माजी सरपंचाने विविध योजनासाठी केली शासनाची फसवणूक जिल्हाधिका-याकडे कारवाईची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 11:22 PM2018-02-23T23:22:54+5:302018-02-23T23:22:54+5:30
भिवंडी : तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत सुपेगाव मधील माजी सरपंच रोहिदास रामचंद्र मढवी व सदस्य रोहिणी रोहिदास मढवी या दाम्पत्यांनी सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी चुकीची कागदपत्रे सादर करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्य अशोक लक्ष्मण राऊत यांनी जिल्हाधिका-यांकडे लेखी पत्राव्दारे केली आहे.
शासनाच्या शहापूर येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालया मार्फत आदिवासींच्या सामुहिक विवाहामध्ये कन्यादान योजना राबविली जाते. सुपेगाव ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच रोहिदास रामचंद्र मढवी आणि ग्रामपंचायत सदस्या रोहिणी रोहिदास मढवी हे पतीपत्नी असुन यांचे लग्न ३ फेब्रुवारी २००४ मध्ये झाले आहे.त्यांच्या विवाहाची ही नोंद सुपेगाव ग्रामपंचायतीतील रजीस्टर मध्ये केली आहे.तसेच त्यांना कुमार नयन व कुमारी हर्षाली असे दोन आपत्य देखील आहेत. तरी देखील या दाम्पत्याने या कन्यादान योजनेचा लाभ घेण्यासाठी २१ मार्च २०१२मध्ये सामुहिक सोहळ्यात सहभागी होऊन याच दिवशी लग्न झाल्याचे कागदोपत्री सत्यप्रतिज्ञापत्र (अॅफिडेव्हीट) प्रकल्प अधिका-यांकडे सादर केले आणि या योजनेमार्फत मिळणारा आर्थिक लाभ घेतला. तसेच माजी सरपंच रोहिदास मढवी यांची बहिण तथा माजी ग्रामपंचायत सदस्या कलावती रामचंद्र मढवी यांचे लग्न पुंडासच्या स्वप्नील गोपाळ भाईर यांच्या बरोबर २००७ मध्ये झाला.त्याची नोंद सुपेगाव ग्रामपंचायत रजीस्टरमध्ये आॅक्टोबर २०११ मध्ये करण्यात आली आहे. तसेच त्यांनी १८ मे २०१२ रोजी सामुहिक सोहळ्यात सहभागी होऊन या दिवशी लग्न झाल्याचे प्रतिज्ञापत्र (अॅफिडेव्हीट) कन्यादान योजनेचा आर्थिक लाभ मिळण्यासाठी शहापूर प्रकल्प अधिका-यांकडे सादर करून लाभ घेतला आहे. या प्रकरणाची गंभीरपणे दखल घेऊन या दाम्पत्यांनी सत्यप्रतिज्ञापत्रात लिहून दिल्याप्रमाणे दंडनीय कारवाई करावी,अशी लेखी मागणी अशोक राऊत यांनी जिल्हाधिका-यांकडे केली आहे.त्याचप्रमाणे हे सामुहिक कुटूंब असुन त्यांची शिधापत्रीका एकत्र आहे. असे असताना शासनाच्या स्वच्छ भारत मिशन ग्रामिण योजनेंतर्गत वैयक्तीक शौचालयासाठी तत्कालीन सरपंच रोहिदास रामचंद्र मढवी याने कागदपत्रे रंगविली. तसेच सरपंच पदाचा गैरफायदा घेऊन खोटी कागदपत्रे सादर करून शासनाची फसवणूक करून शासनाचा निधी हडप केला,असा आरोप देखील अशोक राऊत यांनी जिल्हाधिकाºयांकडे केलेल्या आपल्या पत्रात केला आहे.या घटनेने परिसरांत खळबळ माजली असुन जिल्हाधिका-यांकडून होणा-या कारवाईकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.