घोडबंदरची घोडचूक... नको रे बाबा!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2019 03:06 AM2019-01-07T03:06:39+5:302019-01-07T03:07:01+5:30
दहा मिनिटांच्या प्रवासासाठी तब्बल दीड तास
नवीन ठाणे म्हणून ओळख असलेल्या घोडबंदर भागाला सध्या वाहतूककोंडीचे ग्रहण लागले आहे. पाच मिनिटांच्या प्रवासासाठी तब्बल एक ते दीड तासांचा अवधी जात आहे. मेट्रो चार प्रकल्पाचे काम येथे युध्दपातळीवर सुरु झाले आहे. त्यात महापालिकेच्या मलनिसारण वाहिन्या, जलवाहीन्या टाकण्याच्या कामालासुध्दा एकाचवेळी सुरूवात झाली आहे. याशिवाय येथील उड्डाणपुलांचे नियोजन आधीच बिघडले असल्याने वाहतूककोंडीत आणखी भर पडत आहे.
आता महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी येथील कोंडी फोडण्यासाठी विविध उपाय सुचविले आहेत. परंतु येथील वाहनांचा वाढणारा लोंढा पाहता, सध्याचे रस्ते अपुरे पडत असल्याचे दिसते. त्यामुळे सध्या कितीही उपाय सुचवले गेले तरी, कोंडी काही केल्या सुटणार नसल्याचे स्पष्ट होत आहे. वाहतूक विभागानेसुध्दा हे मान्य केले असून, जोपर्यंत मेट्रोचे काम संपत नाही तोपर्यंत घोडबंदर भागातील वाहतूककोंडीचे ग्रहण सुटणे शक्य नाही, हे निश्चित आहे.
पूर्वी घोडबंदरला ऐतिहासिक ओळख होती. परंतु आता ही ओळख बदलून टोलेजंग इमारतींची, मॉलची आणि उड्डाणपुलांचे शहर म्हणून नवी ओळख तयार झाली आहे. ही नवी ओळख घोडबंदरला खरेच भावली आहे का, हा प्रश्न आजही येथे राहणाऱ्या जुन्याजाणत्या नागरिकांना भेडसावत आहे. शहर वाढले मात्र बसेस, रुग्णालये, स्मशानभूमी, ज्येष्ठांसाठी सुविधांचा अभाव, उद्याने आणि वाढते प्रदूषण या समस्या घोडबंदरला मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. त्यामुळे घोडबंदरचा विकास खरेच झाला आहे, हा संशोधनाचा मुद्दा आहे. ठाण्यापासून ४ ते ५ किमी अंतरापासून घोडबंदरला सुरुवात होते. पूर्वी घोडबंदरला असलेल्या घोडबंदरच्या किल्यामुळे या भागाला हे नाव मिळाले. काळाच्या ओघात ही ओळख पुसली जात आहे. येथील किल्याचा बुरुज पुरता ढासळला आहे. नव्या इमारती, झाडांची कत्तल, चार पदरी रस्ते, आयटी पार्क अशी या भागाची ओळख होऊ लागली आहे. आजही येथे असे काही भाग आहेत की, ज्याठिकाणी विकासाची ही गंगा पोहोचलीच नसल्याचे दिसत आहे. आजही या भागात असलेल्या सात ते दहा आदीवासीपाड्यांना विकास गंगा काय आहे, हे माहितच नसल्याचे दिसत आहे. या भागात वीजेची, पाण्याची, पायवाटांची, शाळांची समस्या तेवढच्या तीव्रतेने जाणवत आहे. पातलीपाडा, डोंगरीपाडा, वाघबीळ, कासारवडवली, ओवळा, काजुपाडा, मोघरपाडा, भाईंदरपाडा आदी भागांपर्यंत केवळ डोळ्यांना दिसतील तिथपर्यंतच या सुविधा गेल्या आहेत. याशिवाय ज्या नवनव्या इमारती उभ्या राहत आहेत, त्यांनाही सुविधा पुरविल्या जात आहेत. आदिवासी पाड्यांकडे मात्र ढुंकूनही बघण्याची तयारी प्रशासनाची नाही. येथील दुपदरी रस्ता आता चारपदरी झाला आहे. वाहनांची संख्या झपाट्याने वाढली आहे. या भागाची लोकसंख्या पाच ते सहा लाखांच्या घरात गेली आहे.
मागील काही महिन्यांपासून मेट्रोच्या चवथ्या मार्गाचे काम या भागात सुरु झाले आहे. त्यामुळे ठिकठिकाणी बॅरीकेड्स लावण्यात आले आहेत. काही ठिकाणी सर्व्हीस रोडवर तर काही ठिकाणी रस्त्याच्या मधोमध एकएक किमीपर्यंत बॅरीकेड्स लावण्यात आले आहेत. त्यामुळे चारपदरी रस्ता पुन्हा दुपदरी झाला आहे. परिणामी कापुरबावडीपासून ते ओवळापर्यंत जाण्यासाठी वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागते. ठाण्याच्या मध्यभागातील कोंडी कशीबशी फोडून कापुरबावडीपर्यंत पोहोचलो की, तिथून पुढे जाताना पुन्हा कोंडी सुरु होते. ही वाहतूककोंडी थेट आनंदनगरपर्यंत पाहावयास मिळते. हलक्या वाहन्यांसोबत अवजड वाहनांची वाहतूकही याच मार्गावरुन होत असल्याने कोंडीत आणखी भर पडताना दिसत आहे. त्यामुळे वाहनांच्या रांगा आनंदनगरपासून ते थेट कापुरबावडीपर्यंत येत आहेत. घोडबंदर येथून ठाण्याकडे येताना गायमुखपासूनच वाहतूककोंडीचा सामना करावा लागतो. पातलीपाड्यापर्यंत मुख्य रस्ता आणि सेवारस्त्यावर तारेवरची कसरत करीत मार्ग काढावा लागतो. एकाचवेळी सेवा आणि मुख्य रस्त्यांवर कामे सुरु असून, सिग्नल यंत्रणा कोलमडलेली आणि अपुरे पोलीस बळ असल्यानेसुध्दा वाहतुककोंडी फोडणे अवघड होऊन बसले आहे. त्यामुळेच वाघबीळ ते पातलीपाडा असा पाच मिनिटांचा मार्ग कापायचा झाला तरी, त्यासाठी तब्बल एक ते दीड तासांचा अवधी लागत आहे. मेट्रोचा मार्ग गायमुखपर्यंत नेण्यात येणार असल्याने भविष्यात वाहतूककोंडी आणखी वाढणार असल्याची भिती येथील रहिवाशांनी व्यक्त केली.
मेट्रोच्या कामामुळे जागोजागी लावलेले बॅरिकेड्स आणि मुख्य रस्त्यासह सेवा रस्त्यांवरही पालिकेने एकाचवेळी सुरु केलेली कामे; परिणामस्वरुप प्रचंड वाहतूककोंडीला सामारे जाणाºया ठाण्याच्या घोडबंदर रोडवर जायचे म्हटले की, पोटात गोळा आल्यावाचून राहत नाही. एरव्ही जो मार्ग पाच ते दहा मिनिटांमध्ये कापणे शक्य असते, तेवढ्याच अंतरासाठी आता तास ते दीड तास खर्च करावा लागत आहे. गतिमान कारभाराची ग्वाही देणाºया सरकारच्या राज्यात लोकांच्या वेळेचा अशाप्रकारे अपव्यय होत आहे. भविष्यातील स्मार्ट सिटी असलेल्या ठाण्यातील ही समस्या सोडवणे वाहतूक पोलिसांसह पालिका प्रशासनालाही अशक्य होऊन बसले आहे. त्यामुळे एकतर हा मार्ग टाळणे किंवा जायचेच असेल तर वेळ खर्ची करण्याची मानसिकता ठवूनच ठाणेकरांना घोडबंदरकडे कूच करावी लागत आहे.
नागमोडी मार्गामुळे कोंडीत भर
ठाण्यात मेट्रोचा मार्ग तीनहात नाक्यापासून सुरु होतो. हा मार्ग काही ठिकाणी सेवारस्त्यावरुन तर काही ठिकाणी मुख्य रस्त्यावरुन जात आहे. त्यामुळे मेट्रोच्या या नागमोडी मार्गाचा त्रास आता घोडबंदरकरांना सहन करावा लागत आहेच, शिवाय भविष्यात या त्रासात आणखी भर पडणार आहे. कारण मेट्रोच्या नागमोडी मार्गामुळे भविष्यात या ठिकाणी रस्ता वाढवणे किंवा उड्डाणपूल उभारणेही शक्य होणार नाही.
एकाचवेळी महापालिकेची कामे सरू
एकीकडे मेट्रोचे काम सुरु असतानाच दुसरीकडे या भागात महापालिकेच्या माध्यमातून मलनिसारण वाहिन्या आणि जलवाहीन्या टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे येथील दोनही बाजुंचे सेवा रस्ते खोदण्यात आले आहेत. परंतु आता महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी ही खोदकामे एकत्रित करुन, रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु असे झाले तरी पूर्णपणे हा सेवा रस्ता वापरास उपलब्ध होणार नाही. डोंगरीपाडा आणि पुढे कासारवडलीच्या ठिकाणी काही कंपन्याच्या भिंती सर्व्हीस रोडच्या आड येत आहेत. त्यामुळे येथे सर्व्हीस रोडचे तुकडे पडले आहेत. आयुक्तांनी याकडेही लक्ष दिल्यास सर्व्हीस रोड योग्य पध्दतीने वापरास मिळेल, अशी आशा व्यक्त होत आहे.
घोडबंदर रोडवर २०० लीटर आॅइल सांडल्याने कोंडीत भर
मेट्रोचे काम सुरू झाल्याने घोडबंदर रोडवरील वाहतुकीचे तीनतेरा वाजले असतानाच, रविवारी सायंकाळच्या सुमारास घोडबंदर रोडमार्गे ठाण्याच्या दिशेने येणाºया हायड्रा क्रेनमधील जवळपास २०० लीटर आॅइल दीड ते दोन किमी रस्त्यावर सांडल्याने दोन्ही मार्गिकांवर वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या. रात्री ८ वाजण्याच्या सुमारास आॅइलवर माती पसरवण्याचे काम पूर्ण झाल्यावर वाहतूक सुरळीत झाल्याचे सूत्रांनी सांगितले. रविवारी संध्याकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास घोडबंदर रोडवरून एक हायड्रा क्रेन ठाण्याकडे येत होती.
ओवळा ते आनंदनगरदरम्यान क्रेनमधील आॅइल सांडले, तरी चालकाच्या लक्षात आले नाही. रस्त्यावर आॅइल पसरल्याने वाहतूक संथगतीने सुरू होती. ही बाब ठाणे शहर वाहतूक पोलीस आणि ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाला समजल्यावर वाहतूक पोलिसांसह अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. पण, रस्त्यावर सांडलेले आॅइल सुमारे दीड ते दोन किमी अंतरावर पसरल्याने दोन्ही मार्गिकांवर त्याचा परिणाम झाला. त्यामुळे वाहनांच्या काही किमी अंतरापर्यंत लांबचलांब रांगा लागल्या होत्या.
याचदरम्यान वाहतूककोंडी वाढल्याने कासारवडवली वाहतूक उपशाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील यांच्यासह तीन मोबाइल व्हॅन, २० पोलीस कर्मचाºयांच्या मदतीला कासारवडवलीसह चितळसर पोलीस ठाण्यातील पोलीस धावून गेले होते. सांडलेल्या आॅइलवर टाकण्यासाठी एक डम्पर माती ठामपा आपत्ती कक्षाने मागवली. ती माती दीड ते दोन किमी अंतरावर पसरलेल्या आॅइलवर टाकण्याचे काम १० ते १५ जण जवळपास एक तास करत होते. हे काम रात्री ८ वाजण्याच्या सुमारास संपल्यानंतर वाहतूक सुरळीत सुरू झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
जवळपास २०० लीटर आॅइल रस्त्यावर सांडल्याने वाहतूक संथगतीने सुरू होती. आॅइलवर माती पसरवण्याचे काम हाती घेतल्यावर २० ते २५ मिनिटे वाहतूक पूर्ण बंद होती.
- अनिल मांगळे, जनसंपर्क अधिकारी,
वाहतूक शाखा, ठाणे शहर
आॅइलवर टाकण्यासाठी एक डम्पर माती मागवली होती. ती माती टाकण्यासाठी जवळपास एक तास लागला. ८ वाजताच्या सुमारास वाहतूक सुरळीत झाली.
- संतोष कदम, आपत्ती कक्ष अधिकारी, ठामपा