विषबाधा टाळण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक औषध फवारणीचे प्रात्यक्षिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2017 05:46 PM2017-12-02T17:46:09+5:302017-12-02T17:57:00+5:30
ठाणे जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून नुकतेच शहापूर, मुरबाड तालुक्यांसह कल्याणचे फळेगांव, कोळींब, भिवंडीतील झिडके, अंबनाथचे आंभे आणि आंभे आदी ठिकाणी शेतकऱ्यांना पीक फवारणीचे मार्गदर्शन करून औषध हाताळणी व फवारणीचे प्रत्यक्ष शेतकऱ्यांकडून प्रात्यक्षिक देखील करून घेण्यात आले.
ठाणे : राज्यातील अन्य जिल्ह्यांमध्ये पीक फवारणीच्या वेळी औषध हाताळताना विषबाधा होऊन शेतकरी दगावले आहेत. या संकटावरील खबरदारीची उपाययोजना म्हणून ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना औषध फवारणीचे सखोल मार्गदर्शन करून औषध हाताळणीसह फवारणीचे प्रात्यक्षिकही शेतकऱ्यांकडून ठाणे जिल्ह्यातील ठिकठिकाणी करून घेतले जात आहे.
ठाणे जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून नुकतेच शहापूर, मुरबाड तालुक्यांसह कल्याणचे फळेगांव, कोळींब, भिवंडीतील झिडके, अंबनाथचे आंभे आणि आंभे आदी ठिकाणी शेतकऱ्यांना पीक फवारणीचे मार्गदर्शन करून औषध हाताळणी व फवारणीचे प्रत्यक्ष शेतकऱ्यांकडून प्रात्यक्षिक देखील करून घेण्यात आले. जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी प्रफूल बनसोडे यांन्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक तालुक्यांचे गटविकास अधिकारी यांच्या नियंत्रणात कृषी कर्मचारी शेतकऱ्यांचे प्रात्यक्षिक करून घेत आहेत.
पीक संरक्षण उत्पादनाचा सुरक्षित, जबाबदार, न्यायपूर्ण वापर व हाताळणी आदींचे मार्गदर्शन व प्रात्यक्षिक शेतकऱ्यांकडून करून घेतले जात आहे. जिल्ह्यात आता खरीप पिकांनंतर रब्बी पिकांच्या उत्पादनासाठी शेतकरी लगबग करीत आहे. या दरम्यान पिकांवरील विविध रोगांचा प्रादुर्भाव करण्यासाठी व त्यापासून ओढवणारे जीव घेण्या संकटावर मात करण्यासाठी खबरदारीची उपाययोजना म्हणून शेतकऱ्यांना पीक औषध फवारणीच प्रत्येक्ष प्रात्यक्षिक करून घेतले जात आहे. जिल्ह्यातून शेतकऱ्यांकडून रोगर, सीपरमेथ्रीन, आयमिडा क्लोप्राइड, डिक्लोरोओ५, बूरशी नाशके, तण नाशके आदी औषधे पीक फवारणीसाठी वापरले जात आहेत. त्यांचा वापर करताना घ्यावयाची काळजी, किती पाण्यात किती थेंब औषधी टाकून पीकांवर कशी फवारणी करावी आदी विवि ध विषयांवर या शेतकऱ्यांना मार्गदर्शन ही करण्यात आले आहे.