याच्या राज्य वीमा कामगार रुग्णालय वसाहतीत महिलांच्या आंदोलनामुळे होणार डागडूजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 08:27 PM2018-01-10T20:27:13+5:302018-01-10T21:50:50+5:30
राज्य वीमा कामगार रुग्णालय कर्मचारी वसाहतीची दुरवस्था झाली आहे. प्रशासनाने महिलांच्या आंदोलनाची दखल घेत याठिकाणी डागडूजी करण्याचे आश्वासन दिले.
ठाणे : ठाण्याच्या वागळे इस्टेट राज्य कामगार विमा योजना रुग्णालयाच्या आवारातील रुग्णालयीन कर्मचा-यांच्या वसाहतीच्या दुरवस्थेविरुद्ध महिलांनी बुधवारी आंदोलन छेडले. विशेष म्हणजे या आंदोलनाच्या अवघ्या काही तासांमध्येच प्रशासनाने वसाहतीची डागडुजी करण्याचे मान्य केल्याने महिलांनी हे उपोषण मागे घेतले.
राज्य कामगार विमा योजना रुग्णालय कर्मचा-यांच्या वसाहतीमध्ये वीजेचा नेहमीच लपंडाव असतो. इमारती धोकादायक अवस्थेत आहेत. स्वच्छतागृहांची ड्रेनेज लाईन तुंबलेली आहे. त्यामुळे टाक्या वाहून सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. वसाहतीमध्ये जागोजागी कच-यांचे ढीग पसरले आहे. ते साफ करण्यासाठी कोणीही सफाई कामगार नसल्यामुळे साथीचे रोग पसरण्याची भीती आहे. वसाहतीमधील कंपाऊंड आणि रस्त्यावर पथदिवेही नाहीत. अंधारामुळे रात्रीच्या वेळी महिला आणि मुलांना जाणे येणेही जिकरीचे होते. या सर्वच दुरवस्थेबद्दल राज्य सरकारी चतुर्थश्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटना प्रणित राज्यस्तरीय शासकीय महिला कर्मचारी व शासकीय कुटूंब महिला मंचाने विमा रुग्णालय प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला होता. तरीही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने संघटनेच्या अधक्षा सुवर्णा शेवाळे, कार्याध्यक्षा जनाबाई साळवे आणि शांता वाघाळे आदी ६० ते ७० महिलांनी बुधवारी सकाळी वैद्यकीय अधीक्षकांच्या कार्यालयाजवळ सकाळी १० वाजण्याच्या सुमारास उपोषण केले. या उपोषणाची दखल घेऊन रुग्णालय प्रशासनाचे उपायुक्त संजीव कुमार यांनी कर्मचारी संघटना आणि महिलांच्या मागण्या मान्य करीत असल्याचे लेखी आश्वासन दिले. येत्या काही दिवसांमध्ये येथील इमारतींची डागडुजी केली जाणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आल्याचे मुंबई जिल्हा चतुर्थ श्रेणी संघटनेचे अध्यक्ष गजानन म्हामुणकर यांनी सांगितले.