ठाण्यात तरुणावर खूनी हल्ला: पूर्वाश्रमिच्या प्रेयसीसह दोघांना पोलिसांनी केली अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2017 05:30 PM2017-12-04T17:30:33+5:302017-12-04T18:07:20+5:30
वारंवार सांगूनही पिच्छा पुरविणा-या पूर्वाश्रमीच्या प्रियकरावर एका तरुणीने तिच्या सध्याच्या प्रियकराच्या मदतीने खूनी हल्ला केल्याचा प्रकार आझादनगर भागात घडला. या हल्लानंतर पश्चिम बंगालमध्ये पळून जाण्याच्या प्रयत्नास असतांनाच हल्लेखोर प्रियकराला पोलिसांनी पकडले.
ठाणे : आपल्या मागे लागू नये, हे समजून सांगण्यासाठी आलेल्या एका तरुणीने तिच्या आधीच्या मित्रावर प्रियकरासह खूनी हल्ला केल्याची घटना २७ नोव्हेंबर रोजी घडली. याप्रकरणी चिरंजीत उर्फ रोहित विश्वास (३०) याच्यासह त्याच्या कथित प्रेयसीला राबोडी पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे.
आझादनगर भागातील देवश्री गार्डन, प्लॅटिनम हॉस्पीटल येथून विलास मते हा २७ नोव्हेंबर रोजी दुपारी १.४५ ते २.१५ वाजण्याच्या सुमारास घरी जात होता. त्याचवेळी त्याची पूर्वाश्रमीची प्रेयसी तिच्या सध्याचा प्रियकर रोहितसह तिथे आले. आता यापुढे माझ्याशी संबंध ठेवू नकोस, असे सांगून तिने त्याला दमदाटी केली. त्यानंतर रोहितनेही तिला हिच्याबरोबर संबंध ठेवू नकोस, असे सांगत दमबाजी केली. एवढयावरच न थांबता दोघांनीही त्याला डोक्यात आणि पोटात त्याला जबर मारहाण केली. पोटात आणि डोक्यावर जबर मार लागल्याने तो यात गंभीर गंभीर जखमी झाला. त्याला सुरुवातीला ठाण्यातील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नंतर प्रकृती चिंताजनक झाल्यानंतर त्याला मुंबईच्या किंग एडवर्ड मेमोरियल (केईएम) रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी विलासचा भाऊ विकासने राबोडी पोलीस ठाण्यात रोहित आणि त्याच्या मैत्रिणीविरुद्ध खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा ३ डिसेंबर रोजी दाखल केला. पोलीस निरीक्षक दिलीप रासम यांच्या पथकाने पश्चिम बंगालमध्ये पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या रोहितला आणि त्याच्या मैत्रिणीलाही सोमवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास अटक केली.